पुण्यात गिरीश बापट, बारामतीत सुप्रिया सुळे विजयी

पुण्यात गिरीश बापट, बारामतीत सुप्रिया सुळे विजयी
पुण्यात गिरीश बापट, बारामतीत सुप्रिया सुळे विजयी

पुणे  : देशभर मोदी लाट असतानाही राष्ट्रवादी काॅँग्रेसने बारामतीचा किल्ला अभेद्द ठेवला. भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा राष्ट्रवादी काॅँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पराभव केला. भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी काॅँग्रेसच्या मोहन जोशी यांचा पराभव करीत पुणे लोकसभा मतदारसंघात पुन्हा कमळ फुलविले. शिरूरमधून राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या आढळराव पाटील यांच्याविरूध्द आघाडी घेऊन विजयाकडे कुच केले.

बारामती व पुणे लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक मतमोजणीला पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात कडेकोट बंदोबस्तात गुरुवारी (ता. २३) सकाळी ८ वाजता सुरवात झाली. पुण्यात भाजपचे गिरीश बापट व काॅँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्यातील चुरशीच्या सामन्याकडे पुणेकरांचे लक्ष लागून होते. मतमोजणीकडे सकाळी बापट फिरकले नाहीत. मात्र, जोशी उपस्थित होते. 

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागून होते. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे व भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्यात लढत होती. सकाळी ९ वाजेच्या आधीच मतमोजणी केंद्रांमधून बारामतीतून कुल तर पुण्यात बापट आघाडीवर असल्याचे संकेत कार्यकर्त्यांना मिळू लागले. नंतर मात्र सुळेंनी आघाडी घेतली. 

निकालाची पहिली फेरी पुण्याची जाहीर झाली असता बापट ३० हजार तर जोशी यांना १४ हजार मते मिळाली. बारामतीत सुळे यांना २९ हजार तर कुल यांना २७ हजार मते मिळाल्याचे जाहीर झाल्याने बारामतीविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली. दुसऱ्या फेरीत बारामतीत भाजपने राष्ट्रवादीला किंचित मागे ओढले. यात कुल यांना ५८९१९ तर सुळेंना ५८६२६ मते जाहीर झाली. 

बारामती लोकसभा मतदारसंघात २१ लाख १२ हजार मतदार असले तरी यंदा मतदान ६१.५३ टक्के मतदान झाले होते. मोजणीत सात लाख १२ हजार ९० पुरुष तर पाच लाख ८७ हजार महिला मतदारांची मते मोजली गेली. पुण्यातील ३१ तर बारामती मतदारसंघातील १८ उमेदवार उभे होते. बारामतीत चौथ्या फेरीत सुळेंना एक लाख १९ हजार तर कुल यांना एक लाख १० हजार मते मिळाली. दुपारी एक वाजेपर्यंत कुल यांना एक लाख मतांनी पिछाडीवर टाकत राष्ट्रवादीचा विजय निश्चित केला. 

मतदानासाठी यंदा प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ५ व्हीव्हीपॅट यंत्रांमधील पावत्यांची पडताळणी करण्यात आली. मतदान करताना ईव्हीएमचे बटण दाबल्यानंतर मतदाराला त्याने दिलेल्या मताची खात्री व्हावी, मत कोणत्या चिन्हाला दिले ते दिसणे शक्य व्हावे यासाठी मतदान केंद्रांवर या वेळी प्रथमच व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफाएबल पेपर ऑडिट्रेल) वापरण्यात आले. 

पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा २० लाख ७५ हजार मतदार होते. त्यापैकी पाच लाख ५१ हजार २९ पुरुष तर चार लाख ८३ हजार ९२ महिलांनी मतदान केले होते. त्यामुळे मतमोजणीसाठी एकूण १० लाख ३४ हजार १३० मते मोजली गेली. पुण्यात २०१४ मध्ये ५४.१४ टक्के तर यंदा ४९.८४ टक्के मतदान झाले होते. पहिल्या फेरीपासून बापट यांनी आघाडी घेतली होती.  

कोल्हे यांच्या ‘यॉर्कर’वर आढळराव ‘क्‍लीन बोल्ड!’

 छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजांच्या भूमिकेमुळे घराघरांत पोचलेले, नव्या कोऱ्या पाटीचे प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसला प्रथमच तगडा उमेदवार लाभला. कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेले चैतन्य, नेतेमंडळींचे भक्कम पाठबळ आणि विधानसभा मतदारसंघनिहाय नेते-कार्यकर्त्यांनी एकदिलाने केलेला प्रचार या बळावर डॉ. कोल्हे यांनी शिरूरमधून विजयाचा चौकार मारण्याच्या तयारीत असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना ‘क्‍लीन बोल्ड’ केले. 

अशोक मोहोळ, विलास लांडे व देवदत्त निकम या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गजांना हरवून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला बनविला होता. गतवेळी मोदी लाटेत तीन लाखांनी जिंकलेल्या आढळरावांनी विजयाची ‘हॅटट्रिक’ साधली होती. त्यामुळे आता चौकार मारण्यास ते सिद्ध झाले होते. तथापि, गुगली टाकून भल्याभल्यांची दांडी उडविण्यात माहीर असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोल्हे यांच्यासारखा भेदक गोलंदाज हेरून मैदानात उतरविला. अजित पवार यांच्यासारख्या अचूक ‘कोच’चे मार्गदर्शन आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी ‘कॅप्टन’च्या भूमिकेतून लावलेली ‘फिल्डिंग’ यातून कोल्हे यांनी आढळरावांचा त्रिफळा उडवला.

अभिनेता म्हणून ओळख असली; तरी शिवसेनेत केलेल्या कामामुळे राजकीय डावपेच त्यांना माहीत होते. स्थानिक आणि प्रभावी वक्तृत्वाचा बळावर त्यांनी चुरशीचा सामना जिंकला. ‘चौकार बिवकार विसरून जा, चारीमुंड्या चित केल्याशिवाय राहणार नाही,’ अशी ठिकठिकाणच्या सभेत केलेली गर्जना कोल्हे यांनी खरी करून दाखवली. सततच्या पराभवाने पराभूत मानसिकतेत गेलेल्या ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीत प्रभावी व प्रबळ पर्याय हवा होता, जो डॉ. कोल्हेंच्या रूपाने मिळाला. त्यातून कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले. महिला, तरुण, तरुणी व ज्येष्ठांनीदेखील त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले. त्यांच्या सभा व रॅलींना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद मतातही परावर्तित झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com