कांदा चाळ अनुदानापासून पुणे जिल्ह्यातील पाच हजार शेतकरी वंचित

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे   ः कमी दरामुळे कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. त्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा चाळ उभारणीसाठी इच्छुक आहेत. मात्र, कृषी विभागाकडून कांदा साठवणुकीसाठी अपुरा निधी दिला जात आहे. पुणे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने प्राप्त ५५७२ अर्जापैकी अवघ्या ५१५ शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारणीसाठी पूर्वसंमती दिली आहे. मात्र पुरेसा निधी न मिळाल्यामुळे चालू वर्षी सुमारे पाच हजार ५७ शेतकऱ्यांना कांदा चाळी उभारणीच्या अनुदानापासून वंचित राहावे लागणार असल्याचे चित्र आहे.      

यंदा कांदा चाळीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने सुमारे २ कोटी ६७ लाख रुपये अनुदान वाटपाचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यासाठी जुलै-आॅगस्टमध्ये अर्ज मागविण्यात आले होते. अर्जाची लॉटरी पद्धतीने निवड केली असून, लवकरच निवड केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे.

मात्र, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडे आत्तापर्यंत राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून दीड कोटी रुपये, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून ९८. ४९ लाख रुपये असा एकूण दोन कोटी ४८ लाख ४९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे चालू वर्षी ५१५ शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असल्याची शक्यता आहे. उर्वरित शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे. तरीही ५१५ शेतकऱ्यांव्यतिरिक्त अजून काही शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.

चांगले उत्पन्न मिळण्यासाठी शेतकरी कांद्याची साठवणूक करून टप्याटप्याने विक्री करण्यावर भर देत आहे. त्यासाठी कांदा चाळीची उभारणी केली जाते. मात्र, आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेक शेतकरी कृषी विभागाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाची मदत घेत आहे. बाजारात कांद्याला कमी अधिक दर असले तरी पाणीटंचाईमुळे आगामी काळात कांद्याचे दर वाढण्याची अपेक्षा गृहीत धरून शेतकऱ्यांचा कल कांदा पिकांकडे आहे. परंतु कमी दर असल्यामुळे उत्पादित झालेल्या कांद्याची साठवणूक करण्यासाठी शेतकरी कांदा चाळ उभारणीवर भर देत आहे. त्यासाठी शासनाकडून ५० टन कांदा साठवणुकीसाठी ८७ हजार ५०० रुपयांपर्यत अनुदान दिले जाते, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com