पपईच्या बनावट बियाणेप्रकरणी चौघांना अटक

पपईच्या बनावट बियाणेप्रकरणी चौघांना अटक
पपईच्या बनावट बियाणेप्रकरणी चौघांना अटक

कोल्हापूर : नामवंत कंपनीच्या पपई बियाण्यांच्या पॅकिंगमध्ये बनावट बियाणे घालून त्याची विक्री करणाऱ्या हासूर (ता. शिरोळ) येथील चौघांना पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून पॅकिंगसह ३५ किलो बनावट बिया असा सुमारे साडेअठरा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्‍यता असून, त्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  रवी रावसाहेब पाटील (वय २८), बालवीर जयपाल मल्लिवाडे (वय ४०), पंकज लगमाण्णा माणगावे (वय ३५) आणि बाबासाहेब ऊर्फ दीपक पासगोंडा गाडवे (वय ३१, सर्व रा. हासूर, ता. शिरोळ) अशी संशयितांची नावे आहेत.  हासूर (ता. शिरोळ) येथे संशयित रवी पाटील आणि बालवीर मल्लिवाडे हे दोघे आपल्या घरात नामवंत कंपनीच्या नावाने पपईच्या बनावट बिया पॅकिंग करत असल्याची माहिती मुंबईतील डिटेक्‍टिव्ह सर्व्हिसेस कंपनीला मिळाली. त्यांनी याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या पथकाने छापा टाकला. त्या वेळी त्या दोघांच्या घरात नामवंत कंपनीच्या १२७२ पॅकिंगमध्ये ३५ किलो पपई फळाच्या बनावट बिया, दोन मशिनसह इतर साहित्य असा १८ लाख ४२ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी त्या दोघांसह संशयित पंकज, बाबासाहेब अशा चौघांना अटक केली. त्यांच्यावर कॉपिराइट ॲक्‍ट १९५७ च्या सुधारित अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला. ही कारवाई उपनिरीक्षक राजेंद्र सानप, सहायक फौजदार विजय गुरखे, पोलिस कर्मचारी गुलाब पाटील, श्रीकांत पाटील आणि आय. पी. इन्व्हेस्टिगेशन ॲण्ड डिटेक्‍टिव्ह सर्व्हिसेस कंपनीतील कर्मचाऱ्यांनी केली.  मोठ्या रॅकेटची शक्‍यता  मोठ्या कंपनीच्या पॅकिंगमध्ये बनावट बियाणे मिसळून विकण्याच्या या कामात कोण कोण सहभागी आहेत याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. यामध्ये आणखी कोणा कोणाचा समावेश आहे. कंपन्यांचे कोणी कर्मचारी सहभागी आहेत का? या दृष्टीने पोलिसांनी पावले उचलण्यास सुरवात केली आहे. सध्या हे पॅकिंग जिथे उपलब्ध आहेत, त्याची माहिती आम्ही घेत आहोत. फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन आम्ही केल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितले. असे होत होते बियांचे पॅकिंग  संशयित रवी, बालवीर, पंकज, बाबासाहेब हे एकाच गावातील आहेत. ते चौघे मिळून पपईच्या बागांमध्ये जात होते. तेथील मालकाकडून गळून पडलेल्या पपया गोळा करायचे. त्या वाळवून त्यातील बिया एकत्रित करत होते. त्यानंतर नामवंत कंपनीच्या पॅकिंगमध्ये ते भरून त्याची विक्री करायचे. हा प्रकार ऑक्‍टोबर २०१८ पासून ते चौघे करत होते, असे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. या बी-बियाण्यांची विक्री दुकानदारांना की थेट शेतकऱ्यांना केली, याची माहिती पोलिस घेत आहेत.  कृषी विभागाला गुंगारा  शिरोळ तालुक्‍यातच हा प्रकार होत असूनही कृषी विभागाच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला याचा संशयही आला नाही. किंवा त्यांनी आपल्या गुणवत्ता विभागाच्या पथकाकडून खात्रीही करुन घेतली नाही. शेतकऱ्यांची तक्रार नसल्याने आम्हाला याबाबतची कल्पना नसल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पोलिसांच्या तपासात ऑक्‍टोबरपासून हा प्रकार सुरू असल्याचे म्हटले असले, तरी गेल्या कित्येक वर्षापासून बनावट बियाणे तयार करण्यात येत असल्याची चर्चा आहे. तरीही कृषी विभागाला या बाबत काहीच माहिती नसू नये याबाबत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com