अनियमित पावसामुळे पेरणी वाया जाण्याची भीती

अनियमित पावसामुळे पेरणी वाया जाण्याची भीती
अनियमित पावसामुळे पेरणी वाया जाण्याची भीती

औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाच्या अनियमिततेचा खेळ पुन्हा एकदा अनुभवायला येतो आहे. ढगांची गर्दी, पण शिडकाव्यापलीकडे पाऊस नाही. त्यामुळे पाऊस येईल या आशेवर पेरणी करणारे शेतकरी चिंतेत पडले असल्याचे, तर ज्यांनी जूनच्या अखेरीस पेरणी केली त्यांच्यावर पावसाअभावी पेरलेले पीक मोडण्याची वेळ आल्याचे चित्र पहायला मिळते आहे. जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील बहुतांश भागात स्थिती चिंताजनक अशीच आहे.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या डोमगाव शिवारात अजून पेरणी नाही. बुधवारी (ता. ११) एकीकडे फुल्या पाडणे व दुसरीकडे कपाशीची लागवड करण्याचे काम शेतकऱ्यांनी हाती घेतले होते. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्‍याला लागून असलेल्या अंबड तालुक्‍यातीलच अंकुशनगर, राजेशनगर, साष्टेपिंपळगाव शिरातही डोमेगावप्रमाणेच स्थिती होती. डोमेगावच्या आसपासच्या झोडेगाव, वडी लासुरा, सोनक पिंपळगाव, चिंचखेड करडगाव आदी पाच ते सहा गाव शिवारात हीच स्थिती असल्याची माहिती शेतकरी जगन्नाथ रनमळे यांनी दिली. पुरेसा पाऊस ओल नसली तरी कपाशीची लागवड करतोय. कवर वाट पहावं आता, अंदाज आहे पाऊस येण्याचा, मग येईलच, या आशेवर पेरणी करीत असल्याचे अर्जुन भिंगारे म्हणाले.

अंबड तालुक्‍यातील साष्टे पिंपळगाव, राजेशनगर शिवारातही कपाशी लागवड व तूर पेरणीचे काम सुरू होते. जी पिकं पेरायची होती त्यांचा कालावधी पाऊसच न झाल्याने हातचा गेला. मग आता निव्वळ तुरीची पेरणी करण्याचा प्रयत्न साष्टे पिंपळगाव शिवारात सुरू असल्याचे दिसून आले. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यातील सैदापूर शिवारातही आजघडीला कपाशीची लागवड सुरू आहे.

पेरलेले मोडण्याची वेळ जालना जिल्ह्यातील वखारी येथील निवृत्ती घुले यांनी २२ जूनला आधी पडलेल्या पावसाच्या भरवशावर दीड एकर सोयाबीनची पेरणी केली. हवामान खात्याचा अंदाज व इतरांचाही अंदाज पाऊस असल्याने पेरणी केली. परंतू नंतर पिकाची उगवण चांगली होण्याइतपत पाऊस पडला नाही. त्यामुळे उगवण ४० टक्‍क्‍यांपुढे गेली नाही. शिवाय त्यानंतरही पाऊस अपेक्षित होत नसल्याने १२ जुलैला त्यांनी पेरलेले सोयाबीन मोडण्याच निर्णय घेतल्याची माहिती श्री. घुले यांनी दिली.

पुरेशी ओल नाहीच. ६ जूनला पाऊस आला होता. त्यानंतर आता कालपरवा थोडा पडला. कुठवर थांबावं, पाऊस येईल, असा अंदाज हाये; त्यामुळं फुल्या पाडून कपाशीची लागवड करतोय. - अर्जुन भिंगारे, शेतकरी डोमेगाव, जि. जालना

एकीकडं शेतमालाला भाव नाही. दुसरीकडं पाऊसही असा करतोय. घरची व काही ठोक्‍यानं शेती करतो. पिकं पेरणीची वेळ निघून चालली, पण पाऊस न पडल्यामुळं शेतकऱ्यांना देशोधडीला लागण्याची येळ आली. -जगन्नाथ रनमळे, शेतकरी डोमेगाव जि. जालना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com