agriculture news in Marathi, Flower and tomato rates down in markets, Maharashtra | Agrowon

बाजारात फ्लाॅवर कोमेजला; टोमॅटोची उतरली लाली
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 मार्च 2018

कोल्हापूर/नाशिक : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो व फ्लॉवरच्या दरात मोठी घसरण झाल्याने फळभाज्या उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. दोन्ही फळभाज्यांना किलोस केवळ एक ते दोन रुपयांचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. मिळणाऱ्या दरामुळे भाजीपाला काढणीचाही खर्च निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पीक काढणीच थांबविली आहे, तर काही शेतकऱ्यांनी शेतात मेंढरे आणि जनावरे चरावयास सोडली आहेत. 

कोल्हापूर/नाशिक : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो व फ्लॉवरच्या दरात मोठी घसरण झाल्याने फळभाज्या उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. दोन्ही फळभाज्यांना किलोस केवळ एक ते दोन रुपयांचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. मिळणाऱ्या दरामुळे भाजीपाला काढणीचाही खर्च निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पीक काढणीच थांबविली आहे, तर काही शेतकऱ्यांनी शेतात मेंढरे आणि जनावरे चरावयास सोडली आहेत. 

नाशिकच्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीत मंगळवारी (ता. २०) टोमॅटोच्या प्रति २० किलोच्या क्रेटला ५० ते १०० व सरासरी ८० रुपये दर मिळाला. याच वेळी नाशिकच्या बाजारात कोबीला क्विंटलला २१५ ते ३६० व सरासरी २८५ हा दर मिळाला. फेब्रुवारी महिन्यापासून या महत्त्वाच्या भाजीपाला पिकांची हीच अवस्था आहे. यामुळे उत्पादन खर्च तर दूरच, साधा वाहतूक खर्चही निघत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व भागातील हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यांत भाजीपाला पिके घेतली जातात. पण गेल्या काही दिवसांत या भागात भाजीपाला पिकाचे प्रमाण कमी झाले आहे. कोल्हापूर बाजारपेठेत बेळगाव सीमाभागातूनच बहुतांशी भाजीपाल्याची आवक होते.

कोल्हापूरसह परिसरातील इचलकरंजी, जयसिंगपूर, पेठवडगाव आदी महत्त्वाच्या बाजारपेठेतही थेट कर्नाटकातून टोमॅटो व कोबीची जादा प्रमाणात आवक सुरू झाल्याने शेतकऱ्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे. गेल्या महिन्यापासून दरात मंदी आहे. टोमॅटो, कोबीला पाच ते दहा रुपयांपर्यंत दर मिळत होता. परंतु गेल्या चार दिवसांपासून हे दर एक ते दोन रुपयांपर्यंत घसरल्याने भाजीपाला काढणीच शक्‍य नसल्याचे या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले. 

सातत्याने रोगाचा प्रादुर्भाव व दराच्या कारणास्तव जिल्ह्याचा भाजीपाल्याचा हुकमी पट्टा असलेल्या पूर्व भागातील हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यात टोमॅटो लागवडीचे प्रमाण प्रचंड घटले आहे. दानाळी, कोथळी, उमळवाड, आदी भागांत अगदी बोटांवर मोजण्याइतकेच टोमॅटोचे प्लॉट आहेत. तर नांदणी भागातही कोबीची हीच स्थिती आहे. दर नसल्याने टोमॅटो, कोबी उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. 

कोबी बाजाराला आणूच नका..
टोमॅटोची निदान खरेदी तरी होत आहे. पण फ्लॉवरची अवस्था याहून बिकट झाली आहे. बाजारात कोबीला मागणी नसल्याने कोबी आणू नका, अशी सूचनाच व्यापाऱ्यांकडून होत असल्याने कोबी काढून टाकल्याशिवाय पर्यायच उरला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मागणी नसल्याने कोबीची विक्री कमी झाल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. 

दराचा घसरता आलेख 
येथील बाजार समितीत गेल्या महिन्यात टोमॅटोची आवक एक हजार कॅरेटच्या आसपास होती. या वेळी किलोस ३ ते ६ रुपये इतका दर मिळत होता. या महिन्यात ही आवक दीड हजार कॅरेटची झाली आहे. यामुळे दरात मोठी घसरण होऊन किलोस १ ते ३ रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. कोबी व फ्लॉवरबाबतीत अशीच परिस्थिती असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. गेल्या चार दिवसांत या भाज्यांची आवक दीड पटीने वाढल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

