agriculture news in marathi, fish seed technology | Agrowon

जाणून घ्या मत्स्यबीज निर्मितीचे तंत्र
डाॅ. ए. एस. कुलकर्णी, व्ही. बी. सुतार
मंगळवार, 17 एप्रिल 2018

मत्स्यशेतीच्या वाढत्या प्रमाणामुळे मत्स्यबीजांची मागणी वाढली आहे. मत्स्यबीजांची पूर्तता होण्यासाठी आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल राज्यांमधून मत्स्यबीज आणले जातात. मत्स्यबीज निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी मत्स्यबीज निर्मिती तंत्रज्ञानाचा प्रसार होणे आवश्यक आहे. मोठ्या मत्स्य उत्पादन व्यवसायासाठी चायनीज गोलाकार हॅचरी अाणि छोट्या मत्स्य उत्पादन व्यवसायासाठी पोर्टेबल हॅचरीचा वापर करता येतो.

मत्स्यशेतीच्या वाढत्या प्रमाणामुळे मत्स्यबीजांची मागणी वाढली आहे. मत्स्यबीजांची पूर्तता होण्यासाठी आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल राज्यांमधून मत्स्यबीज आणले जातात. मत्स्यबीज निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी मत्स्यबीज निर्मिती तंत्रज्ञानाचा प्रसार होणे आवश्यक आहे. मोठ्या मत्स्य उत्पादन व्यवसायासाठी चायनीज गोलाकार हॅचरी अाणि छोट्या मत्स्य उत्पादन व्यवसायासाठी पोर्टेबल हॅचरीचा वापर करता येतो.

मत्स्य शेतीमध्ये सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे संवर्धन योग्य माशांचे उच्चतम दर्जाचे मत्स्यबीज. गोड्या पाण्यातील भारतीय प्रमुख कार्प प्रजातीचे मासे म्हणजे कटला, रोहु, मृगळ व परदेशी कार्प चंदेरा, गवत्या व सायप्रिनस यांचा मत्स्यबीज उपलब्धतेचा कालावधी साधारपणे जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर हा असतो. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात शासनाच्या मत्स्यबीज केंद्रावर व काही खासगी मत्स्यबीज केंद्रावरही मत्स्यबीजाची निर्मिती केली जाते.

कृत्रिम प्रजनन

 • कार्प प्रजातीचे मासे नैसर्गिक कारणांमुळे सहजरीत्या जलाशयात किंवा तलावात प्रजनन होत नाहीत. अंडी घालण्यासाठी त्यांना प्रेरित करावे लागते. या प्रक्रियेस कृत्रिम प्रजनन असे म्हणतात.
 • यामध्ये प्रजननयोग्य झालेल्या माशांना संप्रेरकाचे इंजेक्शन देऊन प्रजननासाठी प्रेरित केले जाते. माशांचे प्रजनन सिमेंटच्या गोलाकार हॅचरी व पोर्टेबल कार्प हॅचेरीद्वारे केले जाते.
 • प्रजननासाठी प्रजननयोग्य माशांचे नर अाणि मादी ओळखणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यावरच प्रजननाची प्रक्रिया अवलंबून असते.
 • परिपक्व झालेल्या नराच्या कल्ल्याच्या मागचे कुक्षीपर आतील बाजूस खरखरीत असतात, तर परिपक्व मादीमध्ये कल्ल्याच्या मागील कुक्षीपर आतील बाजूस गुळगुळीत असतात.
 • परिपक्व नराच्या गुदद्वाराचा भाग खडयासारखा खोल व पांढरा असतो तर परिपक्व मादीचा गुदद्वाराचा भाग फुगीर व लाल असतो. परिपक्व नराचे पोट दाबले असता दुधासारखा पांढरा द्रव बाहेर येतो तर परिपक्व मादीचे पोट फुगीर व मृदू असते व पोट दाबले असता पिवळसर अंडी बाहेर येतात. साधारणपणे परिपक्व असलेली १ किलो वजनाची मादी १ लक्ष अंडी देते.

मत्स्यबीज निर्मितीचे प्रकार
मत्स्यबीज निर्मिती ही चायनीज गोलाकार हॅचरी व पोर्टेबल कार्प हॅचरी या पद्धतीद्वारे केली जाते. मत्स्यबीज निर्मितीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करावयाचा असल्यास चायनीज गोलाकार हॅचरीचा वापर करतात तर लहान प्रमाणात व कमी भांडवलात करावयाचा असल्यास पोर्टेबल हॅचरीचा वापर करतात.

