अकोला जिल्ह्यात कृषी संजीवनी प्रकल्पात निवडलेल्या गावांत शेतीशाळा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला  : सध्या हवामान बदलामुळे शेती क्षेत्रासमोर असंख्य अडचणी तयार झाल्या असून काळ सुसंगत उपाययोजना करीत उत्पादकता वाढवण्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राज्यातील १५ जिल्ह्यांत राबवला जात अाहे. यात अकोल्यातील ४९८ गावे निवडण्यात अाली असून पहिल्या टप्प्यात १०५ गावांमध्ये या हंगामापासून प्रत्यक्ष कामाला सुरवात होत अाहे. निवडलेल्या प्रत्येक गावात पीक प्रात्यक्षिक देणार असून शेतीशाळा घेतली जाईल, अशी माहिती या प्रकल्पाचे राज्याचे संचालक विकास रस्तोगी यांनी दिली.

नियोजन बैठकीच्या अनुषंगाने श्री. रस्तोगी हे अापल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह गुरुवारी (ता. १४) अकोल्यात अालेे होते. या वेळी त्यांनी ‘ॲग्रोवन’ला माहिती दिली. जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची राज्यातील १५ अवर्षणग्रस्त जिल्हे व खारपाणपट्ट्यात अंमलबजावणी केली जात अाहे. प्रकल्पाच्या माध्यमातून हवामान बदलास अनुसरून कृषी पद्धती विकसित करणे, अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादकतेत वृद्धी करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढववण्यासाठी कृषी मूल्य साखळीमध्ये त्याचा सहभाग वाढवणे, राज्यातील अवर्षणग्रस्त व खारपाणपट्टा असलेल्या जळगाव, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशीम, यवतमाळ, नाुंदेड आणि लातूर या १५ जिल्ह्यांची निवड करण्यात अाली अाहे.

जिल्ह्यात शेतीशाळांची कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून अंमलबजावणी केली जाणार असून, त्यात विद्यापीठाचे शिफारशीत केलेले तंत्रज्ञान शिकवले जाईल. या शेतीशाळेदरम्यान किमान ८ वेळा तज्ज्ञांच्या भेटी राहणार अाहेत. हे तज्ज्ञ गावातील शेतकऱ्यांना प्रशिक्षित करतील.

अकोला जिल्ह्यातील १९ गावांचे यंत्रणांनी सुक्ष्मनियोजन केले अाहे. या प्लॅनला जिल्हास्तरीय समिती येत्या दोन तीन दिवसांत मंजुरी देणार असून त्याची तत्काळ अंमलबजावणी सुरू केली जाईल. शेतकऱ्यांना अार्थिकदृष्ट्या सक्षम करणे, लागवड ते कापणी अाणि नंतर प्रक्रीया, मार्केटिंग अशा विविध स्तरावर सक्षम केले जाईल. शेतकरी उत्पादक कंपन्यांचाही यात सहभाग घेतला जाणार अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com