शेतकरी आत्महत्या हे बाजारकेंद्रित विकासाचं कुरूप फळ

शेतकरी आत्महत्या हे बाजारकेंद्रित विकासाचं कुरूप फळ
शेतकरी आत्महत्या हे बाजारकेंद्रित विकासाचं कुरूप फळ

सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदा, गुजरात) : भारत हा खेड्यांचा देश आहे व कृषी संस्कृती हीच या देशाची संस्कृती आहे. देशाचा पोशिंदा बळिराजा शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या ही आपल्या बाजारकेंद्रित विकासाचं कुरूप फळ आहे, असे परखड मत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी येथे व्यक्त केले. श्री. देशमुख म्हणाले, ‘‘मी ललित लेखक असल्यामुळे आकडेवारीतून प्रश्न सांगण्याऐवजी मानवी संवेदनेच्या संदर्भात प्रश्न-दु:ख मांडणं माझी स्वाभाविक प्रवृत्ती आहे. आज मला सत्ताधारी पक्ष व शासनाला हा सवाल करायचा आहे, की आपण जागे कधी होणार?’’ बडोदा येथे ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त गुर्जर साहित्यक रघुवीर चौधरी यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.१६) येथे झाले. या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, स्वागताध्यक्ष राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड, मावळते अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, पद्मश्री डॉ. सीतांशू यशचंद्र, बडोदा वाड.मय परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोपकर उपस्थित होते.  श्री. देशमुख म्हणाले, ‘‘मध्यंतरी एका बातमीने माझे लक्ष वेधले. ‘शेतकरी घरातील स्त्रियांना नवरा हवा आहे. शिपाई पण चालेल, पण शेतकरी नको’ त्या बातमीत दरमहा २० हजार रुपये शेतीतून उत्पन्न कमावणाऱ्या एका शेतकऱ्याची सत्यकथा आली आहे. गेली दहा वर्षे त्याला एकही मुलगी चांगली शेती असूनही पसंत करत नाही. मागच्या वर्षी या संदर्भात काही गावांचं सर्वेक्षण झालं होतं, त्यातून शेती करणाऱ्या तरुणांचं लग्न होणं किती कठीण झालं आहे, हे विदारक चित्र समोरं आलं आहे. त्यामुळे व शेती परवडत नसल्यामुळे मागील काही वर्षात एक कोटीहून जास्त शेतकऱ्यांनी शेती सोडली आहे. जे शेती करतात ते नाईलाजानं. त्यांना दुसरा रोजगार मिळाला असता तर त्यांनीही शेती सोडली असती.’’ ‘‘दंडकारण्य भागात आदिवासींवर अन्यायाची परिसीमा झाली, म्हणून त्यातून नक्षलवाद जन्मला. आपल्याला हे शेतकऱ्यांच्या संदर्भात परवडणारं नाही. शेतकरी सोशिक आहे, त्याचं काळ्या आईवर प्रेम आहे व न परवडणारी शेती करीत तो देशाचं पोट भरत आहे. सबब आपण समाज व सरकार त्यांचं जगणं कसं सुखाचं करणार आहोत, हा या घडीचा कळीचा प्रश्न  आहे.’’     आपण कधी जागे होणार?   ‘‘जगण्यासाठी शिक्षण-आजारपणासाठी पुरेसं उत्पन्न काबाडकष्ट करूनही मिळत नसेल, आत्महत्येला प्रवृत्त करत असेल, धड लग्नही होत नसेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं? एकेक शेतकऱ्याचं जगणं आणि एकेक शेतकरी आत्महत्या इथल्या व्यवस्थेला आव्हान देत आहे की, तुमची धोरणं व विकासनीती आमच्यासाठी कामाची नाही. या साऱ्यांवर अनेक लेखक-कवींनी हृदय पिळवटून टाकणारं लिहिलं आहे, मीही लिहिलं आहे... आज मला सत्ताधारी पक्ष व शासनाला हा सवाल करायचा आहे, की आपण जागे कधी होणार? किती काळ आपण असा अंत पाहणार आहात शेतकऱ्यांचा?’’ असा सवाल संमेलनाध्यक्ष श्री. देशमुख यांनी व्यक्त केला आहे. ‘राजा तू चुकलास, तू सुधारलं पाहिजे’ ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होत असताना सरकार केवळ मूक साक्षीदार का होते,’ असा सवाल करत, ‘राजा तू चुकत आहेस, तू सुधारलं पाहिजेस’, असा थेट सल्ला सरकारला स्पष्टपणे देत साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सरकारवर थेट हल्ला चढविला.  अभिजात दर्जासाठी पंतप्रधानांना आग्रह ‘‘मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी संपूर्ण प्रक्रियाही वेळोवेळी पूर्ण केली. आता लवकरच साहित्यिकांचे शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आणि अभिजात दर्जासाठी आग्रह धरणार,’’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. तसेच पुढील वर्षीपासून साहित्य संमेलनाचे अनुदान २५ लाखांवरून ५० लाख रुपये करण्याचेही त्यांनी जाहीर केले.  मुख्यमंत्र्यांनी गुजरातमध्ये जाऊन गुजराती भाषेचे, लोकांचे कौतुक केले म्हणून काहींना खटकेलही. त्यावर एखादा ‘रोखठोख’ अग्रलेखही प्रकाशित होऊ शकतो. पण, मला त्याचे काही वाटत नाही, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. सयाजीरावांना ‘फॉलो’ न केल्यानेच विकास लांबला शंभर वर्षांपूर्वी सयाजीराव गायकवाड यांनी लोककल्याणासाठी केलेल्या कामांना आणि त्यांच्या दूरदृष्टीला नंतरच्या काळात आपण ‘फॉलो’ केले असते, तर फार पूर्वीच विकासाचा मार्ग गवसला असता, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. सयाजीरावांच्या उल्लेखनीय कारकीर्दीतील उदाहरणेही त्यांनी दिली. बडोद्यातील ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रसाधने’ या बारा खंडांचे प्रकाशन करण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com