सोयाबीनच्या फ्युचर्स भावात नरमाई

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

एनसीडिएक्स मध्ये या सप्ताहात कापूस, साखर, हळद, गहू व गवार बी यांच्या किमतींत वाढ झाली. सर्वात अधिक वाढ साखरेत (१०.७ टक्के) झाली. मका, सोयाबीन व हरभरा यांच्यात घसरण झाली. सर्वांत अधिक घट हरभ-यात (६.४ टक्के) झाली. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यात सोयाबीनमध्ये घट होईल. इतरांचे भाव वाढतील.   माॅन्सूनने १३ जून पर्यंत ओडिशा, प. बंगाल, आसाम, अरुणाचल व मेघालय मध्ये प्रवेश केला आहे. पुढील सप्ताहात अधिक प्रगती होण्यासाठी परिस्थिती सध्या अनुकूल नाही. १ जूनपासून आतापर्यंत झालेला पाउस सरासरीपेक्षा १० टक्क्यांनी कमी आहे. अर्थात मान्सूनची ही सुरवात आहे. पुढील काही दिवसांत ही कसर भरून निघेल व पाउस पुन्हा सक्रिय होईल अशी अपेक्षा आहे. या वर्षी एकूण पाउस सरासरी गाठेल असा अंदाज आहे. कापसाखेरीज इतर सर्व खरीप पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढेल असा अंदाज केला जात आहे. साखरेचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होत आहेत. भारतातील भावातील घसरण थांबवण्यासाठी शासनाने किमान विक्री किमत जाहीर केली आहे व त्याचबरोबर इतर सवलतींसाठी रु. ७००० कोटी मंजूर केले आहेत. पुढील काही दिवसांत याचा अनुकूल परिणाम दिसेल, अशी अपेक्षा आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते. मका रबी मक्याच्या (जुलै २०१८) किमती मे महिन्यात वाढत होत्या (रु. १,१७० ते रु. १,२३३). जून मध्ये त्या घसरत आहेत. या सप्ताहात त्या १.५ टक्क्यांनी घसरून रु. १,१७२ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,१३२ वर आल्या आहेत. सप्टेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,२१४ वर आहेत. हमी भाव रु. १,४२५ आहे. उत्पादन वाढलेले आहे. मात्र मागणीसुद्धा वाढत आहे. खरिपातील वाढत्या उत्पादनाच्या अपेक्षेने किमतींत या पुढे घट संभवते. साखर साखरेच्या (जुलै २०१८) किमती १८ मेपर्यंत घसरत होत्या (रु. २,७४२ ते रु. २,६३३). त्यानंतर त्या वाढत आहेत. या सप्ताहात त्या १०.७ टक्क्यांनी वाढून रु. ३,२१४ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१९० वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. ऑक्टोबर (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,२३३ वर आल्या आहेत. पुढील काही दिवसांत वाढ अपेक्षित आहे. सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (जुलै २०१८) किमती २२ मे पर्यंत वाढत होत्या (रु. ३,७१८ ते रु. ३,८२३). नंतर त्या घसरू लागल्या. या सप्ताहात त्या पुन्हा ३.७ टक्क्यांनी घसरून रु. ३,४०४ पर्यंत आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,४८८ वर आहेत. ऑक्टोबर २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,३१७ वर आल्या आहेत. जागतिक व भारताचे या वर्षीचे उत्पादन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोया-पेंडीची बंगला देशाला होणारी निर्यात या वर्षी कमी होण्याचा संभव आहे. किमतींचा कल नरम राहील. हळद हळदीच्या फ्युचर्स (जुलै २०१८) किमती मे महिन्यात घसरत होत्या (रु. ७,७७६ ते रु. ७,१७०). या सप्ताहातमात्र त्या २.३ टक्क्यांनी वाढून रु. ७,१९० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,३०१ वर आल्या आहेत. सप्टेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ०.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ७,३४६). मागणी टिकून आहे. आता आवक कमी होऊ लागली आहे. स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. किमती वाढण्याचा कल आहे. गहू गव्हाच्या (जुलै २०१८) किमती २४ मे पर्यंत वाढत होत्या (रु. १,७६७ ते रु. १,८४७). त्यानंतर त्या घसरू लागल्या आहेत. या सप्ताहात त्या ०.७ टक्क्यांनी वाढून रु. १,७८८ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,७७७ वर आल्या आहेत. सप्टेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,८३६). पुढील दिवसात मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत. शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. १,७३५ आहे. गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (जुलै २०१८) किमती १५ मे पासून घसरत आहेत (रु. ३,९७८ ते रु. ३,६७८). या सप्ताहात त्या ०.५ टक्क्यांनी वाढून रु. ३,६४० वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती १.१ टक्क्यांनी वाढून रु. ३,६९० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा ऑक्टोबर २०१८ मधील फ्युचर्स किमती २.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,७७४). जून महिन्यात किमती घसरण्याचा संभव आहे. हरभरा १४ मेनंतर हरभऱ्याच्या फ्युचर्स (जुलै २०१८) किमती घसरत आहेत (रु. ३७१९ ते रु. ३५४५). या सप्ताहात त्या ६.४ टक्क्यांनी घसरून रु. ३,३१० वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ३,४०० वर आल्या आहेत. सप्टेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ०.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,४१५). शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. ४,४०० आहे. एप्रिल नंतर भाव घसरू नयेत यासाठी शासनाचे प्रयत्न चालू आहेत. आयात शुल्क त्यामुळे ३० टक्के लावण्यात आले आहे. विक्रीवरील स्पेशल मार्जिन सुद्धा वाढवले आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, राजस्थान, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यात शासनाची खरेदी सुरु झाली आहे. मात्र त्यांचा परिणाम हरभ- याचा साठा बराच असल्याने मर्यादित राहील. कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (जुलै २०१८) किमती १४ मेनंतर वाढत आहेत (रु. २१,००० ते रु.२२,६५०). या सप्ताहात त्या ३.७ टक्क्यांनी वाढून रु. २३,३४० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती ४ टक्क्यांनी वाढून रु. २२,४५२ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ७.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २४,११०). कापसाची निर्यात वाढती आहे. अमेरिका व चीन मध्ये प्रतिकूल हवामानामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. किमतींत वाढ होण्याचा संभव आहे. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलोची गाठी). arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com