वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाच

जिनिंग
जिनिंग

जळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा उत्पादन खर्च कमी व्हावा, यासाठी राज्य सरकारने नव्या वस्त्रोद्योग धोरणात वीजेसंबंधी जीनिंग कारखान्यांना प्रतियुनिट तीन रुपये सवलत देण्याचे म्हटले आहे. एक वर्ष झाले, परंतु ही सवलत मिळालेली नाही. यातच अलीकडेच नवे पॉवर फॅक्‍टर (पीएफ) महावितरणने जीनिंगसाठी वीज वापराकरिता लागू केले असून, प्रतियुनीट अडीच रुपये दरवाढ झाली आहे.

जीनिंगना दोन महिन्यांपूर्वी सहा ते साडेसहा रुपये प्रती युनिट या दरात वीज मिळत होती. आता मात्र ही वीज साडेआठ ते नऊ रुपये प्रति युनीट या दरात मिळत आहे. वीज कंपनीने १ सप्टेंबरला वीजमीटरमधील रीडिंग घेतली. रीडिंग घेतल्यानंतर पॉवर फॅक्‍टर बदलले आहेत. त्यानुसार आपल्या वीज उपकरणांबाबत बदल करण्याचे ई-मेल जीनिंग कारखानदारांना पाठविले. रीडिंग घेतल्यानंतर हे मेल केल्याने पुरेसा अवधी मिळाला नाही. यामुळे जिनर्संना वीजबिलासोबत दंडही भरावे लागत आहे. एका जीनिंग कारखानदाराला दीड ते दोन लाख रुपये दंड वीज कंपनीने केला आहे. तर नवे वीजदर लागू केल्याने जिनर्सना अधिकची बिलेही आली आहेत.

यासंदर्भात जिनर्सनी रोष व्यक्त केला असून, उत्पादन खर्च वाढल्याने कापूस खरेदीसंबंधी अधिक दर गुजराती खरेदीदारांच्या तुलनेत कसे देणार, असा प्रश्‍नही उपस्थित केला आहे. लवकरच ही समस्या राज्य सरकारकडे मांडण्याची तयारी जीनिंग कारखानदार असोसिएशन करीत आहे.

‘टीएमसी’संबंधीचे अनुदान बंद देशात दर्जेदार रुई उत्पादनाच्या दिशेने तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने पाऊल उचलून जीनिंगचे अद्ययावतीकरण, नव्या जीनिंगची उभारणी यासाठी टेक्‍नॉलॉजी मिशन ऑफ कॉटनची (टीएमसी) सुरवात केली. यातून जीनिंग कारखाना प्रकल्पांच्या एकूण किंमतीच्या २५ टक्के व कमाल २७ लाख रुपये अनुदान दिले जात होते. राष्ट्रीयीकृत बॅंकांमधून आधुनिक जीनिंगची उभारणी, जुन्या जीनिंगमधील ऑटोमेशन यासाठी कर्ज उपलब्ध व्हायचे.

टीएमसी जीनिंगची संख्या वाढली. राज्यात ९५ टक्के टीएमसी जीनिंग असून, दर्जेदार रुईचे उत्पादन होत आहे. परंतु ही योजना मागील पंचवार्षिकमध्ये बंद झाली. ती अजूनही बंदच आहे. गुजरात किंवा इतर देशांच्या धर्तीवर अत्याधुनिक जीनिंग कारखान्यांसाठी ही योजना नव्या स्वरुपात लागू करण्याचा मुद्दाही जिनर्स उपस्थित करीत आहेत. टीएमसीसंबंधीची योजना बंद केल्याने नव्या जीनिंग खानदेशात मागील चार ते पाच वर्षांत उभ्याच राहिल्या नाहीत. खानदेशातील तीन उद्योजकांनी सहा वर्षांपूर्वी गुजरातेत आपली एक जीनिंग सुरू केल्याची माहिती मिळाली. कारण गुजरातेत जीनिंगला साडेचार ते पाच रुपये प्रतियुनीट या दरात वीज मिळते. शिवाय तेथे कापूसटंचाई फारशी नसते. कारण राज्यात नेमलेले हस्तक, मध्यस्थ वर्षभर खानदेश, पूर्व विदर्भ व मध्य प्रदेशातील नर्मदा काठच्या काही भागात कापूस खरेदी करून त्याचा सातत्याने पुरवठा करीत असतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com