येवला तालुक्‍यात रब्बीचे भवितव्य पालखेडच्या आवर्तनावर

येवला तालुक्‍यात रब्बीचे भवितव्य पालखेडच्या आवर्तनावर
येवला तालुक्‍यात रब्बीचे भवितव्य पालखेडच्या आवर्तनावर

येवला : खरिपालाच पाणी नव्हते. आजतर प्यायलाही पाण्याची वानवा आहे. अशा स्थितीत रब्बी निघेल का, हा प्रश्‍न हास्यास्पद ठरावा, अशी स्थिती तालुक्‍यात आहे. मात्र, पालखेड डाव्या कालव्याला महिनाभराचे एक आवर्तन मिळणार असल्याने या पाण्यावर लाभक्षेत्रातील ४२ गावांत रब्बीचा काहीसा आशावाद जागा झाला आहे. त्यातही उपलब्ध पाण्यावर कांदा काढण्याला शेतकऱ्यांचे प्राधान्य आहे.

खरीप हंगामातील पिके पावसाअभावी पूर्ण वाया गेली आहेत. जून-जुलैमध्ये रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती, परंतु पुन्हा पाऊस पडला नाही. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली. पिके जागेवर करपल्याने खरीप वाया गेला आहे. खरिपात शेतीला लावलेले भांडवलही मका, कांदा, सोयाबीन, कपाशीची झालेली वाताहत पाहता मिळत नाही. यामुळे चिंताग्रस्त शेतकरी, वरुणराजाने अवकाळी चमत्कार करून पाऊस पाडून रब्बी फुलवावा, अशी वाट पाहून आहेत.

टंचाईमुळे शेतकऱ्यांनी रब्बीच्या नादी न लागता लाल कांद्यात अधिक क्षेत्र गुंतवले असून, काहींनी उन्हाळ कांद्याचे नियोजन केले आहे. पालखेडच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी महिन्याच्या आवर्तनाच्या भरवशावर कांदा व काही प्रमाणात गहू आणि मोठ्या प्रमाणात हरभरा, ज्वारीचे नियोजन केल्याचे दिसते. येणाऱ्या सिंचनाच्या आवर्तनातून शेततळे भरून ठेवून रब्बीची पिके कशीबशी काढण्याचाही मनसुबा शेतकऱ्यांचा आहे. तालुक्‍याचे खरिपाचे क्षेत्र ५३ हजार हेक्‍टर असताना, ६८ हजारांवर क्षेत्रात पेरणी झाली होती. मात्र, रब्बीचे क्षेत्र १३ हजार ४८६ हेक्‍टर असताना, तीन हजारांपर्यंत पेरणी होते की नाही याविषयी साशंकता आहे.

कायमस्वरूपी असलेला हा दुष्काळी तालुका रब्बीमुक्त होतो की काय, याची भीती वाटत आहे. तालुक्‍याच्या शासकीय नोंदीत १२४ पैकी ५२ गावेच रब्बीची आहेत. तथापि, शंभरवर गावांत रब्बीची पेरणी होते, पण पालखेड डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या ४२ गावांत हंगाम निघण्याची शाश्‍वती असते. मात्र, आजचे या भागातील चित्र अजूनही गोत्यातच असल्याचे दिसते.

रब्बीचे क्षेत्र असे (हेक्‍टरमध्ये)

पीक  येवल्यातील सरासरी क्षेत्र  जिल्ह्याचे प्रस्तावित क्षेत्र
ज्वारी १३६०   ४४२०
गहू  ८०२३ ७००००
मका २४   ३०००
हरभरा   ४१०३ ४१०००
कांदा  ११५२५ ०००
बाजरी ०००  २००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com