हवाई दलात चार ‘चिनुक' हेलिकॉप्टर सामील

हवाई दलात चार ‘चिनुक' हेलिकॉप्टर सामील
हवाई दलात चार ‘चिनुक' हेलिकॉप्टर सामील

चंडीगड ः ‘चिनुक' हेलिकॉप्टरमुळे परिस्थितीत बदल होईल, असा विश्‍वास हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी सोमवारी (ता.२५)  येथे व्यक्त केला. अमेरिकन बनावटीची ही चार हेलिकॉप्टर आज एका कार्यक्रमात हवाई दलात सामील करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. बोइंग कंपनीबरोबर सप्टेंबर २०१५ मध्ये झालेल्या करारानुसार, भारत १५ ‘सीएच-४७ एफ (आय)' हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे. हा व्यवहार १.५ अब्ज डॉलरचा आहे. त्यातील पहिली चार हेलिकॉप्टर आज दाखल झाली. हवाई दलाच्या १२६ व्या हेलिकॉप्टर युनिटमध्ये ती सेवा बजावतील. ऊर्वरित हेलिकॉप्टर २०२० पर्यंत दाखल होतील. यातील काही आसाममधील दिनजान तळावर कार्यरत राहतील. उंच प्रदेशात अवजड सामग्री वाहून नेण्याची क्षमता हे ‘चिनुक'चे वैशिष्ट्य आहे. सैनिकांची ने-आण करणे, लष्करी वाहने उचलून नेणे तसेच तोफा, इंधन व शस्त्रसामग्रीच्या वाहतुकीसाठीसुद्धा ती उपयुक्त आहेत. या हेलिकॉप्टरला दोन इंजिने आहेत. दिवसाप्रमाणे रात्रीही वापरता येणे हा या हेलिकॉप्टरचा आणखी एक फायदा आहे. मदतकार्यातही ही हेलिकॉप्टर वापरता येऊ शकतात. दुर्गम प्रदेशात लष्करी सामग्री वाहून नेण्याचे आव्हान सुरक्षा दलांपुढे असते. हवाई दलाचे वैमानिक समुद्रसपाटीपासून अति उंचावरच्या प्रदेशांत कार्यरत असतात. "चिनुक'च्या समावेशामुळे आता दुर्गम प्रदेशांत सामग्री नेणे सुलभ होईल, असे एअर चीफ मार्शल धनोआ यांनी नमूद केले. या वेळी हवाई दलाच्या पश्‍चिम विभागाचे प्रमुख एअर मार्शल आर. नम्बियार, बोइंगचे भारतातील प्रमुख सलिल गुप्ते तसेच अमेरिकेचे मेजर जनरल रॉबिन फॉंट्‌स उपस्थित होते. १९ देशांत कार्यरत अवजड सामग्री वाहून नेण्याची क्षमता हे 'चिनुक'चे वैशिष्ट्य आहे. ते एकावेळी ११ टन वजन आणि ४५ सैनिक नेऊ शकते. ही हेलिकॉप्टर सध्या ब्रिटन, कॅनडा, जपान, दक्षिण कोरिया, संयुक्त अरब अमिराती, इटली, ऑस्ट्रेलिया, स्पेन, नेदरलॅंड, ग्रीस आदी १९ देशांच्या सैन्यांमध्ये कार्यरत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com