पुणे जिल्ह्यातील तेरा हजारांवर शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे   ः भात पीकवाढीच्या अवस्थेत असताना त्यावर करपा व तुडतुडे यांचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे गतवर्षी खरीप हंगामात भात उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीच्या भरपाईपासून सुमारे १३ हजार ३३१ शेतकरी वंचित आहे. ही नुकसानभरपाई मिळविण्यासाठी कृषी विभागाचे उंबरठे झिजवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ही नुकसानभरपाई शासन कधी देणार असा सवाल नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत.

गतवर्षी पश्‍चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्‍यांत ५८ हजार ६७० हेक्‍टरवर भाताची लागवड झाली होती. हवामानातील बदल, वाढते तापमान, कमी अधिक प्रमाणात होणारा पाऊस आणि बियाणे बदल न केल्यामुळे भात पिकावर करपा व तुडतुड्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. त्याबाबत तज्ज्ञांनीही पाहणी करून चिंता व्यक्त केली होती. शेतकऱ्यांना तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या होत्या. मात्र, झालेला प्रादुर्भाव आटोक्‍यात न आल्याने मोठे नुकसान झाले होते.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भात पिकाचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळण्यासाठी संबंधित अहवाल जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे पाठविला होता. परंतु, अद्याप या नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही.

या अहवालात आंबेगाव, भोर, मुळशी, हवेली आणि खेड तालुक्‍यांतील ६८ हजार ४१३ शेतकऱ्यांनी २६ हजार ९७१ हेक्‍टरवर भात पिकांची लागवड केली आहे. त्यापैकी १३ हजार ३३१ शेतकऱ्यांचे ४९२९. ४० हेक्‍टर क्षेत्र ३३ टक्केपेक्षा अधिक बाधित झाले आहे. त्यासाठी जिरायती क्षेत्राप्रमाणे हेक्‍टरी सहा हजार ८०० रुपयेप्रमाणे तीन कोटी २२ लाख ९१ हजार ४३२ रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.  

करपा, तुडतुड्याच्या प्रादुर्भावामुळे तालुकानिहाय झालेले नुकसान व अपेक्षित निधी

तालुका शेतकरी संख्या झालेले नुकसान (हेक्‍टर) अपेक्षित निधी (रुपये)  
भोर १२,६२७      ४७१६ ३,२०,६२०००
हवेली १० ३.७४ २५,४३२
खेड ४७ ३० २,०४,०००
आंबेगाव   १३९ १०६ -
मुळशी ५०८ ७३.६६ -
एकूण १३,३३१ ४९२९.४० ३,२२,९१,४३२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com