नाशिकमधून पुन्हा शेतकऱ्यांचा एल्गार

 शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय किसान सभेतर्फे मंगळवारी (ता.६) नाशिक ते मुंबई लाँगमार्चला सुरवात झाली. या लाँगमार्चमध्ये राज्यभरातील हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय किसान सभेतर्फे मंगळवारी (ता.६) नाशिक ते मुंबई लाँगमार्चला सुरवात झाली. या लाँगमार्चमध्ये राज्यभरातील हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत.

नाशिक : वनजमिनीच्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, दमणगंगा प्रकल्पात आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळावा, जुनी रेशन कार्ड बदलून मिळावीत, या मागण्यांसाठी राष्ट्रीय किसान सभेने ‘नाशिक ते मुंबई लाँगमार्च आंदोलना’ची हाक दिली आहे. नाशिक येथील सीबीएस चौकातून मंगळवारी (ता.६) लाँगमार्चला प्रारंभ झाला. येत्या १२ मार्चपासून विधान भवनाला बेमुदत घेराव घालण्यात येणार आहे.  राज्यभरातील आबालवृद्ध शेतकऱ्यांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. दुपारी १ वाजता सीबीएस चौकात जमण्याचे आवाहन करण्यात आले होते. शेतकरी सकाळी ११ वाजेपासूनच चौकात दाखल होत होते. दुपारी १२ नंतर शहरातील वाहतुकीचे केंद्रस्थान असलेला सीबीएस चौक बंद करण्यात आला. ‘‘दीडपट हमीभाव द्या. सरकारनं लुटलं तेव्हाच ऋण फिटलं. स्वामिनाथन आयोग लागू करा. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा,’’ या फलकांसह लाल टोप्या घातलेल्या शेतकऱ्यांच्या गर्दीने परिसर फुलून गेला होता. तरुणांसह आबालवृद्ध शेतकरी व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. तब्बल तीन तास शहरात वाहतुकीची कोंडी झाली होती. ‘‘मोदी सरकार शेतकरीविरोधी, शेतकऱ्यांना हवे घामाचे दाम, शेतकरी एकजुटीचा विजय असो,’’ या घोषणांनी सीबीएस चौक परिसर दुमदुमला. आमदार जे. पी. गावित, आमदार मीनाक्षी पाटील, डॉ. अजित नवले, सुभाष चौधरी, डॉ. अशोक ढवळे, सावळीराम पवार, राजू देसले, किसन गुजर, सुनील मालुसरे यांनी लाँगमार्चचे नेतृत्व केले.  आता शेतकऱ्यांच्या पोरांचा कट्टरवाद दिसेल राष्ट्रीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले म्हणाले, की देशाने आतापर्यंत जाती व धर्माच्या नावाने कट्टरवाद पाहिला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. त्याचा उत्स्फूर्त उद्रेक म्हणून हजारो, लाखो शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरले आहे. हे शेतकरी विधानभवनाला घेराव घालून सरकारला जाब विचारणार आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या आताही मान्य न झाल्यास देश शेतकऱ्यांच्या पोरांचा कट्टरवाद बघेल. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आता आरपारची लढाई लढण्यासाठीच आम्ही मैदानात उतरलो आहोत. विधानभवनाला घेराव घालणार ‘‘केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेमुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी अधिक संकटात ढकलला जात आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या यापूर्वीही शासनाकडे मांडण्यात आल्या आहेत. मात्र, सरकारने त्याकडे दुर्लक्षच केले आहे. अस्वस्थ झालेला शेतकरी आता गप्प बसणार नाही. शोषण सहन करण्यापेक्षा लढून मरण्याचे शेतकऱ्यांनी ठरविले आहे. शेतकऱ्यांचा संताप हा उत्स्फूर्त आहे. सरकारने आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. वन जमिनीच्या हक्कासह संपूर्ण कर्जमुक्ती, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी या किसान सभेच्या मुख्य मागण्या आहेत. या मागण्यांसाठीच येत्या १२ मार्चला मुंबईला लाँगमार्च पोहोचल्यानंतर विधानभवनाला बेमुदत घेराव घालण्यात येईल. मागण्या मान्य होईपर्यंत घेराव मागे घेतला जाणार नाही,’’ असे आमदार जीवा गावित यांनी सांगितले. या वेळी झालेल्या सभेत आपल्या हक्काची लढाई निकराने लढण्याचे आवाहन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com