जोरदार पावसामुळे दाणादाण; यवतमाळ जिल्ह्यात पूरस्थिती

यवतमाळ जिल्ह्यात पूरस्थिती
यवतमाळ जिल्ह्यात पूरस्थिती

यवतमाळ  ः जिल्ह्यात गेले दोन दिवस झालेल्या पावसाने पुरती दाणादाण उडाली आहे. आर्णी, दिग्रस तालुक्‍यांतून वाहणाऱ्या अरुणावती नदीचे पाणी अनेक गावांत शिरले आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांमधील तब्बल एक हजारांवर लोकांना प्रशासनाच्यावतीने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. पावसामुळे पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.  

यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांत अतिवृष्टी झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आर्णी शहरातून नांदेडकडे जाणाऱ्या दर्ग्याजवळचा मुख्य पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक आठ तास ठप्प झाली होती. परिणामी, बस स्थानकावर अडकून पडलेल्या ३०० प्रवाशांच्या राहण्याची व जेवण्याची सोय तहसील कार्यालयात करण्यात आली. तहसील कार्यालयात पुरुष तर पंचायत समितीच्या सभागृहात महिलांची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री तीन वाजता पाणी ओसरल्यावर वाहतूक सुरू झाली. शहरातील अनेक घरांची संततधार पावसामुळे पडझड झाली आहे. त्याच्या सर्व्हेक्षणाचे आदेश तत्काळ देण्यात आले आणि महसूलच्या दहा पथकांच्या माध्यमातून या कामाला सुरवात झाल्याची माहिती आहे.

दिग्रस तालुक्‍यात १३४.२५ मिमी पावसाची नोंद झाली. बेलोरा या गावाला पुराचा विळखा बसला होता. या गावातील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी मोटारबोटची व्यवस्था करण्यात आली. परंतु, पाणी ओसरल्याने त्याची गरज पडली नाही. नांदगव्हाण गावात मात्र परिस्थिती गंभीर झाल्याने या गावातील ग्रामस्थांना वाशीम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्‍यात आश्रय देण्यात आला. दिग्रस शहरात २१० मिमी पावसाची नोंद झाल्याने मोरणा व धावंडा या दोन नद्यांना पूर आला. १७ ऑगस्टला बाजीराव डेरे (रा. धानोरा) हे नाल्याच्या पुरात वाहून गेले. शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह धानोरालगतच काट्यांना अडकलेला मिळून आला.

दिग्रस तालुक्‍यातील २२ जनावरांचा पूरस्थितीमुळे मृत्यू झाला. दारव्हा तालुक्‍यातील तेलगव्हाण येथे पाझर तलाव फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. दिग्रस तालुक्‍यात विठाळी, वरंदळी, कांळदी, बेलोरा, हरसूल, कलगाव, रोहणा देवी, चीजकुटा या भागात पुराच्या पाण्यामुळे घरांचे आणि शेतीचे नुकसान झाले.

जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी रात्री आपत्ती निवारण कक्षाला भेट दिली. या वेळी अरुणावती धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत असल्याचे सांगण्यात आले. केवळ ३६ टक्‍के भरलेल्या या धरणाची पातळी थेट ७६ टक्‍केवर पोचली. ऑगस्ट महिन्यात या धरणात पाणीसाठ्याची मर्यादा ८४.९१ टक्‍के आहे. त्यामुळे अरुणावती धरणाचे दरवाजे केव्हाही उघडावे लागण्याची शक्‍यता पाटबंधारे विभागाकडून वर्तविली गेली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com