राज्यात लसूण प्रतिक्विंटल ८०० ते ४००० रुपये

लसूण दर
लसूण दर

पुणे ः राज्यातील बाजार समित्यांंमध्ये सध्या लसणाची आवक कमीच होत आहे. मागणी कायम असल्याने लसणाला चांगले दर मिळत आहेत. राज्यात सर्वाधिक ४००० रुपये प्रतिक्विंटल दर सांगलीत मिळाला. तर सर्वांत कमी ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर नागपूर आणि पुणे बाजारात मिळाला.  

जळगावात १८०० ते ३००० रुपये येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त दर शुक्रवारी लसणाचे लिलाव होतात. मागील महिनाभरात लसणाला सरासरी ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. आवकी १८ ते २१ क्विंटल एवढी राहिली आहे. जिल्ह्यातून फारशी लसणाची आवक होत नाही. काही शेतकरी लसणाची लागवड करतात, परंतु अधिक उत्पादन व विक्री याकडे त्यांचा कल नसतो. आपल्या कुटुंबापुरते उत्पादन घेण्याचा दृष्टिकोन शेतकऱ्यांचा आहे. येथील बाजार समितीमध्ये मध्य प्रदेशातील हरदा, बडवानी, खंडवा व नर्मदा काठांवरील इतर गावांमधून लसणाची आवक होते. आवक कमी असते म्हणून दर शुक्रवारी त्याचे लिलाव होतात. मध्य प्रदेशातील पाच ते १० शेतकरी मिळून एका मालवाहूमध्ये आपला लसूण आणतात. मागील शुक्रवारी धूलिवंदनाची सुटी होती. त्यामुळे आवक झाली नाही, असे बाजार समितीमधील सूत्रांनी म्हटले आहे. २३ फेब्रुवारीला २१ क्विंटल आवक होऊन १८०० ते ३००० व सरासरी २५०० रुपये दरम मिळाला. 

सांगलीत २००० ते ४००० रुपये येथील विष्णुअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात लसणाची आवक कमी अधिक प्रमाणात होते. बुधवारी (ता. ७) लसणाची ९४ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रति क्विंटल २००० ते ४०००, तर सरासरी ३००० रुपये असा दर होता. अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. येथील बाजार आवारात गुजरात, मध्य प्रदेश या राज्यातून लसणाची आवक होते. या बाजार समितीत लसणाची आवक कायमच कमी अधिक प्रमाणात होते. लसणाची आवक जरी कमी अधिक असली तरी गेल्या महिन्यापासून लसणाचे दर स्थिर आहे, अशी माहिती व्यापारी वर्गाने सांगितली. पुढील सप्ताहापासून लसणाच्या आवकेत वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे बाजार समितीच्या सचिवांनी सांगितले. १ मार्चला २० क्विंटल आवक होऊन २००० ते ४००० व सरासरी ३००० रुपये दर 

नगरमध्ये १००० ते २००० रुपये येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लसणाची दररोज चांगली आवक होते. गेल्या महिनाभराचा विचार करता बाजार समितीत लसणाची आवक वाढली आहे. आज (गुरुवारी) लसणाची ५१ क्विंटलची आवक होऊन एक हजार ते दोन हजार व सरासरी दीड हजाराचा दर मिळाला. नगर जिल्ह्याच्या काही भागांत लसणाचे उत्पादन घेतले जाते. याशिवाय शेजारच्या जिल्ह्यातूनही आवक होत असते. बाजार समितीत महिनाभराचा विचार केला तर १५ फेब्रुवारीला १० क्विंटलची आवक झाली होती. त्या वेळी १५०० ते २६०० रुपयाचा व सरासरी २००० रुपयांचा दर मिळाला होता. २२ फेब्रुवारीला १२ क्विटंलची आवक झाली. त्या वेळी एक हजार २८०० रुपये व सरासरी २५०० रुपयांचा दर मिळाला. एक मार्चला २६ क्विंटलची आवक झाली. त्या दिवशी एक हजार ते तीन हजार रुपयांचा दर मिळाला.

नागपुरात ८०० ते १२०० रुपये किरकोळ बाजारात ६० रुपये किलो विकल्या जाणाऱ्या लसणाला घाऊक दर मात्र जेमतेम ८०० ते १२०० रुपये क्‍विंटलचा मिळत असल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले. गेल्या महिन्यात लसणाचे दर १५०० ते २५०० रुपये क्‍विंटल होते. बाजारात वाशीम, नागपूर, मध्य प्रदेश, तसेच राज्याच्या विविध भागांतून लसणाची आवक होत आहे. कळमणा बाजारपेठेत गेल्या महिन्यात १ फेब्रुवारीला ४०४७ क्‍विंटलची आवक नोंदविण्यात आली. त्यानंतर १००० ते १५०० क्‍विंटल अशी आवक बाजारात होत आहे. एक मार्चला हीच आवक पुन्हा ३३२१ क्‍विंटलवर पोचली. पुन्हा २ मार्चला २५०० क्‍विंटल आवक आणि ५ मार्चला २७०० क्‍विंटल आवक झाली. २० फेब्रुवारीपर्यंत लसणाचे दर १००० ते २५००० रुपयांवर होते. त्यात मार्च महिन्यापासून घसरण सुरू होत हे दर ६०० ते १२०० रुपये क्‍विंटलवर पोचले. सध्या ८०० ते १२०० रुपये क्‍विंटलने लसणाचे व्यवहार होत आहेत. 