अ. चायनीज गोलाकार हॅचरी

 • या पद्धतीमध्ये हॅचरीमध्ये एकसारखा पाण्याचा पुरवठा मासे प्रजनन व अंडी उबवण्याकरिता केला जातो.
 • या गोलाकार हॅचरीमध्ये प्रजनन टाकी, उबवण टाकी, मत्स्यजीरे गोळा करण्याची टाकी या मुख्य भागांचा समावेश होतो. यासोबत पाणी साठवणुकीची टाकी (ओवरहेड टॅक) प्रजननक्षम माशांचा तलाव व मत्स्यबीज संगोपन तलाव यांचाही समावेश होतो.

१) प्रजनन टाकी

 • प्रजनन टाकी गोलाकार असून सिमेंटची बांधलेली असते या टाकीचा व्यास ८ मीटर अाणि खोली १ मीटर एवढी असते. तळ मध्यभागाकडे उतरता असतो.
 • पाण्याची पातळी टाकीच्या मध्यभागी असलेल्या आउटलेट ने कमी जास्त करता येते. टाकीचा मध्यभागी उतरता असल्यामुळे टाकीमधले पाणी पूर्ण काढता येते व प्रजननाची प्रक्रिया चालू करण्यापूर्वी चांगली धुवून त्यामध्ये स्वच्छ व फिल्टर केलेले पाणी भरावे.
 • शक्यतो पाण्याचे तापमान २७ ते २८ अांश सेल्सिअस एवढे असावे.
 • गोलाकार टाकीचा आकार व निर्मिती वैशिष्ट्यपूर्ण असते. टाकीमधील गोलाकार पाइपलाइन बसवलेल्या तोटीची तोंड एकाच दिशेला असतात. त्यामुळे पडणारे पाणी एकाच दिशेने प्रवाहित होते.
 • टाकीच्या वरच्या बाजूस असलेल्या पाइपमधून कारंजासारखे पाणी पडते यामुळे पाऊसासारखी वातावरण निर्मिती होते.
 • प्रजनन टाकीमध्ये एकावेळेस ५० किलो नर व ५० किलो मादी प्रजननासाठी वापरले जातात. प्रजननक्षम माशांना प्रेरित करण्यासाठी संप्रेरकांचे इंजेक्शन दिले जाते. १ किलो मादी साठी ०.३ ते ०.५ मिली व १ किलो नरासाठी ०.३ मि.ली. इतके इंजेक्शन दिले जाते. तर चंदेरा, गवत्या व सायप्रिनस या प्रजातीच्या एक किलोच्या मादीसाठी ०.६ ते ०.८ मिली व एक किलोच्या नरासाठी ०.४ ते ०.५ मिली इतके संप्रेरक इंजेक्शनद्वारे दिले जाते.
 • संप्रेरकाचे इंजेक्शन माशांच्या शेपटीच्या जवळ किंवा कल्ल्याजवळील परांमागे मांसल भागात हळुवारपणे दिले जाते. साधारणतः संध्याकाळी ५ ते ६ वाजता इंजेक्शन देऊन मासे प्रजनन टाकीमध्ये सोडतात.
 • सुमारे चार ते पाच तासानंतर मादी अंडी सोडते व नराकडून ती फलित होतात. चार तासांनंतर पाणी शोषल्यामुळे अंडी फुगलेल्या साबुदाण्यासारखी होतात व ही अंडी उबवणी टाकीत सोडतात.

२) उबवण टाकी
गोलाकार सिमेंटच्या बनवलेल्या दोन उबवणी टाक्या असतात व त्यामध्ये दोन भाग केलेले असतात. या उबवणी टाकीचा व्यास ४ मीटर असतो. बाहेरील भागामध्ये गोलाकार पाइपलाइन केलेली असते व तोट्या एकाच दिशेला बसवलेल्या असतात. त्यामुळे पाण्याचा प्रवाह वर्तुळाकार चालू राहतो.

