सूक्ष्म सिंचन खरेदीदार ‘जीएसटी’च्या कचाट्यात

सुक्ष्म सिंचन
सुक्ष्म सिंचन

अकोला : राज्यात या वर्षी १ जुलैपूर्वी ठिबक व तुषार संच खरेदी करून अाॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना ‘जीएसटी’ (वस्तू आणि सेवाकर)मुळे अनुदान मिळेल की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली अाहे. राज्यात अशा प्रकारचे असंख्य प्रस्ताव अडकल्याची माहिती समोर अाली अाहे.  अाॅक्टोबरअखेरपर्यंत जीएसटी भरलेले बिल अाॅनलाइन अपलोड न केल्यास अशा शेतकऱ्यांची नावे अापोअाप कमी होण्याची भीती तयार झाली अाहे. यामुळे तालुका, जिल्हास्तरीय यंत्रणांनी अापापल्या वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागविले असून, अद्यापही ते मिळाले नाही. याबाबत सविस्तर असे, की शेतकऱ्यांना या वर्षापासून ठिबक किंवा तुषार संच खरेदी करण्यापूर्वी पूर्वसंमती घेणे अावश्यक करण्यात अाले. अशी पूर्वसंमती मिळण्यापूर्वीच काही शेतकऱ्यांनी हंगाम डोळ्यांसमोर ठेवून ठिबक व तुषार संच खरेदी केले. यानंतर त्याची १ मे रोजी अाॅनलाइन पोर्टल सुरू झाल्यावर रीतसर नोंदणीही केली. १ जुलैपूर्वी खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना व्हॅटची बिले मिळत होती. परंतु दरम्यानच्या काळात १ जुलैपासून जीएसटी लागू झाला अाणि व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले. त्यातच अकोला जिल्ह्यात अाॅनलाइन पूर्वसंमती ही १४ अाॅगस्टला मिळाली. अाता ठिबक व तुषार संच खरेदी केलेल्यांना हे विक्रेते जीएसटीचे बिल देण्यास तयार नाहीत. या पेचामुळे एकट्या तेल्हारा तालुक्यात सुमारे १४०० पेक्षा अधिक प्रस्ताव अडकण्याची शक्यता अाहे.

शासनाकडून ठिंबक व तुषार संच विकत घेऊन सिंचन करणाऱ्या अल्प भूधारक शेतकऱ्याला ५५ टक्के; तर पाच एकरांपेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान दिले जाते. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट हा बहुतांश भाग बागायती असल्याने व शेतात सिंचनासाठी आवश्यक असणाऱ्या विहिरी व कूपनलिका असल्याने शेतकऱ्यांनी कर्ज काढून ठिंबक व तुषार संच खरेदी केले. १ मे २०१७ रोजी कृषी विभागाचे आॅनलाइन पोर्टल सुरू होताच तशी नोंदणी केली. 

खरेदी केलेल्या ठिबक व तुषार संचाच्या साह्याने मॉन्सूनपूर्व कपाशीची लागवडसुद्धा झाली. परंतु जिल्ह्यात पूर्वसंमती मिळायला अाॅगस्ट महिला उजाडला. अाता त्यामुळे एकतर या संमतीशिवाय संच खरेदी केलेल्यांचे काय, तसेच जीएसटीची बिले द्यायला विक्रेते राजी नसल्याने काय करावे, अनुदान बुडेल अशी भीती शेतकऱ्यांना भेडसावत अाहे. या महिनाअखेर अाॅनलाइन पोर्टलवर जीएसटीसह बिल सादर करणे गरजेचे अाहे. ते न केल्यास शेतकऱ्यांची नावे अापोअाप वगळली जाऊ शकतात, अशी शक्यता एका अधिकाऱ्याने बोलताना व्यक्त केली. 

मार्गदर्शन मागविले या पेचाबाबत तालुक्यांनी जिल्ह्याला व जिल्ह्याने कृषी अायुक्तालयात मार्गदर्शन मागविले अाहे. मात्र अद्याप कुठलाही तोडगा मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला नाही. दररोज शेतकरी तालुका कृषी कार्यालयांमध्ये येऊन अनुदान कधी मिळेल याची विचारणा करीत असतात. त्यांना उत्तरे देताना अधिकाऱ्यांच्याही नाकीनऊ अाले अाहेत.    

१ मे रोजी सूक्ष्म सिंचन संच खरेदीचा अॉनलाइन अर्ज भरून ४ मे रोजी कार्यालयात सादर केला. सदर संच खरेदी करताना तेव्हा व्हॅट असल्याने तसे बिल सादर केले. परंतु अनुदानासाठी प्रस्ताव स्वीकारताना या बिलांना कृषी विभाग ग्राह्य धरत नसून, जीएसटी भरलेल्या बिलाची मागणी केली आहे. - मधुसूूधन बरिंगे, शेतकरी, वडगाव रोठे, जि. अकोला शासनाच्या धोरणानुसार अॉनलाइन अर्ज भरणा व तुषार सिंचन संच खरेदी केले. शासनाच्या पूर्वसंमतीची प्रतीक्षा केली असती, तर पीक घेता आले नसते. आता नवीन कर भरलेले बिल अनुदानासाठी मागितले जात आहे. कसे द्यायचे व कोठून अाणायचे. - शकुंतलाबाई इंगळे,  महिला शेतकरी, सिरसोली, जि. अकोला अॉनलाइन अर्ज भरून सिंचनासाठी संच विकत घेतला. संच विकत घेताना मिळालेल्या व्हॅटसहित पावत्या अनुदान मागणी प्रस्तावाला जोडल्या. परंतु कृषी विभागाकडून आता जीएसटी बिलाची मागणी केली जात आहे. प्रस्ताव स्वीकारण्याची तारीख ३० अॉक्टोबर असल्याने आता जीएसटी कर भरलेले बिल कोठून अाणू. - निशांत नेमाडे,  शेतकरी रायखेड, जि. अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com