सोयाबीन, कापूस अन् हळदीत घट

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

एनसीडीइएक्समध्ये या सप्ताहात कापूस व हळद वगळता सर्वच पिकांत वाढ झाली. सर्वाधिक वाढ साखरेत (९.२ टक्के) होती. सर्वाधिक घट हळदीत (४ टक्के) झाली. सर्व खरीप पिकांचे नजीकचे व्यवहार सध्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांच्या डिलिव्हरीसाठी सुरू झाले आहेत. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन, कापूस व हळदीत घट होईल. इतरांचे भाव वाढतील. या सप्ताहातसुद्धा माॅन्सूनने समाधानकारक प्रगती केली आहे. १ जूनपासून २६ जूनपर्यंत झालेला पाऊस सरासरीपेक्षा १० टक्क्यांनी कमी होता. ३ जुलैपर्यंत तो आता ७ टक्क्यांनी कमी आहे. सरासरीपेक्षा अधिक पाऊस हरयाना पंजाब, राजस्थान, कोकण, मराठवाडा व तमिळनाडू येथे झाला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस आसाम, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, ओरिसा व गुजरात येथे झाला आहे. पुढील सप्ताहात माॅन्सूनची प्रगती चालू राहील असा अंदाज आहे. या वर्षी एकूण पाऊस सरासरी गाठेल अशी अपेक्षा आहे. सर्व खरीप पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढेल असासुद्धा अंदाज केला जात आहे. २ जुलै रोजी एनसीडीइएक्समध्ये नोव्हेंबर २०१८ डिलिव्हरीसाठी मका (रबी), मका खरीप (सांगली), हळद, व गहू यांचे व्यवहार सुरू झाले. त्याशिवाय डिसेंबर २०१८ डिलिव्हरीसाठी हरभरा व फेब्रुवारी २०१९ डिलिवरीसाठी सोयाबीन यांचे व्यवहार सुरू झाले. अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे भारताची चीनला निर्यात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोयाबीन पेंडीवरील आयात शुल्क चीनने कमी केले आहे. कापसाची निर्यातसुद्धा भविष्यात वाढण्याचा संभव आहे. ४ जुलै रोजी केंद्र शासनाने २०१८-१९ खरीप पिकांचे हमी भाव जाहीर केले. २०१७-१८ च्या तुलनेने यांत मोठी वाढ केली आहे. त्याचबरोबर जरी बाजारातील किमती कमी झाल्या तरी हमीभाव मिळतील अशी यंत्रणा निर्माण केली जाईल असे आश्वासन दिले आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते. मका रबी मक्याच्या (ऑगस्ट २०१८) किमती जून महिन्यात घसरत होत्या (रु. १,२५४ ते रु. १,१८३). या सप्ताहात त्या १.७ टक्क्यांनी वाढून रु. १,१४९ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,१२० वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,२३५ वर आहेत. उत्पादन वाढलेले आहे. खरीपातील वाढत्या उत्पादनाच्या अपेक्षेने किमतींत यापुढे घट संभवते. जर साठा असेल तर तो विकून टाकणे योग्य होईल. खरीप मका (सांगली) चा नोव्हेंबर २०१८ डिलिव्हरी भाव १,३३० आहे. नवीन हमीभाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). साखर साखरेच्या (ऑगस्ट २०१८) किमती जून महिन्यात वाढत होत्या (रु. २,८९३ ते रु. ३,११०). या सप्ताहात त्या ९.२ टक्क्यांनी वाढून रु. ३,३२३ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,२९२ वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. डिसेंबर (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,३२३ वर आल्या आहेत. सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जून महिन्यात वाढत होत्या (रु. ३,३१७ ते रु. ३,४७१). नंतर त्या घसरू लागल्या. या सप्ताहात त्या ३.३ टक्क्यांनी वाढून रु. ३,४८७ पर्यंत आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,६४२ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८, डिसेंबर २०१८, जानेवारी २०१९ व फेब्रुवारी २०१९ च्या किमती अनुक्रमे रु. ३,४७५, रु. ३,५०८, रु. ३,५४१ व रु. ३,५७४ आहेत. जागतिक व भारताचे या वर्षीचे उत्पादन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन हमी भाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). हळद हळदीच्या फ्युचर्स (ऑगस्ट २०१८) किमती जून महिन्यात रु. ७०९२ व रु. ७५२८ दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. या सप्ताहात त्या ४ टक्क्यांनी घसरून रु. ७,०९४ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,३५४ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १.६ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ७,२३४). मागणी टिकून आहे. आता आवक कमी होऊ लागली आहे. स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. किमती वाढण्याचा कल आहे. गहू गव्हाच्या (ऑगस्ट २०१८) किमती १३ जूननंतर वाढत होत्या (रु. १,७९१ ते रु. १,८४८). या सप्ताहात त्या रु. १,८४१ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,८०१ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,८८३). पुढील दिवसांत मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत. शासनाचा हमीभाव (बोनस सहित) रु. १,७३५ आहे. गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जून महिन्यात वाढत होत्या. (रु. ३,७३८ ते रु. ३,९९८). या सप्ताहात त्या ६.८ टक्क्यांनी वाढून रु. ४,०३५ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती ७.६ टक्क्यांनी वाढून रु. ३,९४४ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा नोव्हेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती २.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,०३५). हरभरा हरभऱ्याच्या फ्युचर्स (ऑगस्ट २०१८) किमती जून महिन्यात रु. ३,३५३ रु. ३,६३५ या दरम्यान होत्या. या सप्ताहात रु. ३,६१९ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ३,५८२ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ४.६ टक्क्यांनी अधिक आहेत. (रु. ३,७४८). कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती १२ जूननंतर घसरत आहेत (रु. २४,११० ते रु. २२,८००). या सप्ताहात त्या १.४ टक्क्यांनी घसरून रु. २२,६९० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २२,७१४ वर आल्या आहेत. नोव्हेंबर व डिसेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती अनुक्रमे रु. २२,३३० व रु. २२,३४० आहेत. आंतर-राष्ट्रीय किमती घसरत आहेत. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किंमत प्रति १४० किलोची गाठ). arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com