राज्यातील शेतकरी समाधानी नाही ः अजित पवार

यवतमाळ ः येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शुक्रवारी (ता.१) हल्लाबोल आंदोलन करण्यात अाले.
यवतमाळ ः येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शुक्रवारी (ता.१) हल्लाबोल आंदोलन करण्यात अाले.

यवतमाळ : शेतकरी, शिक्षक, अंगणवाडी ताई, वकील, डॉक्‍टर असा राज्यातील एकही घटक समाधानी नाही. कुठे शेतकऱ्यांवर लाठीमार होत आहेत, तर कुठे गोळीबार केला जात आहे, यानंतरही भाजपची मंडळी मुक्ताफळे उधळीत आहेत. त्यामुळे ‘भोगा कमळाची फळे’ अशी म्हणण्याची वेळ राज्यातील जनतेवर आली अाहे, असा हल्लाबोल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

यवतमाळ येथून सुरू झालेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनात शुक्रवारी (ता. १)  श्री. पवार बोलत होते. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनजंय मुंडे, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनील देशमुख, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, विद्या चव्हाण, माजी मंत्री फैजिया खान, हेमंत टकले, माजी खासदार आनंद परांजपे, गुलाबराव देवकर, आमदार मनोहर नाईक, राणा जगजितसिंग पाटील, जयंत जाधव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, बसवराज पाटील, अजिंक्‍यराणा पाटील, आदिती नलावडे, माजी आमदार संदीप बाजोरिया, ख्वाजा बेग, जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले आदी उपस्थित होते.

या वेळी श्री. पवार म्हणाले, की हे सरकार बोगस, खोटारडे आहे. केवळ जनेतची दिशाभूल केली जात आहे. जनतेने दिलेल्या करातून ‘मी लाभार्थी’च्या खोट्या जाहिराती दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. जाहिरातीत ४० हजार कोटींचे उत्पन्न वाढल्याचा दावा शासनाने केला आहे, मग शेतकऱ्यांना सोयाबीन मातीमोल भावात का विकावा लागतेय, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

कोपर्डी हत्याकांड प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी उभ्या महाराष्ट्राची मागणी पूर्ण केली. त्याबद्दल उज्ज्वल निकम यांचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले. तसेच हत्याकांडातील आरोपींना लवकर फाशी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. सरकारवर हत्येचा गुन्हा दाखल करा ः सुप्रिया सुळे यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त व फवारणीबाधितांच्या कुटुंबीयांना धीर देण्याची सर्वांची जबाबदारी आहे. हे पाप या सरकारचेच आहे. त्यामुळे या सरकारवर कलम ३०२ अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

मुख्यमंत्री, कृषिमंत्री असलेल्या विदर्भात कृषीच्या ५० टक्‍के जागा रिक्‍त आहेत. त्यामुळे ही यंत्रणा अल्प मनुष्यबळाच्या भरशावर कशी काम करेल? ‘जी’ फार्म भरून घेण्यात आले; परंतु सर्वेक्षण आणि पंचनामे नाहीत. विमा कंपनी आणि शेतकऱ्यांमध्ये वाद व्हावेत याकरिता हा कट रचण्यात आला, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी या वेळी केला.

सरकार सामान्यांकरिता योजना राबविते, हे सरकारचे कर्तव्य आणि जनतेचा अधिकार आहे. त्याला लाभार्थी म्हणून हिणवणे चुकीचे आहे. हरिसाल डिजिटल व्हिलेज असल्याचा दावा केला जातो. त्या ठिकाणी ना वीज, ना मोबाईल नेटवर्क, ना स्वाइप मशिनचा वापर. अशाच स्वप्नवत गोष्टींमध्ये सामान्य जनतेला खिळवून ठेवले जात आहे. राष्ट्रवादी सरसकट कर्जमाफीशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनीदेखील सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. विदर्भला सोडले वाऱ्यावर ः मुंडे भाजपला विदर्भातून गठ्ठा मते मिळाली आणि हाच प्रदेश आता वाऱ्यावर सोडला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांनी केला. आत्महत्या, फवारणी मृत्यू प्रकरणात सरकारची भूमिका सशंयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचा हा मोर्चा १२ डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे, असेही ते म्हणाले. ‘फुलमाळी यांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च राष्ट्रवादी करणार’ गजानन फुलमाळी यांचा फवारणीदरम्यान मृत्यू झाला होता. त्यांच्या दोन मुली आणि एका मुलाच्या शिक्षणाचा खर्च राष्ट्रवादी करणार असल्याची घोषणा या वेळी करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com