परभणी जिल्ह्याला ठिबक अनुदानापोटी १४ कोटी

ठिबक सिंचन संच
ठिबक सिंचन संच
परभणी : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत २०१७-१८ मध्ये ठिबक आणि तुषार संचाच्या अनुदासाठी प्रस्ताव सादर केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी १४ कोटी १७ लाख ४४ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जात असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
 
दरम्यान, जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत १३ हजार ९४० शेतकऱ्यांना ठिबक संचाचे ५९ कोटी ४७ लाख १२ हजार रुपये, ६ हजार ७६४ शेतकऱ्यांना तुषार सिंचासाठी ७ कोटी ६० लाख ९५ हजार रुपये अशा एकूण २० हजार ७०४ शेतकऱ्यांना ६७ कोटी ८ लाख ७ हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात १५ हजार ९९८.२३ हेक्टर क्षेत्रावर ठिबक आणि ५ हजार ५३८.९५ हेक्टर अशा एकूण २१ हजार ५३७.१८ हेक्टर क्षेत्रावर सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब केला जात आहे.
 
२०१७-१८ या वर्षात ६८०० शेतकऱ्यांनी ठिबक आणि तुषार संचासाठी अर्ज केले आहेत. यंदा पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गतचे अनुदान लवकर प्राप्त झाले आहे. यामध्ये केंद्राच्या हिश्शाचे ३ कोटी ६३ लाख ७७ हजार रुपये, राज्याच्या हिश्शाचे २ कोटी ४२ लाख ५१ हजार रुपये दोन्ही मिळून एकूण ६ कोटी ६ लाख २८ हजार रुपये, तसेच मराठवाडा राज्य योजनेअंतर्गत ७ कोटी ८७ लाख ९२ हजार रुपये, तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या हिश्शाचे २३ कोटी २४ लाख रुपये, असा एकूण १४ कोटी १७ लाख ४४ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
 
अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राज्य हिश्शाचा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यासाठी १५ लाख ५० हजारांची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे करण्यात आली आहे. २०१२-१३ मध्ये ठिबक आणि तुषार संचाचे मिळून एकूण ४५८० शेतकऱ्यांना १६ कोटी ८९ लाख १७ हजार रुपये, २०१३-१४ मध्ये ५३६४ शेतकऱ्यांना २० कोटी २५ लाख ९ हजार रुपये, २०१४-१५ मध्ये ४१४२ शेतकऱ्यांना ११ कोटी ६८ लाख २४ हजार रुपये, २०१५-१६ मध्ये १५४३ शेतकऱ्यांना ४ कोटी ११ लाख २४ हजार रुपये, २०१६-१७ मध्ये ५०७५ शेतकऱ्यांना १४ कोटी १४ लाख ३३ हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे.
 
गेल्या पाच वर्षांमध्ये सूक्ष्म सिंचन संचाचे एकूण २० हजार ७०४ शेतकऱ्यांना ६७ कोटी ८ लाख ७ हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com