उगाव, खडक माळेगाव, बेहडलाही झाला रोख द्राक्ष विक्रीचा ठराव

उगावलाही झाला रोख विक्रीचा ठराव
उगावलाही झाला रोख विक्रीचा ठराव

नाशिक : शिवडी, सारोळे खुर्द, चिंचखेडनंतर आता उगाव येथेही द्राक्षाची रोख विक्री करण्याचा ठराव करण्यात आला. बुधवारी (ता. 28) उगाव, खडक माळेगाव, बेहड या गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येत रोख विक्री करण्याची शपथ घेतली. गुरुवारी (ता. 1) निफाड, कुंदेवाडी, देवपूर, नांदुर्डी, रौळस पिंप्री, कसबेसुकेणे येथील गावांमध्ये या विषयावर ग्रामसभा होणार आहेत.

वर्षभर जपलेला माल व्यापारी उधारीवर घेतो अन पैसे घेऊन परप्रांतात पळून जातो. चेक बाउन्स होतो. शिवारसौद्यात खरेदी करूनही अडत तसेच 2 टक्के वापसीच्या नावाखाली अडवणूक केली जाते. हे प्रकार वर्षानुवर्षे होत असताना नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता अशा व्यापाऱ्यांची मनमानी पूर्णपणे नाकारायचे ठरवले आहे. अस्वस्थ शेतकऱ्यांनी आता कुणाच्याही दबावाला बळी न पडता एकत्र येऊन आपल्या मालाची रोख स्वरूपातच विक्री करायचे ठरवले आहे. शिवडीच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रोख विक्रीचा ठराव केल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील अनेक गावे आता यासाठी सरसावली आहेत. उधारीसह, अडत, 2 टक्के वापसी बंदचा ठराव नाशिक जिल्ह्यातील शिवडीच्या ग्रामस्थांनी सोमवारी (ता. 26) केल्यानंतर मंगळवारी (ता. 27) सारोळे खुर्द, चिंचखेड या गावांतही ग्रामसभांमधून व्यापाऱ्यांच्या मनमानी विरोधात ठराव करण्यात आले.

सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांनी रोख विक्रीचा निर्णय घेत व्यापाऱ्यांच्या मनमानीला आळा घातला आहे. नाशिक जिल्ह्यात मात्र व्यापाऱ्यांकडून ही अडवणूक सुरूच आहे. चुकीचे काम करणाऱ्या व्यापाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी आता शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे.

दोन वर्षांपूर्वी वडनेर भैरव येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा तसेच रोख विक्री करण्याचा ठराव केला होता. त्या वेळी त्या व्यापाऱ्यांनी वडनेर भैरव वगळून परिसरातील इतर गावांतून मोठ्या प्रमाणात उधारीवर माल उचलून शेतकऱ्यांना कोट्यवधीचा गंडा घातला होता. आता अनेक गावांतील शेतकरी एकत्र येऊन ठराव करीत आहेत. यामुळे व्यापाऱ्यांच्या अडवणुकीला प्रतिबंध होईल, असा विश्‍वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला. ‘‘दर्जेदार उत्पादनासाठी अहोरात्र कष्ट करणारे शेतकरी आता आपल्या बाजार सुरक्षेसाठी एकत्र येत आहेत. यामुळे येत्या काळात होणारी अडवणूक थांबेल.’’ - कैलास भोसले, अध्यक्ष, मध्यवर्ती विज्ञान समिती, राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे.

‘‘आता आपला माल रोखीनेच विक्री करायचा. कोणतीही अडत किंवा वापसी द्यायची नाही, असा आमच्या गावाच्या ग्रामसभेत शेतकऱ्यांनी ठराव केला आहे.’’ - प्रभाकर शिरसाठ, द्राक्ष उत्पादक.

""मागील तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रोख विक्रीचा ठराव केला आहे. आजच एका व्यापाऱ्याने अडत, वापसी न घेता रोख पेमेंटवर व्यवहार केला आहे. या आंदोलनाचा योग्य मेसेज व्यापाऱ्यांपर्यंत जाण्यास सुरवात झाली आहे.'' - वैभव संधाण, द्राक्ष उत्पादक.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com