 • आतील कक्षाला नायलाॅनची गोल जाळी बसवलेली असते व त्यामधून पाणी आतमध्ये येऊन मध्यभागी असलेल्या पाइपद्वारे बाहेर पडते. पाण्याचा एक सारखा प्रवाह असणे महत्त्वाचे असते.
 • साधारणतः १२ ते १५ तासानंतर अंड्याचे कवच फुटून पिल्ले बाहेर येतात. उबवणी टाकीमध्ये ठराविक अंतरावर काथ्याच्या दोऱ्या लाकडी काडीला बांधून पाण्यात सोडतात. या दोऱ्यांवर अंड्याची कवच चिकटतात व ती बाहेर स्वच्छ धुवून परत टाकीमध्ये ठेवतात. अशाप्रकारे सर्व अंड्याची कवच बाहेर काढून आतमध्ये फक्त माशांची पिले राहतात. पिल्लाचा अन्नकोष संपेपर्यंत त्यांना टाकीमध्ये ठेवले जाते.

३) मत्स्यजीरे गोळा करण्याची टाकी
अंड्यातून बाहेर आलेल्या पिल्लांना (मत्स्यजिरे) जमिनीमध्ये तयार केलेल्या सिमेंटच्या टाकीमध्ये पाइपलाइनद्वारे हापामध्ये काढले जाते हॅचरी लगतच्या संगोपन तलावामध्ये संचयन केले जाते.

ब) पोर्टेबल कार्प हॅचरी एफ.आर.पी पद्धत
कार्प माशांच्या प्रजननसाठी फायबर ग्लास रीएनफोर्सड प्लॅस्टिकपासून बनवलेली पोर्टेबल हॅचरी भुवनेश्वर येथील केंद्रीय गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन संस्थेने विकसित केली अाहे. हॅचरीचे प्रमुख वैशिष्ट म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करता येते. या हॅचरीला कमी जागा लागते अाणि जास्त काळ टिकते. या हॅचरीचे प्रजनन टाकी, उबवणी टाकी, मत्स्यजीरे गोळा करण्याची टाकी अाणि पाण्याची टाकी असे प्रमुख चार भाग आहेत.
१) प्रजनन टाकी

 • ही टाकी लंब गोलाकार असून व्यास २.१५ मीटर आणि उंची ०.९ मीटर असते.
 • टाकीची क्षमता ३४०९ लिटर असून प्रजननाच्या वेळी या टाकीमध्ये २९५० लिटर इतके पाणी ठेवतात. या टाकीच्या तळाला सर्व बाजूंनी मध्ये पाणी जाण्याकरिता उतार असतो.
 • टाकीची जाडी ४.२ ते ६ मिलिमीटर एवढी असते. टाकीच्या तळाला १५ मिलिमीटर व्यासाचे ५ नळ बसवलेले असतात. ज्यामुळे टाकीमध्ये पाणी सतत फिरत रहाते. २५ मिलिमीटर जाडीचे नळ बाहेरील बाजूने या पाच नळांना जोडलेले असतात.
 • एक शाॅवर टाकीच्या वरती जोडलेला असतो.
 • टाकीला पाणीपुरवठा ३.३ मीटर उंचीवर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीमधून होतो.
 • २० ते २४ किलो माशांच्या प्रजननासाठी योग्य आहे.
 • अंडी दिल्यानंतर अंडी गोळा होण्याकरिता या टाकीमध्ये पाण्याचा वेग साधारणपणे ०.३५ ते ०.४२ लिटर प्रतिसेकंद या दराने ठेवतात.

२) उबवणी टाकी

 • ही टाकी लंब गोलाकार असून त्याचा व्यास १.४ मीटर आणि उंची ०.९८ मीटर असते.
 • क्षमता १२७५ लिटर असून. १२०० लिटर इतके पाणी अंडी उबवीण्याकरिता लागते.
 • टाकीमध्ये अंडी उबवीण्याचा कक्ष, पाणी बाहेर जाण्याकरिता आतील कक्ष आणि टाकीला पाणीपुरवठा करण्याकरिता नळ जोडणी केलेली असते.
 • आतील कक्ष ०.४ मीटर व्यासाचा असून त्याची उंची ९० से.मी. असते. त्याला ०.२५ मिलिमीटर व्यासाची जाळी जोडलेली असते.
 • १५ मिलिमीटर व्यासाची ६ नळ आतील आणि बाहेरील कक्षाच्या तळाला जोडलेले असतात. ज्यामुळे टाकीमध्ये पाणी फिरते राहते.
 • टाकीच्या मध्यभागी पाणी बाहेर जाण्याकरिता पाइप जोडलेला असतो. १४ ते १८ तासानंतर अंडी फलित झाल्यानंतर या टाकीमध्ये साधारणतः ७२ तासापर्यंत ठेवतात.
 • मत्स्यजीरे साठवणूक टाकीमध्ये उबवणी टाकीमध्ये तयार झालेले मत्स्यजीरे सोडतात. या टाकीची क्षमता १.० ते १.२ दशलक्ष अंडी इतकी असते.

