नगरमध्ये चाऱ्याला मागणी

नगरमध्ये चाऱ्याला मागणी
नगरमध्ये चाऱ्याला मागणी

नगर ः पाऊस नसल्याने जिल्ह्यातील बहूतांश भागात अजूनही चारा पुरेसा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना चारा विकत घ्यावा लागत आहे. परिणामी, बाजार समितीत चाऱ्याची आवक व दरही वाढला आहे. बाजार समितीत कोवळ्या उसाला दोन हजार रुपये टनाचा दर आहे.

मृगाच्या पहिल्या पावसाने डोंगरमाथे, उजाड माळराने, शिवार गवताच्या पात्यांनी डोलू लागतात. या वर्षी पावसाने पहिल्यापासूनच लपंडाव सुरू केल्याने रानगवताने फुलणारे रस्ते, डोंगर रिकामेच राहिले. चराऊ जनावरांच्या तोंडाशी येणारी गवताची लुसलुशीत पाती फुललीच नसल्याने दुभत्या जनावरांना विकतचा चारा घालण्याशिवाय पर्याय उरला नाही.

गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने वळईला लावून ठेवलेली वैरण, चारा संपल्याने शेतकऱ्यांना विकतचा चारा घेण्यासाठी बाजाराकडे वळावे लागले आहे. बाजारात इतरवेळी आठशे ते एक हजार रुपयांपर्यंत मिळणारा उसाचा चारा या महिन्यांत एकदमच दोन हजारांवर गेला.

दुभत्या जनावरांना हिरवा चारा म्हणून उसाचा वापर गेल्या काही वर्षांपासून होत आहे. त्यामुळे वर्षातून एकदा तोड केला जाणारा ऊस आता सहा महिन्याला तोडला जातोय. अगदी चार-पाच कांड्यांवर आलेल्या सहा महिन्यांच्या कोवळ्या उसाला टनाला दोन हजार रुपयांचा भाव सध्या नगर मार्केटमध्ये मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे थोडेफार पाणी होते, त्यांनी मक्‍याची लागवड केली.

या मकाला दीड हजारांवर प्रतिटन भाव मिळत आहे. मंगळवारी नगरच्या मार्केट यार्डातील चाराबाजारात उसाला प्रतिटन एक हजार ८०० पासून दोन हजार २०० रुपयांपर्यंत, मकासाठी एक हजार ५०० ते एक हजार ८०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. घास प्रतिशेकडा २५० ते ३०० रुपयांपर्यंत विकला गेला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com