वाजत-गाजत, फीत कापून उभ्या पिकात सोडल्या शेळ्या

वाजत-गाजत, फीत कापून उभ्या पिकात सोडल्या शेळ्या
वाजत-गाजत, फीत कापून उभ्या पिकात सोडल्या शेळ्या

नगर : हजारो रुपये खर्च करून उत्पादन घेतले, परंतु झालेला खर्च निघेल एवढाही दर मिळत नाही. सरकारही दखल घेत नसल्याने सिरसगाव (ता. श्रीरामपूर) येथील नितीन गवारे या शेतकऱ्याने रविवारी (ता. १५) पत्रिकाछापून, वाजत-गाजत आणि फित कापून सरभारच्या भूमिकेचा निषेध करत टॉमॅटोच्या पिकांत शेळ्या-मेंढ्या साेडल्‍या. परिसरातील सुमारे तीनशेच्या जवळपास शेतकरी या वेळी उपस्थित होते. याआधी कोंबी, फ्लावरचे पीकही त्यांनी जनावरांना खाऊ घातले आहे. सधन आणि उसासोबत भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याला प्राधान्य देणाऱ्या नगर जिल्ह्यामध्ये भाजीपाला उत्पादनाला कायम प्राधान्य दिले जाते. नगर जिल्ह्याच्या उत्तरेतील श्रीरामपूर, अकोले, राहाता, राहुरी भागांतील भाजीपाला तर थेट मुंबईच्या बाजारात जातो. मात्र गेल्या काही महिन्यापासून भाजीपाला उत्पादक पूर्णतः खचले आहेत. नगरसह अन्य ठिकाणी भाजीपाल्याला मातीमोल दर मिळत आहे. खचर्ही निघेल एवढाही दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. शेतातून भाजीपाला काढण्याएवढी पैसे होत नसल्याने बाजारात विकण्यापेक्षा जनावरांना चारण्याला पसंती दिली आहे.  भाजीपाल्याचे दर सातत्याने चढउतार होत असतात. आता दर नाही मिळाला तर चार महिन्यांनी दर मिळेल, या आशने भाजीपाल्याची सातत्याने लागवड केली जाते. मात्र नगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरापासून दरात फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे सहजासहजी हार न मानणारा शेतकरी आता भाजीपाला काढणीलाही परवडेना झाला असल्यामुळे पूर्णतः खचला असून नैराश्‍येतून पिकांवर नांगर फिरवत आहे. दर मिळत नसला तरी भाजीपाला शेतात ठेवूनही परवडणारा नाही, म्हणून शेतातच नष्ट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. उत्तरेतील श्रीरामपूर या सधन तालुक्‍यातील सिरसगाव येथील तरुण शेतकरी नितीन गवारे यांनी रविवारी ‘डॉल्बी’ लावून वाजत-गाजत शेळ्या-मेंढ्या आणून त्या एक एकर टोमॅटोच्या पिकांत सोडली. नितीन गवारे यांच्या इश्‍वरी गवारे या अकरा वर्षांच्या मुलीच्या हस्ते आधी फित कापली. आई शशिकला, वडील बाबासाहेब, पत्नी वैशाली आणि मुलगा मंगेश यांच्यासह परिसरातील सुमारे तीनशेच्या जवळपास शेतकरी हजर होते. ‘मातीमोल विकण्यापेक्षा भाजीपाला जनावरांना चारलेला बरा’ असेच या वेळी शेतकरी बोलत होते. आठ दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्‍यातील आनंदवाडी (चंदनापुरी) येथील मुरलीधर सरोदे या शेतकऱ्यांने दर मिळत नसल्यामळे चार एकर फ्लावर व कोबीच्या शेतात रोटाव्हेटर फिरवून संताप व्यक्त केला होता. शेतात शेळ्या-मेढ्या, जनावरे सोडल्यावर नितीन गवारे यांच्या शेतात इश्‍वरी गवारे या अकरा वर्षांच्या मुलीसह गणेश मुदगुले, भारत तुपे, जी. के. पाटील यांनी मत आपले मत मांडून संताप व्यक्त केला. ‘‘शेतमालाला हमीदर मिळावा याची फक्त चर्चा केली जाते. भाजीपाला उत्पादकांना हमीभाव कशाला म्हणतात अजून कळले नाही, कारण कधी हमीभाव मिळण्यासाठी सरकारने प्रयत्नच केले नाहीत. लाखो रुपये खर्च करून भाजीपाला पिकवायचा आणि हमीभाव असलेल्या पिकांपेक्षाहीकमी दरात विकायचा अशी स्थिती आली आहे. तरीही एखादा लोकप्रतिनिधी याबाबतीत तोंड उघडायला तयार नाही. सरकारचे उदासीन धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर आले आहे. नुसते उत्पादन वाढीसाठी सरकार प्रयत्न करतेय, दर कोण देणार. अशीच परिस्थिती राहीली तर आत्महत्या तरी कशा थांबतील?’’

पत्रिका छापून निमंत्रण नितीन गवारे यांनी याआधी कोबी, फ्लावरच्या शेतात जनावरे सोडली होती. मात्र आज शेळ्या-मेंढ्या जनावरे सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे अवाहन करणाऱ्या पत्रिका छापल्या होत्या. सोशल मीडियावरही ती पत्रिका गेल्या आठ दिवसांपासून फिरत होती. ‘‘शेतकऱ्यांचे हाल जगाला कळावेत, त्याची चर्चा व्हावी आणि काहीतरी धोरण ठरावे यासाठी आज वाजत-गाजत शेळ्या-मेंढ्या भाजीपाला पिकांत सोडल्या,’’ असे नितीन गवारे यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com