विकासात शेतकऱ्यांना सर्वाधिक महत्त्व हवे : उपराष्ट्रपती नायडू

 नवव्या ॲग्रोव्हिजन प्रदर्शनाचे उद्‍घाटन
नवव्या ॲग्रोव्हिजन प्रदर्शनाचे उद्‍घाटन

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाबाबत बोलतात; मात्र या विकासात शेतकऱ्याला सर्वाधिक महत्त्व असायला हवे, अशा शब्दांत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केंद्र सरकारचे कान येथे पिळले. शेतीचे संरक्षण करायचे असेल तर शेतकरी हा बँका, सरकार अशा सगळ्यांच्या कामाचा केंद्रबिंदू हवा, अशी सूचनाही श्री. नायडू यांनी केली.

नवव्या ॲग्रोव्हिजन प्रदर्शनाचे उद्‍घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १०) झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर  उपस्थित होते. गोसीखुर्द प्रकल्पाच्या मुख्य उजव्या कालव्याचे तर नेरला उपसा सिंचन योजनेचे यावेळी ई-जलपूजन उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले.

उपराष्ट्रपती श्री. नायडू म्हणाले, खेड्यांमध्ये संसाधनांची उपलब्धता आणि शेतीला वीज, पाणी याशिवाय देशाचा विकास अशक्‍य आहे. गावखेड्यांमध्ये रस्त्यांची दुरावस्था आहे. परंतु या रस्त्यांच्या कामाची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे राहते. रस्ते नसल्याने गावात एडीओ, बीडीओ, कलेक्‍टर आणि ट्रॅक्‍टर पण येऊ शकत नाही. अशा अनेक कारणांमुळे खेड्यांचा विकास थांबला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रस्ते विकासावर भर दिला गेला पाहिजे. शेतकऱ्यांना मोफत काहीच नको, परंतु त्यांना हवी असलेली वीज, पाणी आणि संशोधन हे मात्र त्यांना अपेक्षेप्रमाणे दिले गेले पाहिजे.

शेतकरी आत्महत्या कोणत्या सरकारचा दोष आहे, याचा विचार केल्यापेक्षा या थांबविण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करण्याची गरज आहे. आजवर शेतीक्षेत्र दुर्लक्षित राहिले, अशी खंतही त्यांनी व्यक्‍त केली. शेतकरी पूर्वी असंघटित होता; आता तो संघटित होऊ लागला आहे. आपले प्रश्‍न प्रखरपणे मांडू लागला. परंतु संघटित होणाऱ्या अशा शेतकऱ्यांनी आपले आंदोलन हिंसक होणार नाही, याकडेदेखील लक्ष्य दिले पाहिजे.

सहा हजार कोटींचा नवा प्रकल्प महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगड, ओरिसा या राज्याकरिता जागतिक बॅंकेच्या निधीतून नवा प्रकल्प लवकरच जाहीर होणार असल्याची घोषणा केली. सहा हजार कोटींची तरतूद याकरीता केली जाणार असल्याचे केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. गोसी खुर्द प्रकल्प येत्या २०१९ पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. विदर्भातील सात प्रकल्प लवकरच पूर्ण होणार असून त्याकरीता ३० हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे. यातून दहा लाख हेक्‍टर सिंचन विदर्भात वाढीस लागेल. त्यासोबतच दहा हजार कोटी रुपयांची तरतूद आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण करण्याकरीता तरतूद केल्याचे त्यांनी सांगीतले.

या माध्यमातून राज्याचे सिंचन २२ टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत नेण्याचे प्रस्तावीत आहे. राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आपले जलसंधारण बजेट २४ हजार कोटीपर्यंत नेले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. देशातील ३८५ प्रकल्प पूर्ण केले जाणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातील ७० प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांच्या पूर्णत्वाबाबतदेखील सरकार गंभीर आहे. नेर, तापी, नर्मदा या प्रकल्पासाठी आम्हीदेखील काम करतो आहे.

