मागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले उत्पादन यावे

आमच्या भागात तुरीची लागवड कमी होईल. अनेक शेतकरी बागायती तूर घेतात; पण दर नसल्याने तिची लागवड फारशी नसेल. कापसाची लागवडही कमीच आहे. तृणधान्य व कडधान्य पेरणीबाबत तयारी केली आहे. पावसाची प्रतीक्षा असून, चांगला पाऊस झाला तर सोयाबीनचा पेरा वाढू शकतो. - मानक चौधरी, शेतकरी, धुरखेडा, जि. नंदुरबार.
खरीप नियोजन
खरीप नियोजन
नंदुरबार ः जिल्ह्यात मागील हंगामाच्या तुलनेत यंदा पूर्वहंगामी कापूस लागवड कमी होणार आहे. नंदुरबारसह शहादा तालुक्‍याला कमी पावसाचा फटका बसल्याने कूपनलिका आटल्या आहेत. यातच मागील हंगामात कडधान्याचे उत्पादन कमी आले. यासह त्यास दरही अपेक्षित न मिळाल्याने पेरा कमी होईल, असे संकेत आहेत. 
 
मागील हंगाम पुरता वाया गेला. यंदा चांगले उत्पादन यायला हवे. मात्र, बॅंकांकडून वित्तपुरवठा हवा तसा नाही, त्यामुळे हंगामाच्या पूर्वतयारीसाठी अडचणी येत असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिले. 
सातपुडा पर्वतातील अक्कलकुवा व धडगाव हे जिल्हे आणि पठारी प्रदेशातील नंदुरबार, तळोदा, शहादा व नवापूर, असे सहा तालुके जिल्ह्यांत आहे. जिल्ह्यात सुमारे साडेपाच लाख हेक्‍टरवर खरीप पेरणी होईल.
 
पूर्ण नंदुरबार तालुका आणि शहादा तालुक्‍याचा पूर्व भाग कमी पावसाने उजाड झाला आहे. फक्त तापीकाठालगत स्थिती बरी आहे. नवापूर, तळोदा तालुक्‍यात स्थिती बरी असली तरी या तालुक्‍यांमध्येही पूर्वहंगामी कापूस लागवड कमी होईल, अशी स्थिती आहे. गुलाबी बोंड अळीचा धसका शेतकऱ्यांमध्ये आहेच. याशिवाय वाढते मजुरीचे दर, मजूर तुटवडा, कापसाला मिळालेले कमी दर यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे.
 
शहादा, तळोदा व नवापुरातील पूर्व भागात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू झाली आहे. जिल्ह्यात सुमारे २८ हजार हेक्‍टरवर पूर्वहंगामी कापूस लागवड होईल, असा अंदाज आहे. ही लागवड सातपुडा पर्वतालगतची व तापीकाठालगतच्या गावांमध्येच अधिक होईल. शेतकरी ठिबकचा वापर त्यासाठी करीत आहेत.
 
मागील हंगामात कमी पावसामुळे पूर्व शहादा, नंदुरबार व तळोदा भागात कापसासह इतर पिकांचे नुकसान झाले. उडीद, मुगाची उंची वीतभरही नव्हती. यासोबतच परतीच्या पावसामुळे कापूस पिकात कैऱ्यांचे नुकसान झाले. फुले व पातेगळ झाली. कडधान्याचे उत्पादन हाती आले नाही. जे आले त्याला दर नव्हते. उडीद, मूग व सोयाबीनचे दर बाजारात सुरवातीलाच पडले. त्यामुळे शेतकरी कडधान्यासह कापसाची लागवड किंवा पेरणी कमी करतील, असे सांगितले जात आहे.
 
जिल्ह्यात देशी कापसाची लागवडही बऱ्यापैकी असते. यंदा देशी सुधारित व देशी संकरित कापूस बियाण्याची मागणी सुरवातीपासून आहे; पण काळाबाजार सुरू झाल्याने प्रमाणित व खात्रीलायक बियाण्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. तीन ठिकाणी कृषी विभागाने बोगस किंवा अनधिकृत कापूस बियाण्यांबाबत कारवाई केली.
 
नवापुरात पावसाचे प्रमाण मागील वेळेस बऱ्यापैकी होते. या तालुक्‍यातील पश्‍चिम भागात भाताची लागवड चांगली होईल. तसेच भाजीपाला शेतीही जोमात असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात यंदा सुमारे ९० हजार हेक्‍टरवर कापूस, एक लाख हेक्‍टरवर तृणधान्ये, सुमारे ८० हजार हेक्‍टरवर कडधान्यांची पेरणी होईल. मागील वेळेस कापसाची एक लाख १० हजार हेक्‍टरवर लागवड झाली होती. 
 
पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. चांगला पाऊस आल्यानंतरच बियाणे पेरण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. कापूस व सोयाबीनसाठी किमान ५० मिलिमीटर पाऊस व्हायला हवा. त्यानंतरच पेरणी करा, असे सांगण्यात आले आहे. शेतकरीही पाऊस आल्यानंतर बियाणे घेऊन पेरणी करू, अशा नियोजनात आहेत. 
 
खरीप हंगामाची तयारी सुरू झाली, तरी पीककर्ज वितरण धीम्यागतीने सुरू आहे. जिल्ह्यात सुमारे ८०० कोटी पीक कर्ज वितरण लक्ष्यांक आहे. यातून १० टक्के पीककर्जही वितरित झालेले नाही. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी पीककर्ज वितरणाबाबत गती दाखविली आहे; परंतु धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या कर्ज वितरणासंबंधी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. थकीत कर्जदार शेतकऱ्यांची कर्ज खाती एनपीएमध्येच आहेत. त्यांना नव्याने कर्ज वितरण सुरू झालेले नाही. नियमित कर्जदारही हवालदिल झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com