परभणी, नांदेडमधील २०१७ गावांची अंतिम पैसेवारी ५० पेक्षा कमी

पैसेवारी जाहीर
पैसेवारी जाहीर
परभणी : परभणी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील ८४९ गावांची आणि नांदेड जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील ११६८ गावांची यंदाच्या खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ५० पेक्षा कमी आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व ७०७ गावांतील अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आल्याचे जाहीर करण्यात आले. परभणी जिल्ह्याची खरिपाची अंतिम पैसेवारी सरसरी ४३.६७ पैसे, नांदेड जिल्ह्याची ५२.१२ पैसे, हिंगोली जिल्ह्याची ६८.०५ पैसे आली आहे.
 
परभणी जिल्ह्यात एकूण ८५३ गावे आहेत. बलसा (ता. परभणी) या गावाचे कृषी क्षेत्र विद्यापीठासाठी तर करजखेडा (ता. सेलू), चौधरणी खुर्द, लिंबाळा (ता. जिंतूर) या गावांचे कृषी क्षेत्र धरणासाठी संपादित झाल्यामुळे एकूण ८४९ गावे पैसेवारीसाठी पात्र आहेत. साईनगर या नवीन गावाचा समावेश करण्यात आल्यामुळे जिंतूर तालुक्यातील एकूण गावांची संख्या १७१ झाली आहे. यंदा अंतिम पैसेवारी जाहीर केलेल्या जिल्ह्यातील एकूण गावांची संख्या ८४९ झाली असून मागील दोन वर्षापेक्षा ती एकने अधिक आहे.
 
३० सप्टेंबर रोजी यंदाच्या खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी जाहीर केली होती. जिल्ह्यातील पाथरी, गंगाखेड, पालम या तीन तालुक्यातील २१९ गावांची हंगामी (नजरी) पैसेवारी ५० पेक्षा कमी आणि अन्य ६३० गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त तर जिल्ह्याची सरासरी हंगामी पैसेवारी ५१.९४ पैसे आल्याचे जाहीर केले होते. परंतु ३१ आॅक्टोबर रोजी जाहीर केलेली जिल्ह्यातील सर्व ८४९ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी ४४.९५ पैसे आली होती.
 
परभणी जिल्ह्यातील एकूण लागवडीयोग्य ५ लाख ८३ हजार ३७८ हेक्टर क्षेत्रापैकी यंदाच्या खरीप हंगामात ५ लाख ५१ हजार २४ हेक्टवर पेरणी झाली. ३२ हजार ४४३.९५ हेक्टर क्षेत्र नापेर (पडीक) राहिले होते. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरी ५४६ मिमी म्हणजेच वार्षिक सरासरीच्या ७०.३ टक्के पाऊस झाला. त्यामुळे मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, बाजरी पिकांच्या उत्पादनात मोठी घट आल्याचे पीक कापणी प्रयोगावरून स्पष्ट झाले.
 
गुलाबी बोंडअळीचा उद्रेक झाल्यामुळे कपाशीचा उतारा घटला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पैसेवारीसाठी पात्र असलेल्या सर्व ८४९ गावांतील खरीप पिकाची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे शुक्रवारी (ता. १५) जाहीर करण्यात आले. 
 
परभणीतील यंदाच्या खरीप हंगामातील तालुकानिहाय गावांची संख्या कंसात, अंतिम पैसेवारी ः परभणी (१३१) ४१.१८ पैसे, जिंतूर (१६९) ४७.६३ पैसे, सेलू (९४) ४९.०० पैसे, मानवत (५४) ४७.७७ पैसे, पाथरी (५८) ४४.३८ पैसे, सोनपेठ (६०)४५.०० पैसे, गंगाखेड (१०६) ३९ पैसे, पालम (८२)  ४१.०० पैसे, पूर्णा (९५) ३८.०७ पैसे. 
 
नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी माहूर (४७ पैसे), किनवट (४८ पैसे), हदगाव (४७ पैसे), हिमायतनगर (४७ पैसे), देगलूर (४८ पैसे), नायगाव (४६ पैसे), बिलोली (४८ पैसे), मुखेड (४४ पैसे), कंधार (४६ पैसे), लोहा (४६ पैसे) या १० तालुक्यातील १ हजार १६८ गावांची अंतिम पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. नांदेड (५७ पैसे), अर्धापूर (६४ पैसे), भोकर (६७ पैसे), मुदखेड (६४ पैसे), उमरी (५७ पैसे), धर्माबाद (५८ पैसे) या ६ तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आल्याचे जाहीर करण्यात आले. जिल्ह्याची सरासरी अंतिम पैसेवारी ५२.१२ पैसे आली आहे.
हिंगोली जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त
हिंगोली जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यांतील ७०७ गावांची यंदाच्या खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आली आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ३ लाख ८४ हजार ५०७.७ हेक्टरवर पेरणी झाली होती. १६ हजार ६९२.९१ हेक्टर क्षेत्र नापेर राहिले होते. यंदा ६३९.४ मिमी (७२.२ टक्के) पाऊस झाला.
आधी पावसाच्या खंडामुळे नंतर काढणीच्या वेळी आलेल्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले होते. ३१ आॅक्टोबर रोजी जाहीर केलेली खरिपाची सुधारित हंगामी पैसेवारी ६८.०५ पैसे आली होती. हीच पैसेवारी अंतिम करण्यात आली. खरिपाची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आलेल्या गावांमध्ये शासन दुष्काळग्रस्तांच्या सवलती जाहीर करू शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com