कृषिसाठी कठोर निर्णय : मुख्यमंत्री बीटी बियाण्यावर यावर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. या किडीच्या नियंत्रणासाठी बेसुमार कीटकनाशकाचा वापर करावा लागला. या घटनांमध्ये काही शेतकऱ्यांचे बळी गेले. अशा घटना नियंत्रित आणण्यासाठी लवकरच बियाणे आणि कीटकनाशकांसदर्भाने कठोर निर्णय घेतले जाणार आहेत. त्याकरीता राज्याचे कृषी मंत्रालय काम करीत असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना दिली. राज्यात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. राज्यात जलयुक्‍तच्या माध्यमातून २१ लाख हेक्‍टर क्षेत्र वाढले. त्याकरीता १ लाख विहिरींचा व जलसंधारणाच्या कामाचा उपयोग झाला. गोसी खुर्दला २००९ पासून प्रशासकीय मान्यताच कोणी दिली नाही. आम्ही निधीची तरतूद करून २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचा निश्चय केला. शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहणासाठी पाचपट पैसे दिले तर गावाच्या पुनर्वसनासाठी ७०० कोटीची तरतूद केली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

२५ नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफीचे पैसे खात्यांत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांत कर्जमाफीचे पैसे २५ नोव्हेंबरपर्यंत जमा होतील, अशी घोषणादेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

शेतीप्रश्नांची, शेतकऱ्यांची योग्य दखल घ्या मी एकदा संसदेत ५२ मिनिटं अतिशय अभ्यास करून एकदम भारी भाषण केलं. शरद पवार, स्वामीनाथन सगळ्यांनी माझं अभिनंदन केलं, चांगलं बोललो म्हणून. मी खूश झालो. दुसऱ्या दिवशी पेपर उघडून पाहिले, तर एक शब्दही नव्हता. शेतीकडे हे एवढे दुर्लक्ष केले जाते. प्रसारमाध्यमांनी शेतीप्रश्नांची, शेतकऱ्यांची योग्य दखल घ्यायला हवी, शेतकऱ्यांना न्याय द्यायला हवा, अशी अपेक्षा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली.

उपराष्ट्रपती म्हणाले...

  • मी स्वतः शेतकरी आहे. शेतकरी असल्याचा मला गर्व आहे.
  • शेतकऱ्यांना मोफत काही नको आहे. सिंचन, २४ तास वीज, मालाला बाजारभाव द्या. शेतकरी तुमच्याकडं काहीच मागायला येणार नाही.
  • व्यापाऱ्याला ज्याप्रमाणे देश आणि विदेशात माल विक्रीची बंधने नाहीत तोच निकष शेतमालाच्या विक्रीसाठी असला पाहिजे
  • पीक वैविध्यता, मूल्यवर्धन, प्रक्रिया, मार्केट लिंकेजेस यावर भर देऊन शेतकऱ्यांना निर्यातीसाठी विशेष साहाय्य करायला हवे.
  • अॅग्रिकल्चर हेच कल्चर आहे, त्यासाठी सर्वांनी पुढं यायला हवं.
  • विदर्भात एवढं सगळं होऊनही शेतकरी शेती सोडत नाहीयेत, ही खूप चांगली गोष्ट आहे.
  • सरकारने शेतकऱ्यांच्या मुलांना इतर उद्योग व्यवसायात संधी देण्यासाठीही पुढे आले पाहिजे.
  • गोसी खुर्द राजीव गांधींच्या काळात सुरू झालं, त्याचा उजवा कालवा व निराला प्रकल्पाचे उद्‍घाटन आम्ही आज केलं.
  • देशात स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेतीकडे दुर्लक्ष झाले नाही, पण जेवढे लक्ष द्यायला हवं होतं, तेवढं दिलं नाही.
  • ग्राहकांबरोबरच शेतकऱ्यांचेही संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. शेकऱ्यांकडे लक्ष द्यायलाच हवे.
  • मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशातली सर्वात कर्जमाफी दिली. ठीक आहे. पण शेतकऱ्यांना मोफत काही नको आहे. त्यांना जे द्यायला पाहिजे ते द्या.
  • महाराष्ट्र सरकारचे प्राधान्य सिंचन, शेतीला आहे ही फार चांगली गोष्टी.
  • सगळ्याच पक्षांनी राज्य केलंय, कुणाला दोष देण्यात अर्थ नाही
  • सगळे आपल्या मुलांना आपल्या व्यवसायात आणतात, पण शेतकऱ्यांना मुलांनी शेतीत यावं असं वाटत नाही, कारण शेती तोट्याची होत चाललीये.
  • उत्पादन खर्च वाढत व उत्पन्न घटत चाललंय. सरकारं कुणाचीही असोत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा, आत्महत्या थांबवा.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com