बलिप्रतिपदेला शेतकऱ्यांचा महामोर्चा

पंतप्रधान मोदी हे खोटे बोलले. त्यांनी दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत. आता त्यांनाच अद्दल घडविण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारनेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने फसवी कर्जमाफी योजना आणली आहे. -खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना
बलिप्रतिपदेला शेतकऱ्यांचा महामोर्चा
बलिप्रतिपदेला शेतकऱ्यांचा महामोर्चा

जळगाव ः शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती, उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव यासाठी शेतकऱ्यांसाठी देशव्यापी आंदोलन छेडले जाणार आहे. त्याची सुरवात महाराष्ट्रातून येत्या 20 ऑक्‍टोबरला म्हणजेच बलिप्रतिपदेला होईल. बलिप्रतिपदेला राज्यात सुकाणू समितीसह सर्व शेतकरी संघटना बळी राजाच्या प्रतिमेसह महामोर्चा काढून सरकारला इशारा देणार आहेत, असा निर्धार मंगळवारी (ता. 26) दुपारी येथील नूतन मराठा महाविद्यालयात झालेल्या सुकाणूच्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व हमीभाव परिषदेत करण्यात आला.

स्वाभिमानी शेतकरी संघटना, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना, सुकाणू समिती, लोकसंघर्ष मोर्चा, कम्युनिस्ट पार्टी, किसान सभा यांच्यातर्फे ही परिषद घेण्यात आली. परिषदेत व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, माथाडी व कामगार नेते डॉ. बाबा आढाव, सुकाणू समितीचे समन्वयक डॉ. अजित नवले,

साम्यवादी नेते अशोक ढवळे, नामदेव गावडे, रविकांत तुपकर, किसान सभेचे किशोर ढमाले, सुशीला मोराळे, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आदी होते. विशेष म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व रघुनाथदादा पाटील हे प्रथमच अनेक महिन्यानंतर या परिषदेनिमित्त एकाच व्यासपीठावर आले.

या वेळी 20 नोव्हेंबरला हे आंदोलन दिल्लीत धडकणार असून तेथील रामलीला मैदानावर देशभरातील शेतकरी संघटना आंदोलनात सहभागी होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. यावेळी खासदार राजू शेट्टी म्हणाले, की शेतकरी एकत्र यायला हवेत. एकीपुढे भलेभले गुडघे टेकतात. या सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने फसवी कर्जमाफी योजना आणली. शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. फक्त लुटालूट सुरू आहे. मी या सरकारमध्ये सहभागी झालो, ती माझी चूक होती. पण ही चूक मी पुणे ते मुंबई पायी चालून प्रायश्‍चित्त करून सुधारली.

महात्मा फुले यांच्यासमोर प्रायश्‍चीत्त केले. देशाचा जीडीपी नोटाबंदीमुळे दोन टक्‍क्‍यांनी कमी झाला. अडीच लाख कोटींचे नुकसान या सरकारने त्यात केले. शेतकरी, सैनिक हे सर्व त्रस्त आहेत. शेतकऱ्यांची लढाई आता दिल्लीत धडकणार असून, त्यापूर्वी बलिप्रतिपदेला (20 ऑक्‍टोबर) महाराष्ट्रात सर्व शेतकरी संघटना, सुकाणू समिती या महामोर्चा काढतील. केळी व धान्य उत्पादक दुःखी आहेत. मोदी हे खोटे बोलले. त्यांनी आश्‍वासने पाळली नाहीत. आता मोदींनाच अद्दल घडविण्याची वेळ आली आहे.

आमदार बच्चू कडू म्हणाले, की भाजपावाल्यांनाच चांगले दिवस आले. भाजपावाल्यांनी मोदींचे नाव वापरून मते मिळविली. देशात शेतकरी, कष्टकरी किमान वेतनासाठी झगडत आहे. भाजपावाल्यांना पिकांचे देठ माहीत नाही. गाव व शहर असा भेद केला जातो. तूर उत्पादकांची फसवणूक झाली.

दुसऱ्या बाजूला शेतकरी धर्म, जात यात अडकविला जात आहे. शेतकऱ्यांनी हम सब किसान है, असे मानून एकत्र यायला हवे. सुखाची दिवाळी कधी शेतकऱ्याला आली नाही. आता सुखाची दिवाळी हवी असेल तर येत्या 20 ऑक्‍टोबरला (बलिप्रतिपदा) होणाऱ्या आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.

शेतकऱ्यांचा कर्जाचा प्रश्‍न सरकार सोडवीत असल्याचे दिसत असले तरी त्यात किती विश्‍वासार्हता आहे हा प्रश्‍न आहे. शेतकऱ्यांना हमीभावासाठी वणवण कराली लागते. त्याची अंमलबजावणी होत नाही. केंद्र व राज्य सरकारची ही जबाबदारी आहे. बाजार समित्या हमीभावाबाबत लक्ष देत नाहीत.

कर्जमाफीचे 12 लाख बोगस अर्ज आले असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हटले, की त्यांनी हा आकडा कुठून आणला. राजू शेट्टी व रघुनाथदादा पाटील हे एकाच व्यासपीठावर आले याचा मला आनंद आहे. त्यांनी आता एक भूमिका ठरवावी. मतभेद होतात, अगदी गोवा मुक्ती संग्रामच्या लढ्यातही मतभेद झाले होते. ते विसरावेत, असे डॉ. बाबा आढाव यांनी सांगितले.

रघुनाथदादा पाटील म्हणाले, की नोटाबंदीने शेती क्षेत्राला फटका बसला, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. साखर, केळी उत्पादकांना त्रास झाला. भाजपातून आऊटगोइंग सुरू झाले आहे. वर्षभरात त्यांचे दुकान बंद होईल. पूर्वी भाजपात येणाऱ्यांची संख्या अधिक होती. नोटाबंदीचे श्राद्ध येत्या 8 नोव्हेंबरला घालायचे आहे. त्याची तयारी आतापासून करा. त्यापूर्वी 20 ऑक्‍टोबरला बलिप्रतिपदा असून, या दिवशी सर्व शेतकऱ्यांनी आपापले तालुके, विभागात महामोर्चे काढा. त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा.

डॉ. अजित नवले म्हणाले, की 44 लाख शेतकरी कर्जमाफीसंबंधीचे अर्ज ऑनलाइन नोंदवूनही त्यापासून वंचित राहतील, असे आकडे सरकारच्या सांगण्यावरून समोर येत आहेत. एक कोटी चार लाख शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज नोंदविले होते. एवढे अर्ज कसे ऑनलाइन प्रक्रियेतून गायब झाले, याचे उत्तर फडणवीस सरकार देत नाही.

केळी उत्पादकही चुकीच्या निकषांमुळे कर्जमाफीपासून वंचित राहतील, असे दिसते. आमच्याबाबत अफवा पसरविल्या जातात. परंतु आम्ही सारे एक आहोत. आता देशपातळीवर सर्व शेतकरी नेते एक होत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com