पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा पिकांची लागवड

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई भासत आहे. शेतकरी उपलब्ध असलेल्या पाण्याचा वापर करून चारा पिकांच्या पेरणीवर भर देऊ लागले आहेत. पुणे विभागात उन्हाळी हंगामात १३ हजार १२७ हेक्टरवर चारा पिकांची लागवड झाली आहे. त्यामुळे पुढील एक ते दीड महिन्यात काही प्रमाणात चारा उपलब्ध होईल.    

गेल्या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने नोव्हेंबरपासून पाणीटंचाई भासू लागली आहे. यामुळे रब्बी हंगामात अवघ्या ९१ हजार २१० हेक्टरवर चारा पिकांची पेरणी झाली होती. परिणामी, उत्पादनात मोठी घट झाली. यामुळे विभागात डिसेंबर, जानेवारीपासून चाराटंचाई भेडसावण्यास सुरवात झाली आहे.  नगर जिल्ह्यात गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. सोलापूर, पुणे या भागांतही अजूनही छावण्या सुरू झाल्या नसल्या तरी चाराटंचाई तीव्र स्वरूपात जाणवत आहे.

दरवर्षी मे, जून आणि जुलै महिन्यांत चारा उपलब्ध होण्यासाठी उन्हाळी हंगामात मार्च महिन्यात मका, कडवळ, लुसर्नग्रास, नेपिअरग्रास, बाजरी अशा विविध चारा पिकांची लागवड केली जाते. चारा पिकांच्या लागवडीनंतर साधारणपणे दोन ते तीन महिन्यांनंतर चाऱ्यांचे उत्पादन होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या अखेरीस व पावसाळ्याच्या तोंडावर चाराटंचाई कमी होण्यास मदत होते.

उन्हाळी हंगामात नगर जिल्ह्यात दोन हजार ५१८ हेक्टरवर चारा पिकांची लागवड झाली. यामध्ये श्रीगोंदा, पाथर्डी, संगमनेर या तीन तालुक्यांत चारा पिकांची लागवड झाली आहे. उर्वरित तालुक्यांत पाणीटंचाईमुळे चारा पिकांची लागवड झालेली नाही. पुणे जिल्ह्यात पाच हजार ९२३ हेक्टरवर चारा पिकांची लागवड झाली आहे. यामध्ये हवेली, मुळशी, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, पुरंदर या तालुक्यांत चारा पिकांची लागवड झाली आहे. उर्वरित तालुक्यात चारा पिकांची लागवड झालेली नाही. सोलापूर जिल्ह्यात अत्यंत कमी क्षेत्रावर चारा पिकांची लागवड झाली आहे. जिल्ह्यात पाच हजार १०१ हेक्टरवर लागवड झाली आहे. 

पीकनिहाय झालेली चारा पिकांची पेरणी ः  मका ५५५६, कडवळ ४७८७, बाजरी  १२, लसूणघास ९०९,नेपिअर ३१८, इतर चारा पिके  १५४५. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com