पुण्यात ८०० ते २५०० रुपये गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ८) मध्य प्रदेशातून लसणाची सुमारे ३ हजार गाेणी आवक झाली हाेती. या वेळी प्रति किलाेला ८०० ते २५०० रुपये दर हाेता. यंदा गुजरात, मध्य प्रदेशात माेठ्या प्रमाणावर लागवड असल्याने आवकदेखील चांगली राहील. परिणामी, दर स्थिर राहण्याचा अंदाज लसणाचे ज्येष्ठ व्यापारी विलास रायकर यांनी व्यक्त केला आहे. यंदा गुजरात मध्ये लागवड चाैपटीने वाढली असून, सध्या मध्य प्रदेशातून दरराेज सुमारे तीन हजार गाेणी आवक हाेत असून, दर तुलनेने कमी असल्याचे ग्राहकांकडून मागणी वाढल्याने दरराेजचा माल संपत आहे. तर एप्रिलमधील दरांवर शेतकरी बाजारात लसूण पाठविण्याचे नियाेजन करीत असून, हाच दर कायम राहिल्यास शेतकरी माल कमी पाठविण्याची शक्यता आहे. एप्रिलमधील आवकेवर त्या वेळेचा दर ठरेल, असेही रायकर यांनी या वेळी स्पष्ट केले.

परभणीत १००० ते २२०० रुपये येथील फळे, कांदा, लसूण, बटाटा मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ८) लसणाचे दर प्रतिक्विंटल १००० ते २२०० रुपये होते अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. परभणी येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केट मधून फळे,कांदा, लसूण , बटाटा मार्केटचे स्थलांतर पाथरी रस्त्यावरील जागेत झाले आहे. या ठिकाणी आठवड्यातील दर शनिवारी मध्य प्रदेशातून लसणाची आवक येते. शनिवारचेच दर आठवडाभर कायम राहतात. गेल्या महिनाभरातील प्रत्येक शनिवारी लसणाची ४०० ते ४५० क्विंटल आवक झाली. त्यास सरासरी प्रतिक्विंटल १००० ते २५०० दर मिळाले. शनिवारी (ता. ३) लसणाची ४५० क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विंटल १००० ते २२०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ८) घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल १००० ते २२०० रुपये होते, तर किरकोळ विक्री प्रतिकिलो १५ ते ३० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी महंमद रफिक यांनी सांगितले.

सोलापुरात १००० ते ३५०० रुपये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारपेठेत लसणाची आवक चांगली वाढली. शिवाय मागणी असल्याने दरही टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. लसणाला प्रतिक्विंटल सर्वाधिक ३५०० रुपये इतका दर मिळाला. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात लसणाची आवक स्थानिक भागासह बाहेरूनही झाली. पण स्थानिक भागाच्या तुलनेत बाहेरील आवक चांगली होती. गतसप्ताहात ८३८ क्विंटल इतकी आवक झाली. तर लसणाला प्रतिक्विंटल १००० ते ३२०० व सरासरी २१०० रुपये दर मिळाला. त्या आधीच्या आठवड्यात ८२३ क्विंटल आवक झाली, तर प्रतिक्विंटल १०००ते ३५०० व सरासरी २४०० रुपये दर मिळाला. १७ ते २३ फेब्रुवारीदरम्यान १२८२ क्विंटल इतकी सर्वाधिक आवक झाली, आवक वाढूनही या सप्ताहात मागणीही वाढल्याने त्या वेळी लसणाचा दर प्रतिक्विंटल १००० ते ३६०० व सरासरी २५०० रुपये राहिला. १३ ते १६ फेब्रुवारी दरम्यान ८२५ क्विंटल आवक झाली. त्या सप्ताहात ९०० ते ३६०० व सरासरी २२०० रुपये असा दर मिळाला.

साताऱ्यात १००० ते २५०० रुपये येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरवारी (ता. ८) लसणाची ६० क्विंटल आवक झाली. लसणास प्रति क्विंटलला १००० ते २५०० असा दर मिळाला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहापासून लसणाचे दर स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे. बाजार समितीत लसणाची बहुतांशी आवक मध्यप्रदेश येथून होत आहे. गुुरूवारी (ता. १) लसणाची ५१ क्विंटल आवक होऊन क्विंटलला १५०० ते २४०० असा दर मिळाला आहे. गुरूवारी (ता. २२)   लसणास क्विंटलला १५०० ते २४०० असा दर मिळाला होता. १५ फेब्रुवारी लसणाची ४० क्विंटल आवक होऊन क्विंटलला १००० ते २००० असा दर मिळाला होता.   लसणाची २०० ते २८० प्रतिकिलो प्रमाणे किरकोळ विक्री केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com