शिवडी, सारोळे गावे करणार स्वत:च रोख द्राक्ष विक्री

शिवडी, सारोळे गावांनी केला स्वत:च रोख द्राक्ष विक्रीचा ठराव
शिवडी, सारोळे गावांनी केला स्वत:च रोख द्राक्ष विक्रीचा ठराव

शिवडी, जि. नाशिक  : द्राक्ष उत्पादकांना द्राक्षमालाचे पैसे रोखीने मिळत नाहीत. व्यापारी पलायनाचा विदारक अनुभव जिल्ह्याला आहे. यावर उपाय योजण्यासाठी शिवडी येथील द्राक्ष उत्पादकांनी स्वत:चा द्राक्षमाल रोखीनेच विक्री करण्याची शपथ घेतली आहे. आपल्या मालाच्या रोख विक्रीचा हा ‘शिवडी पॅटर्न’ इतरही गावांनी अवलंबावा, अशी अपेक्षा व्यक्त केली असतानाच मंगळवारी (ता. २७) सारोळे खुर्द येथील ग्रामसभेत रोख विक्रीसह अडत न देण्याबाबत ठराव करण्यात आला. आज, बुधवारी (ता. २८) उगाव येथे सकाळी ९ वाजता याच विषयावर ग्रामसभेचे आयोजन करण्यात येत आहे.   शिवडी येथे झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकमुखी ठराव करत संघटन अधिक व्यापक करण्याची मोहीमच उघडली आहे. व्यापारी अत्यल्प बाजारभावावर उधारीवर खरेदी करतो अन् व्यापारात तोटा आल्याचे सांगत ठरलेला बाजारभावही कमी करतो. जिल्ह्यात द्राक्ष व्यापाऱ्यांकडून वापसीच्या नावाखाली द्राक्ष उत्पादकाला दोन टक्के कपात करत पैसे दिले जातात. याबाबत आता द्राक्ष उत्पादक युवा पिढीने यावर उपाय योजण्यासाठी नियमावली करण्याचे निश्‍चित केले असून, शिवडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली.

याप्रसंगी सरपंच गणपत क्षीरसागर, माजी सरपंच प्रमोद क्षीरसागर, भगीरथ शिंदे, नामदेव दौंड, शिवाजी क्षीरसागर, माणिक क्षीरसागर, भाऊसाहेब बोरसे, हनुमंत जेऊघाले, वाळू क्षीरसागर, सहादू क्षीरसागर, भास्कर क्षीरसागर, दामू क्षीरसागर आदींसह द्राक्ष उत्पादक उपस्थित होते. प्रस्ताविकात ॲड. रामनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात द्राक्ष उत्पादन कमी असून सांगली, जालना, कसमादे यांसारख्या ठिकाणी व्यापारी रोख स्वरूपात द्राक्षमालाचे पैसे कोणतीही कपात न करता अदा करतात, असे स्पष्ट करून बैठकीचा उद्देश सांगितला. महेश क्षीरसागर यांनी सांगली, जालना भागांत संबंधित व्यापाऱ्याने कोणतीही कपात न करता रोख पैसे दिले नाही तर द्राक्षमाल शेतातून नेऊ दिला जात नाही. सर्व शेतकरी संघटित असल्याने द्राक्षमालाचे पैसे रोख मिळतात असे स्पष्ट केले.

नवनाथ शिंदे यांनी द्राक्ष व्यापारी पॅकिंगपासून तर बाजारपेठेत जाईपावेतोचा खर्च शेतकऱ्यांच्या माथी मारत असून, ही बाब चुकीची असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर प्रवीण क्षीरसागर, माजी सरपंच भगीरथ शिंदे, माजी चेअरमन नामदेव दौंड आदींनी द्राक्ष व्यापार व बाजारपेठेत मिळणारे बाजारभाव शेतकऱ्यांची फसवणूक आदींवर मनोगतातून संघटित होण्याची गरज व्यक्त केली. या वेळी सर्व ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी एकजुटीने द्राक्षमाल रोख स्वरूपात कोणतीही कपात न करता घेणाऱ्या व्यापाऱ्यास विक्री करण्याचा ठराव एकमताने मांडला. त्यास सर्वच द्राक्ष उत्पादकांनी पाठिंबा व्यक्त केला. याबाबत गावागावात जनजागृती करण्याचेही निश्‍चित केले. याप्रसंगी शेतकरी उपस्थित होते. सारोळे खुर्दच्या ग्रामसभेतील रोख विक्रीचे ठराव

  • रोख पेमेंट असल्याशिवाय व्यवहार करणार नाही.
  • १ ते २ टक्के वापसी किंवा अडत वसूल करू देणार नाही
  • चेक किंवा आरटीजीएसच्या व्यवहारात कटती करू नये
  • ठरल्यानंतरही भाव पाडून मागणाऱ्यांशी व्यवहार करू नये
  • व्यापाऱ्यांकडील आधार कार्ड, पॅन कार्डची खातरजमा करा
  • नाशिकच्या सर्व गावांत होणार ठराव शिवडी, सारोळे खुर्द पाठोपाठ आज (ता. २८) उगाव येथे सकाळी ९ वाजता याच विषयावर ग्रामसभा होत आहे. या सभेत आपला शेतीमालाच्या रोख विक्रीबाबत ठराव करण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांकडून वेगवेगळ्या क्‍लृप्त्या लढवून दर पाडले जात असताना त्या विरोधात शेतकरी एकत्र येत आहेत. नाशिक जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये विशेष ग्रामसभेतून याबाबत ठराव केले जाणार आहे. राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या मार्फत याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. द्राक्ष व्यवहारातील फसवणूक टळावी तसेच रोख दर मिळावे, यासाठी सर्व द्राक्ष उत्पादकांनी आपापल्या गावात एकत्र यावे. असे आवाहन द्राक्ष बागायतदार संघाच्या मध्यवर्ती विज्ञान समितीचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी केले. दोन टक्के कपात चुकीची जिल्ह्यात द्राक्षमालाचा व्यवहार करताना प्रथम रोख पेमेंटची बोली होते. एक-दोन दिवस पेमेंट रोख दिले जाते, नंतर आजचे उद्या असे करत पेमेंट थकविले जाते. अनेक दिवस थकविल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे देताना एकूण रकमेच्या दोन टक्के कपात करून पैसे देऊ करतात. एकटाच शेतकरी नाइलाजाने ते सहन करतो; मात्र यावर पायबंद घालण्यासाठी शिवडीकरांनी नवीन क्रांतीची मशाल पेटविली आहे. - प्रमोद क्षीरसागर, द्राक्ष उत्पादक शेतकरी  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com