‘सीआयबी’च्या धर्तीवर नोंदणी यंत्रणा उभारावी

कृषी निविष्ठा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांमध्ये पुरेशी जनजागृती करणे आवश्‍यक आहे. चुकीचे काम करणाऱ्यांची गय करणार नाही. -सदाभाऊ खोत , कृषी राज्यमंत्री
‘सीआयबी’च्या धर्तीवर नोंदणी यंत्रणा उभारावी
‘सीआयबी’च्या धर्तीवर नोंदणी यंत्रणा उभारावी

नाशिक : ‘सीआयबी’च्या धर्तीवर राज्य स्तरावर बिगर नोंदणीकृत उत्पादननिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना नोंदणी करणे बंधनकारक करावे. विद्यापीठ व संशोधन केंद्रात या उत्पादनांवर चाचणी घेण्यात यावी. राज्य शासनाने अशी यंत्रणा उभारावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे केली.

यवतमाळ येथे फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधेमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवला. या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. १२) श्री. खोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेतकरी, निविष्ठा विक्रेते व अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत विशेष चर्चा झाली. बैठकीपूर्वी शासनाच्या शेतकरी सुरक्षा अभियानाच्या रथाला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.

विभागीय कृषी सहसंचालक सुनील झेंडे, राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष अशोक गायकवाड, अखिल भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे, नाशिक ॲग्रो डीलर्स असोसिएशन (नाडा)चे अध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस भगवान खैरनार, अरुण मुळाणे, अरुण मोरे, प्रशांत निमसे आदी उपस्थित होते.

शासनाने बिगर नोंदणीकृत कृषी निविष्ठांच्या विक्रीवर बंधने आणली आहेत. याही स्थितीत बाजारात मोठ्या प्रमाणावर अशी बिगर नोंदणीकृत, बनावट कीटकनाशके, बायोलॉजिकल पोषके, वाढ नियंत्रके यांचा सुळसुळाट आहे. कृषी निविष्ठा बाजारात येण्याअगोदर सेंट्रल इन्सेक्‍टिसाईड बोर्ड (सीआयबी)कडे नोंदणी होणे आवश्‍यक आहे.

मात्र बहुतांश कंपन्या हा नियम धाब्यावर बसवून बोगस उत्पादनांची विक्री करीत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘सीआयबी’च्या धर्तीवर राज्य स्तरावर बिगर नोंदणीकृत उत्पादननिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना नोंदणी करणे करण्याची मागणी करण्यात अाली अाहे.

परवाना असलेली उत्पादनेच दुकानात ठेवा : खोत बनावट, बिगर नोंदणीकृत उत्पादनांना थारा देऊ नका. परवाना असलेली उत्पादनेच दुकानात ठेवा. पत्र्याच्या शेडमध्ये बायोलॉजिकल कीटकनाशकांची निर्मिती करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना आळा घाला. बाहेरच्या राज्यांतून मोठ्या प्रमाणावर बनावट औषधे मागवून त्याचा साठा करणाऱ्यांच्या गोदामावर छापे घाला.

त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. अशा सूचना खोत यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. कृषी निविष्ठा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या उत्पादनाबाबत पुरेशी जनजागृती करणे आवश्‍यक आहे. चुकीचे काम करणाऱ्यांची गय करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. कृषी पदवी नसलेल्या कन्सल्टंटवर गुन्हा द्राक्ष, डाळिंब शिवारात कन्सल्टंट लोकांचे प्रमाण वाढले असून, शेतीची कुठलीही पार्श्‍वभूमी नसलेले हे लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. बऱ्याच कन्सल्टंट लोकांनी स्वत:ची बनावट उत्पादनाची कंपनी स्थापन केली असून, ते बनावट उत्पादने शेतकऱ्यांच्या माथी मारीत असल्याचे शेतकऱ्यांनी श्री. खोत यांच्या निदर्शनास आणून दिले.

त्यावर अशी कन्सल्टंसी करून शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांवर कारवाई करू. कृषी पदवी नसलेल्या अशा कन्सल्टंटवर गुन्हा दाखल केला जाईल. वितरकांनी व शेतकऱ्यांनी अशा बोगस कन्सल्टंटवर लक्ष ठेवावे. त्यांनी दिलेल्या उत्पादनांच्या चिठ्ठ्या कृषी विभागाकडे द्याव्यात, असे खोत यांनी म्हटले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com