मस्त्य व्यवसायातील अटी शिथिल करण्याची गरज

तलाव तेथे मासोळी अभियान
तलाव तेथे मासोळी अभियान

नागपूर : मत्स्य व्यवसाय हा कृषी व्यवसायाला समतुल्य मानला जावा व त्याप्रमाणे मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांना त्याचा लाभ मिळावा. जास्तीत जास्त मच्छीमारांना मत्स्य सहकारी संस्थांमध्ये समावेश करून घेण्यासाठी मत्स्य सहकारी संस्थांच्या सदस्यता नोंदणीमध्ये नवीन तरतुदींचा अंतर्भाव करण्यावर भर देण्यात येईल. सद्यःस्थितीचा अभ्यास करताना मत्स्य व्यवसायातील काही अटी शिथिल करण्याची गरज असल्याचे मत विभागीय आयुक्त तथा महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुप कुमार यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात  विभागीय आयुक्त आणि प्रभारी कुलगुरू अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ‘तलाव तेथे मासोळी’ अभियानांतर्गत विभागीय स्तरावरील आढावा बैठक झाली. ‘तलाव तेथे मासोळी’ अभियानांतर्गत विभागातील झालेले काम, पुढील कामाविषयी चर्चा व मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या वेळी मत्स्य व्यवसाय विकास आयुक्त गोविंद बोडके, विदर्भ विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चांद्रायन, उपायुक्त (नियोजन) बी. एस. घाटे, मत्स्य व्यवसाय प्रादेशिक उपायुक्त समीर परवेझ, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे संचालक, संशोधन तथा अधिष्ठाता डॉ. ए. एस. बन्नाळीकर, मत्स्य विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. पी. टी. जाधव, कुलसचिव तथा नियंत्रक डी. बी. राऊत, सहायक प्राध्यापक सचिन बेलसरे आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्याकडे पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे विदर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय विकास कृती आराखड्याची सद्यःस्थिती जाणून घेऊन पुढील नियोजन व संबंधित कार्यवाही करण्याबाबत या वेळी चर्चा करण्यात आली.

नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय, मत्स्य व्यवसाय विभाग तसेच महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तलाव तेथे मासोळी’ अभियान संपूर्ण नागपूर विभागात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. विदर्भ विकास मंडळाने मत्स्य विज्ञान विद्यापीठाला विदर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय विकासाचा कृती आराखडा अभ्यास अहवाल तयार करण्याचे काम सोपविले होते. त्याचा आढावादेखील या वेळी घेण्यात आला. 

सहायक प्राध्यापक सचिन बेलसरे यांनी या वेळी विदर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय विकास कृती आराखड्याचे पॉवर पॉइंटद्वारे सादरीकरण केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com