शकूबाईंच्या लढ्याला आले यश;  वनजमीन झाली अखेर नावावर

शकूबाई वाघले वनजमिनीचे प्रमाणपत्र दाखवताना
शकूबाई वाघले वनजमिनीचे प्रमाणपत्र दाखवताना

वणी, जि. नाशिक  : शेतकरी व आदिवासींच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने नाशिक ते मुंबई किसान लाँग मार्च काढला होता. त्यात ६८ वर्षीय शकूबाई वाघले सहभागी होत्या. अनेक वर्षांपासून कसत असलेली वनजमीन नावावर होण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू होता. या संघर्षाला यश आले असून वनजमीन त्यांच्या नावावर झाली आहे.  

याबाबत सविस्तर माहिती अशी, माकपचे आमदार जिवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली ६ मार्च २०१८ ला किसान लाँग मार्च मुंबईच्या दिशेने निघाला. यामध्ये दिंडोरी तालुक्यातील वरखेडा गावातील ६८ वर्षीय शकूबाई पंढरीनाथ वाघले या सहभागी झाल्या होत्या. सात दिवसांच्या पायी प्रवासात त्यांनी नाशिक ते मुंबई असे २०० हून अधिक किलोमीटरचे अंतर पायी कापले. या प्रवासात अतिशय कष्ट सोसून त्या आझाद मैदानावावर पोचल्या. या पायी प्रवासात पायाची कातडी सोलल्याने तळवे रक्तबंबाळ झाले. जिवाची पर्वा न करता मागे न फिरण्याची त्यांनी भूमिका घेतली होती. जोपर्यंत शासन मागण्या पूर्ण करीत नाही; तोपर्यंत लढ्यात सहभागी होत्या. लाँग मार्चला वर्ष उलटूनही शकूबाईंच्या पायाच्या जखमांची वेदना कायम होती. यावर इलाज करण्यासाठी त्यांनी नाकातील नथ गहाण ठेवली. एवढे घडूनही त्यांना जमीन मिळाली नव्हती. 

‘सकाळ माध्यम समूहा’ने या प्रश्नावर सातत्याने आवाज उठविला. अखेर तहसील व प्रांत कार्यालयाने शकूबाईंच्या वनजमिनीच्या दाव्याबाबत दखल घेतली. मात्र वनजमिनीची फाइल सापडेना. फाइल न मिळाल्याने प्रांत अधिकारी यांच्या सूचनेनुसार तलाठी मदन करवंदे यांनी शकूबाई व त्यांचे मेव्हणे व भाऊ यांना प्रांत कार्यालयात बोलवले.

प्रशासनाने शकूबाईंचे रेशन कार्ड पाहिले असता त्यामध्ये शकूबाईऐवजी छबूबाई नावाचा उल्लेख होता. त्यांनतर छबूबाई पंढरीनाथ वाघले नावे तपासणी करताना त्यांचे नाव यादीत नाव सापडले. नंतर वनजमिनीबाबतचा प्रस्ताव नोव्हेंबर २०१८ मध्ये जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडे दावा मंजुरीसाठी पाठवीत प्रांत कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबतची माहिती सादर केली. अखेर या पाठपुराव्याअंती शकूबाई ऊर्फ छबूबाई कसत असलेल्या वनजमिनीवर त्यांचे नाव लागले. या कार्यालयीन कार्यवाहिनंतर त्यांचे नावाचे प्रमाणपत्र ७ जून रोजी तलाठी मदन करवंदे शकूबाई यांना दिले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com