लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकर

पैलवान आंदळकर म्हणजे साडेसहा फूट उंची. पैलवान म्हणजे लबलबीत शरीर ही समजूत त्यांनी आपल्या सडपातळ यष्टीतून खोडून काढली. दणकट शरीर; पण कोठेही चरबीचा लवलेश नाही, अशी शरीरयष्टी त्यांनी कमावली. बाहेर फिरताना लुंगी, शर्ट व पायात कोल्हापुरी चप्पल हाच पेहराव कायम ठेवला आणि हजारात उठून दिसावा, असा आपला करिश्‍मा अखेरपर्यंत जपताना त्यांनी मातीशी इमान राखले.
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकर
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकर

कोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८ वर्षांपूवीचा हा प्रसंग आहे. त्या वेळी जुन्या राजवाड्याच्या कमानीत बर्ची बहाद्दर हत्ती झुलत होता. त्यादिवशी अचानक हा हत्ती बिथरला आणि शहरातून सैरावैरा धावत सुटला. वाटेत दिसेल ते वाहन उलटे-पालटे करू लागला. हत्ती पुढे आणि त्याला आरडाओरड करीत गोंधळून टाकणारा हजार-दोन हजारांचा जमाव मागे, त्यामुळे हत्ती अधिकच बिथरला. त्याला बंदुकीच्या गोळ्या घालून जायबंदी करण्याचा निर्णय झाला. अशावेळी मोतीबाग तालमीतला एक भरदार शरीरयष्टीचा वस्ताद सोबत चाळीस-पन्नास पैलवान घेऊन बाहेर पडला आणि आक्रमक हत्तीला या ना त्या मार्गाने रोखण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला. आक्रमक हत्तीच्या पुढे केळीचे घड, गवताच्या पेंड्या टाकत-टाकत त्यांनी हत्तीला पुन्हा जुन्या राजवाड्यापर्यंत आणले. बिथरलेल्या हत्तीला खरोखर रोखण्याचे काम या पैलवानांनी केले. पैलवानांच्या या पथकाचे प्रमुख होते हिंदकेसरी गणपतराव आंदळकर. लाल मातीत कर्तृत्व गाजविणाऱ्या आंदळकरांनी आक्रमक हत्तीला रोखून पैलवानकीतील आपल्या धैर्याचे दर्शन साऱ्या कोल्हापूरकरांना दाखविले होते. आज त्यांचे निधन झाले आणि जुना राजवाडा आवारातील मोतीबाग तालमीत जमलेल्या आंदळकर चाहत्यांनी या प्रसंगाला उजाळा देत आंदळकरांच्या आयुष्यातील विविध पैलू उलगडले. 

पैलवान आंदळकर म्हणजे साडेसहा फूट उंची. पैलवान म्हणजे लबलबीत शरीर ही समजूत त्यांनी आपल्या सडपातळ यष्टीतून खोडून काढली. दणकट शरीर; पण कोठेही चरबीचा लवलेश नाही, अशी शरीरयष्टी त्यांनी कमावली. बाहेर फिरताना लुंगी, शर्ट व पायात कोल्हापुरी चप्पल हाच पेहराव कायम ठेवला आणि हजारात उठून दिसावा, असा आपला करिश्‍मा अखेरपर्यंत जपताना त्यांनी मातीशी इमान राखले. ते रस्त्यावरून चालत निघाले की पैलवानकीचे शानदार दर्शन त्यांच्या रूपातून दिसायचे आणि कोल्हापूरच्या लाल मातीचे महत्त्व अधिक ठळकपणे नव्या पिढीसमोर यायचे. त्यांची भवानी मंडपातील तालीम म्हणजे तो जुना राजवाड्याचाच एक भाग होता. तेथे लावलेल्या विविध फुलझाडांतूनच भवानी देवीची रोज पूजा-अर्चा होत होती. अशा ऐतिहासिक तालमीत वस्ताद म्हणून वावरताना आंदळकर यांनी वस्ताद या पदाची उंची अधिक वाढवली.

पैलवान म्हणजे जो तो त्याच्या मस्तीत; पण वस्ताद आंदळकर समोर आले की सारे पैलवान त्यांच्यासमोर आदराने उभे राहत. पैलवानांचा सराव करून घ्यायला ते आखाड्याजवळ उभे राहिले की पैलवानांचा अक्षरक्ष: घाम काढायचे. अंग चोरून व्यायाम करणाऱ्या पैलवानाला नजरेच्या इशाऱ्यावर समज द्यायचे. पैलवानांनी पैलवानकीची सर्व तत्त्वे तंतोतंत पाळलीच पाहिजेत, हा त्यांचा आग्रह होता. रात्री नऊच्या आत पैलवान झोपलाच पाहिजे आणि पहाटे चारच्या ठोक्‍याला पैलवान उठलाच पाहिजे, यासाठी त्यांनी पैलवानांना शिस्त लावली. पैलवानांच्या आहार-विहारावर काटेकोरपणे लक्ष ठेवले. पैलवानकीमुळे कमावलेल्या शरीराचा आधार घेत कोणीही पैलवानाने समाजात आपले ‘वजन’ वापरू नये, यासाठी ते काटेकोर राहिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com