चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार निवडणूक रिंगणात

चौथ्या टप्प्यातील टॉप टेन श्रीमंत उमदेवार
चौथ्या टप्प्यातील टॉप टेन श्रीमंत उमदेवार

मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक धनशक्तीची ठरली आहे. १७ लोकसभा मतदारसंघांत एकूण ३२० उमेदवार आपले नशीब अाजमावत असून, त्यातील १०९ उमेदवार कोट्यधीश आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या प्रस्थापित पक्षांचे सर्व उमेदवार कोट्यवधींच्या संपत्तीचे धनी आहेत. या शिवाय निवडणूक लढवत असलेल्या ८९ उमेदवारांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी येत्या २९ एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र इलेक्शन वॉच’ आणि ‘असोसिएशन फॉर डेमोक्रटिक रिफार्म्स’ (एडीआर) या संस्थेने उमेदवारांच्या आर्थिक, शैक्षणिक तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे त्यांच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे विश्लेषण केले आहे. संस्थेच्या माहितीनुसार निवडणूक लढवत असलेले ३४ टक्के उमेदवार हे आर्थिकदृष्ट्या गब्बर आहेत. दलित, मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पक्षाचे प्रत्येकी सहा उमेदवार कोट्यधीश आहेत. 

निवडणूक लढवत असलेल्या ३२० पैकी ८९ उमेदवारांनी आपल्या विरोधात गुन्हेगारीची प्रकरणे दाखल असल्याचे घोषित केले आहे. यापैकी ६४ उमेदवारांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. दोन उमेदवारांच्या विरोधात गुन्हे सिद्ध झाले असून, वंचित बहुजन आघाडीचे नाशिकचे उमदेवार पवन पवार यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तीन उमेदवार असे आहेत की ज्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आहे. 

तसेच दहा उमेदवारांनी आपल्या विरोधात महिला अत्याचाराशी तर दोन उमेदवारांनी त्यांच्यावर अपहरणाशी संबंधित गुन्हा दाखल असल्याचे जाहीर केले आहे. गुन्हेगारी स्वरूपाचे प्रकरण दाखल असलेल्या उमेदवारांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या १७ पैकी ७, बहुजन समाज पक्षाच्या १५ पैकी ४, काँग्रेसच्या ९ पैकी ४, भाजपच्या ७ पैकी ४, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७ पैकी ५ उमेदवारांचा समावेश आहे.  

चौथ्या टप्प्यातील टॉप टेन श्रीमंत उमदेवार
उमेदवार जाहीर केलेली संपत्ती
संजय सुशील भोसले (वंबआ) १२५ कोटी ६ लाख
श्रीरंग बारणे (शिवसेना) १०२ कोटी ३३ लाख
प्रिया दत्त (काँग्रेस) ९६ कोटी २० लाख
मिलिंद देवरा (काँग्रेस) ७९ कोटी ३२ लाख
ऊर्मिला मातोंडकर (काँग्रेस) ६८ कोटी ९० लाख
समीर भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस) ६५ कोटी ४६ लाख
सुभाष पासी (समाजवादी पक्ष) ६४ कोटी २० लाख
इंजिनिअर नवीन बेताब (अपक्ष) ५१ कोटी २ लाख
बाबाजी पाटील (राष्ट्रवादी) ४२ कोटी १८ लाख
कुणाल पाटील (काँग्रेस) ४२ कोटी ९ लाख

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com