ससून डॉक मत्स्योद्योग सहकारी संस्थेची भरारी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई ः रायगड जिल्ह्यातील एका छोट्या गावात खलाशी म्हणून मासेमारी करत जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर केशव बुधाजी कोळी यांनी सुरू केलेला मासे प्रक्रिया उद्योग या क्षेत्रात धडपडणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

जिल्ह्यातील मौजे कंठवली (ता. उरण) येथे कोळी यांनी २५ वर्षांपूर्वी मासेमारीच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. छोट्या रोपट्याचे आज ससून डॉक मत्स्योद्योग सहकारी संस्थेच्या वटवृक्षात रूपांतर झाले. नुकतीच संस्थेने आणखी एक गरुडभरारी घेत प्रोटिनयुक्त माशाचे मांस निर्यात करणारा महत्त्वाकांक्षी सुरिमी संस्करण प्रकल्प सुरू केला आहे.

आर्थिक परिस्थितीमुळे प्राथमिक शिक्षणापासूनही वंचित राहिलेल्या कोळी यांनी शासनाकडून मासेमारीच्या व्यवसायासाठी लागणाऱ्या यांत्रिक बोटिंसाठी आर्थिक साह्य मिळवले आणि ३७ यांत्रिक बोटींच्या साह्याने मासेमारीला सुरवात केली. सोबतच विविध प्रकारच्या माशावरील प्रक्रिया उद्योगालाही सुरवात केली. तसेच १९९३-९४ या वर्षात ससून डॉक मत्स्योद्योग सहकारी सोसायटीची स्थापना झाली.

संस्थेच्या सभासदांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या सहकार्यातून यांत्रिक मासेमारी नौका बांधणीसाठी सभासदांचे गट करून त्यांना अर्थसाह्य मिळवून देण्यात आले. नौका मासेमारी सफरीवर निघताना डिझेलची समस्या येत होती. शिवाय समुद्रात मिळालेल्या माशांना अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी बर्फाची आवश्यकतादेखील होती. यावर मात करत ससून डॉकमध्ये इतर संस्थांच्या डिझेल पंपांद्वारे डिझेल वितरणाची व्यवस्था करण्यात आली. तसेच गावातच बर्फाचा कारखाना आणि शीतगृहाची सुविधा उपलब्ध केली.

२००७ मध्ये श्री. कोळी यांनी मासळी प्रक्रिया उद्योगाची सुरवात केली. मासेमारीच्या आणि मासळी प्रक्रिया उद्योगाच्या या २५ वर्षांच्या यशस्वी प्रवासानंतर आता ससून डॉक या सहकारी संस्थेने आणखी एक नवी झेप घेतली आहे. दिघोडा गावात अलीकडेच सुरिमी संस्करण प्रकल्पाला सुरुवात केली आहे. संस्थेच्या रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून केंद्र आणि राज्य शासन यांच्या सहकार्यातून वार्षिक ५,००० मेट्रिक टन क्षमतेचा आणि १०० टक्के निर्यातक्षम प्रकल्प सुरु केला.

यावेळी कार्यक्रमाला माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आवर्जुन उपस्थित होते. सुरिमी अर्थात प्रोटीनयुक्त माशांचे मांस होय. या मांसावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्याची परदेशात निर्यात करणारा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.

३२ देशांना मासळीची निर्यात

दररोज ५७ टन क्षमतेची यंत्रसामग्री आणि १,२०० टन क्षमतेचे शीतगृह असलेला पहिला सहकारी तत्त्वावरील मासळी प्रक्रिया प्रकल्पही संस्थेने प्रत्यक्षात साकारला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून चीन, थायलंड, इंडोनेशिया, न्यूयॉर्क, जपान, मलेशिया अशा ३२ देशांमध्ये रायगड जिल्ह्याच्या समुद्रातील अस्सल कोळंबी, कॅटल फिश, सुरमई, पॉपलेट, फिन फिश या माशांची निर्यात होऊ लागली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com