स्वत:च्या हाताने केले पीक उद्ध्वस्त
फळभाज्याचे भाव पडल्याने वाहतूक खर्चही निघत नाही. त्यामुळे जालना तालुक्यातील पाहेगाव येथील प्रेमसिंग लाखीराम चव्हाण या शेतकऱ्याने फ्लॉवर आणि टोमॅटोचे पीक स्वतः फावड्याने उद्ध्वस्त केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. प्रेमसिंग चव्हाण यांनी आपल्या शेतामध्ये अर्धा एकर फ्लॉवर आणि अर्धा एकर टोमॅटो लावले होते. त्यासाठी त्यांना सुमारे २० ते २५ हजार रुपये खर्च आला. उत्पादनही चांगले झाले. मात्र, भाव पडल्याने वाहतूक खर्चही निघणे कठीण झाले आहे. प्रेमसिंग चव्हाण यांनी परतूर येथील बाजार समितीत फ्लॉवरचे १० ते १३ कट्टे विक्रीसाठी नेले होते. मात्र त्यांना भाव मिळाला नाही. त्यामुळे काही कट्टे विक्री केले आणि काही तेथेच फेकून दिले. विक्रीतून केवळ ४४२ रुपये पदरी पडले. त्यामुळे प्रेमसिंह चव्हाण यांनी आपल्या शेतातील फ्लॉवर आणि टोमॅटो शेती फावड्याने स्वतः उद्ध्वस्त केले.

दराची स्थिती

  • देशभर स्थानिक बाजारात आवक वाढली
  • पावसामुळे लागवडीत वाढ
  • खर्च निघत नसल्याने शेतकरी अडचणीत
  • रब्बी हंगाम वाया गेल्याने आर्थिक कोंडी
  • कोल्हापुरात १ ते २ रुपये दर
  • नाशिकला ३ ते ५ रुपये दर

प्रतिक्रिया
टोमॅटोचे दर गेल्या महिन्यापासून कमी आहेत. किलोला पाच ते सात रुपयांपर्यंत दर होता. परंतु गेल्या चार दिवसांत हा दर एक ते दोन रुपये किलो इतका झाला आहे. व्यापाऱ्यांना जरी जागेवर दिले, तरी तेवढीच रक्कम आणि बाजारात विकली तरी तेवढीच रक्कम मिळत असल्याने आता टोमॅटो तोडणीही थांबविली आहे. आम्ही आता टोमॅटो प्लॉट तसेच सोडून दिले आहेत. 
- अनिल मगदूम, टोमॅटो उत्पादक, उमळवाड, जि. कोल्हापूर 

एक एकरात फ्लॉवरची लागवड केली आहे. लागवड, खते, औषधे, काढणी मजुरी चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च झाला. काढणीनंतर पोत्याला (२५ किलोची पिशवी) स्थानिक बाजारपेठेत ५० ते ६० रुपये मिळत आहेत. त्यातील ३० रुपये भाडे, ५ रुपये हमाली, ८ रुपये बारदान असा ४५ रुपये खर्च येत आहे. पिशवीला अवघे ५ ते १० रुपये राहात आहेत. त्यात तोडणी खर्चही निघत नाही.
- राजू गंजेली, दानोळी, जि. कोल्हापूर 

यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे मोठ्या आशेने भाजीपाला पिकांची लागवड केली होती. मात्र बाजारात कोणत्याच मालाला भाव नसल्यामुळे मोठीच कोंडी झाली आहे. घर खर्च चालविणेही अवघड बनले आहे.
- संदीप काळे, विंचुरी गवळी, ता. जि. नाशिक

कमी कालावधीचे पीक म्हणून कोबीचे पिक घेतो. यंदा दीड महिन्यापासून दर पडले आहेत. परिस्थिती जास्तच अवघड बनली आहे. यंदाचा हंगाम पूर्ण तोट्यात गेला आहे.
-विलास बंदावणे, गिरणारे, ता.जि. नाशिक

आमच्या भागात खरिपात टोमॅटो होत नाही. दरवर्षी रब्बीत लागवड करतो. यंदा टोमॅटोचं उत्पादन खूप चांगलं आणि भरपूर निघालंय मात्र बाजारात दरच मिळत नाही. रोज चार ते पाच मजूर खुडणीला असतात. मात्र त्यांचाही खर्च निघत नाही.
- बिजलाबाई नवले, सारुळ, ता. जि. नाशिक

खरीप हंगामात टोमॅटोला चांगला दर मिळाला. त्यामुळे उत्साहाने त्याच पिकाचे दुहेरी उत्पादन सुरू ठेवले. मात्र मागील दोन महिन्यांपासून दर उठायला तयार नाही. आता पीक काढून टाकतो आहे.
- सुभाष पूरकर, धोंडगव्हाण वाडी, ता. चांदवड, जि. नाशिक

खरिपाचीच लागवड आतापर्यंत टिकवून ठेवली होती. मात्र वाहतुकीच्या खर्चाइतकाही दर न मिळाल्याने आता पीक काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
- शंकर उगले, जोपूळ, ता. दिंडोरी, जि. नाशिक

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...