भविष्यात मंगळावर शेती शक्य ः डॉ. माशेलकर

कोणत्याही वैज्ञानिक मोहिमांपेक्षा मूलभूत विज्ञानावर जास्त खर्च झाला पाहिजे. कारण, तंत्रज्ञानाचे मूळ हे मूलभूत विज्ञानात असते. - डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ
भविष्यात मंगळावर शेती शक्य ः डॉ. माशेलकर
भविष्यात मंगळावर शेती शक्य ः डॉ. माशेलकर

पुणे : जगभरात विज्ञान तंत्रज्ञानाचा अविश्वसनीय वेगाने प्रसार सुरू आहे. त्यामुळे भविष्यात मंगळावरदेखील शेती होऊ शकते, असे मत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) या संघटनेचे माजी महासंचालक प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.

पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने आयोजित केलेल्या शेतीविषयक राज्यस्तरीय विचार स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. शेतकरीपुत्र व शेतकरीकन्या व्यासपीठावर आणि प्रमुख पाहुणे श्रोत्यांमध्ये असे वैशिष्टय या सोहळ्याचे होते. 'कालची, आजची आणि उद्याची शेती' या विषयावर स्पर्धेत राज्यातील ५१ हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

'आजच्या युगात अशक्य काहीच नाही. माणूस उडू शकतो का? असा एक प्रश्न काही शतकांपूर्वी होता; मात्र १९०४ मध्ये राइट बंधून विमान चालवून ते शक्य करून दाखविले. १०० वर्षांपूर्वी मोबाईल ही संकल्पना शक्य वाटत नव्हती, असे डॉ. माशेलकर म्हणाले.

इंडियन रोझ सोसायटीचे अध्यक्ष सुरेश पिंगळे या वेळी म्हणाले, की राज्यातील खेड्यामध्ये शेतकऱ्यांची मुलेदेखील शेतीच्या भवितव्याविषयी किती खोलवर विचार करतात आणि त्यांची इच्छाशक्ती दांडगी असते हे या विद्यार्थ्यांचे निबंध वाचल्यानंतर लक्षात येते. या विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक शेतीचा प्रचंड ध्यास दिसून येतो.

शेतीविषयक उत्कृष्ट निबंध सादर केल्याबद्दल या वेळी पायल बोबडे (विदर्भ), प्रतीक्षा सावंत (कोकण), प्रगती केसकर (मराठवाडा), मोरेश्वरी बेहडे (खानदेश) यांच्यासह माधुरी नवघारे, सृष्टी भागवत, रेखा महाजन, चैत्राली ओक व इतर गुणवंत विद्यार्थांचा गौरव करण्यात आला.

पुण्याच्या इंदापूर भागातील दहावीत शिकणारा शेतकरीपुत्र विवेक गायकवाड याने कवितेतून आपली व्यथा मांडली. तो म्हणाला.. या मातीत मातीत, माझ्या आईचं काळीज या मातीत मातीत, माझ्या बापाचं रगातं या मातीत मातीत, सर्जा राजाच्या साथीतं उभं आयुष्य हे माझं, माझ्या आईच्या कुशीतं

या वेळी राज्याचे माजी मुख्य सचिव अजित निंबाळकर, अर्थतज्ज्ञ विजय केळकर, माजी अतिरिक्त मुख्य सचिव प्रभाकर करंदीकर, अभिनेता सारंग साठे, पत्रकार उदय निरगुडकर, उद्योजक अनिल सुपनेकर, लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

इन्स्टट 'कॉफी' असते; पण 'सक्सेस' नाही 'ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची ज्ञानशक्ती पाहून भारताविषयीचा माझा आशावाद अजून दुर्दम्य होतो; मात्र विद्यार्थ्यांनी जगात नाव होईल, अशी महत्त्वाकांक्षा ठेवावी. इन्स्टट कॉफी असते; पण इन्सन्ट सक्सेस कधीच नसते. त्यामुळे प्रचंड मेहनत आणि घाम गाळण्याची तयारी ठेवा, असा सल्ला डॉ. माशेलकर यांनी या वेळी दिला.

भारत सुपर पॉवर बनण्याची स्वप्न मी पाहत नाही. त्यापेक्षा मला १३० कोटी भारतीयांच्या चेहऱ्यावर हसू पाहायचे आहे. कोणत्याही वैज्ञानिक मोहिमांपेक्षा मूलभूत विज्ञानावर जास्त खर्च झाला पाहिजे. कारण, तंत्रज्ञानाचे मूळ हे मूलभूत विज्ञानात असते, असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com