३) मत्स्यजीरे गोळा करण्याची टाकी

 • ही टाकी आयताकृती असून आकारमान १.० x ०.५ x ०.५ मीटर इतके असते.
 • टाकीची क्षमता २५० लीटर असते. या जाडी ३ मिलिमीटर असून ०.४५ मीटर उंचीपर्यंत पाण्याची पातळी ठेवतात.
 • जास्तीचे पाणी बाहेर जाण्याकरिता ६३ मिलिमीटर व्यास आणि १५० मिलिमीटर लांबीचा नळ तळापासून ३८.७ सेमी वर लावलेला असतो.

४) पाण्याची टाकी

 • हॅचरी युनिट चालवण्याकरीता २००० लिटर क्षमतेच्या टाकीची आवश्यकता असते. जर जागा कमी असेल तर १००० क्षमतेच्या दोन टाक्या वापरू शकतो.
 • ही टाकी प्रजनन टाकी आणि उबवणी टाकीला पाइपच्या साहय्याने पाणीपुरवठा करण्याकरिता जोडलेली असते. पाणी पुरवण्याकरिता ०.१ एच. पी. पंपाची आवश्यकता असते.

संपर्क ः डाॅ. ए. एस. कुलकर्णी, ९८६००७९८२६
(मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

फोटो गॅलरी

इतर कृषिपूरक
तुती लागवडतुती हे बहुवर्षीय पीक आहे. हलकी, मध्यम व भारी अशा...
दुग्धोत्पादनात पाण्याचे महत्त्वपाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांच्या शरीरातील...
ओळखा जनावरांतील परजिवींचा प्रादुर्भाव...सध्याचा उन्हाळा आणि त्यानंतर येणारा पावसाळा...
कोंबड्यांचा ताण करा कमीतापमानवाढीचा सर्वाधिक त्रास हा कोंबड्यांना होतो....
जनावरांच्या आरोग्यासाठी जीवनसत्त्वेजीवनसत्त्वांची कमतरता असेल तर जनावरांचे स्वास्थ्य...
तापमानानुसार कोंबड्यांच्या व्यवस्थापनात...उन्हाळ्यात तापमान ४१ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत...
जनावरांतील उष्माघाताची कारणे, लक्षणे,...वाढते तापमान आणि प्रखर उन्हामुळे जनावरांमध्ये...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
प्रथमोपचाराने बरे होतील जनावरांतील आजारजनावरांमध्ये विविध प्रकारचे विषाणूजन्य व...
वाढत्या तापमानाचा जनावरांवर होणारा...जनावरांमध्ये दिसून येणाऱ्या उष्मा तणावासाठी...
शेळ्या-मेंढ्यांमधील गर्भाशयाच्या...जनावरांना विशेषतः शेळ्या-मेंढ्यांना गर्भाशयाचे...
नियोजन स्वच्छ दूध उत्पादनाचे...दुग्ध व्यवसायात आर्थिक परिस्थिती, शास्त्रोक्त...
अॅझोला, हायड्रोपोनिक्स चाऱ्यातून करा...चाराटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध चाऱ्याची...
संवर्धन खिलार गोवंशाचे...जातिवंत खिलार जनावरांची पैदास वाढवण्यासाठी...
शेळ्या-मेंढ्यांमधील गर्भाशयाचे आजार,...शेळ्या मेंढ्यांना गर्भाशयाचा आजार झालेला आहे हे...
झलक क्रिमोना आंतरराष्ट्रीय पशू...इटली देशात दरवर्षी क्रिमोना आंतरराष्ट्रीय पशू...
जनावरांच्या संतुलित आहार...जनावरांना दिवसभरात किती चारा दिला पाहिजे आणि तो...
जनावरांच्या आहारात कोरडा चारा वापरताना...महाराष्ट्रातील बहुतांशी भागात फेब्रुवारी ते...
कमी जागेत, कमी पाण्यात अळिंबी...कमी जागेत, कमी पाण्यात अळिंबीची लागवड करता येत...