कापडणे येथील शेतकऱ्यांचा सरसकट कर्जमुक्तीचा ठराव

कापडणे येथील शेतकऱ्यांचा सरसकट कर्जमुक्तीचा ठराव
जळगाव  ः कापडणे (ता. धुळे) येथे सोमवारी (ता. २) कर्जमाफीच्या अर्जांचे चावडीवाचन सुरू असताना शेतकऱ्यांनी त्यावर बहिष्कार टाकला. कर्जमाफी मिळू नये म्हणून शासन नवीन नवीन आदेश, मुद्दे रोज आणत आहे. कर्जमाफी सरसकट हवी, शेतकऱ्यांना भिक नको, कर्जमुक्ती हवी. सरकारच कर्जाच्या ढिगाला जबाबदार आहे आणि आता वेळ आली तर पळपुटेपणा करीत आहे, अशी नाराजी शेतकऱ्यांनी चावडीवाचन कार्यक्रमाच्या सभेत व्यक्त केली. यानंतर चावडीवाचन बंद झाले; तसेच ग्रामपंचायतीनेही फसवी कर्जमाफी बंद करा, सरसकट कर्जमुक्ती द्या, असा ठराव केल्याची माहिती कापडणे येथील शेतकरी आत्माराम बळिराम पाटील यांनी दिली. 
 
दरम्यान, कर्जमाफी योजनेसंबंधी महात्मा गांधी जयंती निमित्ताने आयोजित चावडीवाचन कार्यक्रमात अपवाद वगळता कुठेही शेतकऱ्यांचे आक्षेप आले नाहीत. यातच या योजनेसंबंधी विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या गटसचिवांचे १ ते ६६ नमुन्यात माहिती अपलोड करण्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे.
 
दुसऱ्या बाजूला चावडीवाचनानंतर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीकडे कुठलेही आक्षेप बुधवारी (ता.४) दुपारपर्यंत आले नव्हते. या सगळ्या सावळ्या गोंधळात अर्ज अपलोड न झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा तालुक्‍याच्या ठिकाणी येऊन अर्ज करण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र आहे. 
 
ज्या शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज दाखल झाले नाहीत, त्यांना पुन्हा अर्ज दाखल करण्यासाठी आठ ते १० दिवस मुदतवाढ दिली जावी किंवा ऑनलाइन अर्ज दाखल झालेले नसलेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या पात्र कर्जदार व नियमित कर्जदारांना गटसचिवांनी सादर केलेली माहिती ग्राह्य धरून सवलत, लाभ दिला जावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  

ऑनलाइन अर्जांसह गटसचिवांनी नमुना १ ते ६६ मध्ये सादर केलेल्या प्रस्ताव यांची पडताळणी करून शासन कर्जमाफीचा लाभ देणार आहे. जिल्ह्यात गटसचिवांचे आंदोलन अगदी सप्टेंबरच्या मध्यापर्यंत सुरूच होते. जळगाव जिल्ह्यातील ७०० विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमध्ये ४५० गटसचिव आहेत. अपूर्ण मनुष्यबळ असल्याने गटसचिवांना नमुना १ ते ६६ मध्ये माहिती तयार करून ती लागलीच शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यास विलंब लागत आहे. 

ऑनलाइन अर्ज भरूनही चावडीवाचनात नाव न आलेल्या व इतर तक्रारींसंबंधी काही शेतकरी मंगळवारी (ता. ३) दुपारी जळगाव येथील तहसील कार्यालयात गेले; पण त्यांना तालुका सहायक निबंधक कार्यालयात पाठविण्यात आले. असेच प्रकार इतर तालुक्‍यांमध्ये घडत आहेत. म्हणजेच तालुका कमिटी तक्रारींवर लागलीच उपाय करीत नसल्याचे चित्र असून, तक्रार सोडविण्यासाठी शेतकऱ्यांना वणवण करावी लागत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com