माळशिरस ठिबक अनुदान गैरव्यवहार कारवाईला गती

माळशिरस ठिबक अनुदान गैरव्यवहार कारवाईला गती

सोलापूर ः माळशिरस तालुक्‍यातील ठिबक सिंचन अनुदान योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी नेमलेल्या विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे समितीच्या चौकशी अहवालात सुमारे साडेदहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवला आहे. त्यानुसार या प्रकरणातील दोषी अधिकारी, कर्मचारी, वितरक कंपन्यांची माहिती संकलनाचे काम अंतिम टप्प्यात असून दोषींवर लवकरच फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत. ‘सकाळ’ आणि ‘ॲग्रोवन''ने हे प्रकरण चार वर्षांपूर्वी पहिल्यांदा उघडकीस आणले. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावाही केला. संपूर्ण राज्यात गाजलेल्या या प्रकरणाच्या कारवाईला आता मात्र गती येत असल्याचे दिसत आहे.  माळीनगरचे कृषिभूषण सुरेश वाघधरे यांनी यासंबंधीची तक्रार केली होती. पण त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नव्हती. त्यानंतर त्यांनी लोकायुक्तांकडे धाव घेतली. लोकायुक्तांच्या आदेशानंतर शासनाने चौकशीसाठी कृषी खात्याचे विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे (पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांची समिती नियुक्त केली होती. त्या समितीनेही अहवालात चालढकल केली. पण लोकायुक्तांनी या समितीला गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधितांवर गुन्हे दाखल करून अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले होते. त्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी पंढरपूरचे उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. तेच ही सगळी प्रक्रिया पूर्ण करत आहेत. त्यानुसार वितरक, कंपन्यांची सविस्तर माहिती संकलित केली जात आहे. वितरकांच्या परवाने नूतनीकरणाची प्रक्रिया जिल्हा स्तरावर झाली असल्याने त्यांच्याकडून संबंधितांचे संपूर्ण नाव, पत्ता याबाबतची माहिती मागवली जात आहे. पोलिसांनी तशा सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत. त्यानंतरच हा गुन्हा दाखल होणार आहे.  ...मग राज्यात किती? या संपूर्ण प्रकरणात माळशिरस तालुक्‍यातील १८ हजार ३०५ प्रकरणांपैकी फक्त साडेचार हजार प्रकरणांच्या चौकशीत साडेदहा कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. आणखी इतर प्रकरणांची चौकशी तातडीने करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आहे. याशिवाय एकट्या सोलापूर जिल्ह्यातील एका तालुक्‍यात एवढा गैरव्यवहार तर राज्यातील अन्य जिल्ह्यांची परिस्थिती काय असू शकते, असाही प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com