शेतमाल खरेदी बंदमुळे शेतकऱ्यांची ससेहोलपट

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : हमाल-कामगारांच्या बेमुदत संपामुळे तब्बल आठवडाभरापासून परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमालाची लिलावाद्वारे केली जाणारी खरेदी बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अन्य ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये शेतमाल विक्रीस न्यावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची नाहक ससेहोलपट होत आहे. दुसरीकडे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्यामुळे बाजार समितीचे शुल्क तसेच राज्य सरकारचे उत्पन्नदेखील बुडत आहे.

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत हमाल कामगारांचा संप तसेच व्यापाऱ्यांचा बंद मागे घेण्याबाबत कोणताही तोडगा निघत नसल्यामुळे बुधवारी (ता. २९) देखील बाजारपेठेतील शेतीमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद होते. माथाडी कामगार कायदा लागू करावा या मागणीसाठी हमाल-कामगारांनी गुरुवार (ता. २२) पासून बेमुदत संप सुरू केला आहे; परंतु व्यापारी मात्र या कायद्याची अंमलबजावणी करण्यास राजी नाहीत.

हमाल-कामगारांच्या संपापाठोपाठ सोमवार (ता. २७) पासून नवा मोंढा भागातील मार्केट व्यापारी महासंघाने बेमुदत बंद सुरू केला आहे. या बंदमध्ये मार्केट यार्डावरील कृषी निविष्ठा विक्रेतेदेखील सहभागी झाले आहेत. बुधवारी हमाल कामगारांच्या संपाला सात दिवस तर व्यापाऱ्यांच्या बंदला तीन दिवस झाले.

बाजार समितीच्या यार्डावरील कापूस तसेच अन्य शेतीमालाची खरेदी बंद असल्यामुळे सुमारे पाच ते सहा कोटी रुपयांची उलाढाल झाली नाही. त्यामुळे बाजार समितीचे पाच लाख रुपये शुल्क, तसेच शासनाची २५ हजार रुपये सुपर व्हिजन फी बुडाली आहे.

हमाल कामगारांचा संप सुरू झाल्यानंतर कापूस खरेदी तसेच अडतीवर भुसार शेतीमालाची लिलावाव्दारे केली जाणारी खरेदी तसेच आधारभूत किंमत खरेदी केंद्रावरील मूग, उडीद, सोयाबीनची खरेदीदेखील बंद झाली आहे; परंतु मार्केट यार्डावरील किरकोळ व्यापाऱ्यांकडून शेतीमालाची खरेदी केली जात होती. हमाल-कामगारांचा संप सुरू असतानाच सोमवार (ता. २७) पासून व्यापारी महासंघाने बंद सुरू केल्यामुळे ऐन कापूस खरेदी हंगामामध्येच शेतीमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार बंद आहेत.

परभणी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मानवत, बोरी आदी ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये कापूस तसेच शेतमाल विक्रीस न्यावा लागत आहे. त्यामुळे नाहक वाहन खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागत असून शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे. मात्र  शेतकरी संघटना, राजकीय पक्ष मूग गिळून गप्प आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com