तूर हमीभाव नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ

तूर हमीभाव नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ
तूर हमीभाव नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ

सांगली : खरेदी केंद्रात तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीस अवघे चार दिवस उरले आहेत. आतापर्यंत सांगली मार्केट यार्डात विष्णूअण्णा पाटील खरेदी-विक्री संघात अवघ्या आठ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ७ ५२० हेक्‍टरवर तुरीचा पेरा झाला. दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव या तालुक्‍यातील शेतकरी प्रामुख्याने तुरीचे उत्पादन घेतात. जत तालुक्यात ५०३२ हेक्टरवर तूर पेरणी झाली. तिला क्विंटलला ५ हजार ६७५ रुपये हमीभाव आहे. बाजारात ४ हजार ८०० ते ५ हजार ४०० रुपये दर आहे. 

हमीभावापेक्षाही बाजारात तुरीचे दर कमी असल्याने शासनाने आधारभूत किमतीनुसार तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू केली. विष्णूअण्णा पाटील खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून येथील मार्केट यार्डातील सेंट्रल वेअर हाउसमध्ये तूर खरेदी केंद्र सुरू होणार आहे. त्यापूर्वी तूर उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू केली. या खरेदी संघात ही सुविधा उपलब्ध केली आहे.  शेतकऱ्यांच्या सात/बारा उताऱ्यावर तूर नोंद आवश्यक आहे. आधारकार्ड, बँक पासबुक आदी कागदपत्रे ऑनलाइन नोंदणीसाठी आवश्यक आहेत. दि. ११ फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी सुरू झाली. तासगाव तालुक्यातील २, मिरज १, जत तालुक्यातील जालिहाळ, उटगी, बसरगी येथील प्रत्येकी एक अशा एकूण सहा शेतकऱ्यांनी त्यासाठी नोंदणी केली. नोंदणीची दि. २३ फेब्रुवारी ही अंतिम मुदत आहे.

दर कमी, चार किलो सूट

बाजारात हमीपेक्षा क्विंटलला ३०० ते ८०० रुपये दर कमी आहे. क्विंटलला ४ किलो सूट घेतली जाते. त्यामुळे विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल, असे वाटत होते. मात्र तरीही केवळ ६ शेतकऱ्यांनी त्यासाठी नोंदणी केली. शेतीमालाच्या दर्जावरून खरेदी केंद्रावर होणारी अडवणूक, तूर नोंदणीसह सात/बारा उतारा न मिळणे, विलंबाने मिळणारे पेमेंट यावरून शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणीकडे पाठ फिरवली असावी, असे सांगितले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com