तळपत्या सूर्याचा अस्त !

तळपत्या सूर्याचा अस्त !
तळपत्या सूर्याचा अस्त !

राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा लागतो. निर्णय तर घ्यावा लागतोच. त्याचे परिणामही असतात. सर्व समाज चारही बाजूने तुम्हाला पाहत असतो. प्रसंगी टीका होते, तर कधी जयजयकार होतो. पण म्हणून कठीण निर्णय घेण्यापासून दूर पळायचे नाही, हा मनोहर पर्रीकर यांचा स्वभाव होता. जे काही करायचे ते स्वतः आणि पूर्ण करून दाखवायचे. अपयश आले तरी त्याची तमा नाही. पुन्हा उभे राहू, हा पर्रीकर यांचा स्वभाव आवडायचा. आमच्यासाठी हीच कामाची प्रेरणा होती.  - नरेंद्र सावईकर, खासदार, दक्षिण गोवा

माझ्या आठवणीप्रमाणे, मनोहर पर्रीकर यांचा पहिला परिचय मला झाला तो १९९० साली. म्हापसा येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे गोवा प्रदेश अधिवेशन घेण्याचे ठरले होते. त्याच्या तयारीच्या निमित्ताने स्वाभाविकपणे म्हापशातील प्रतिष्ठित नागरिक आणि परिवारातील कार्यकर्त्यांना भेटण्याचा योग आला. त्यावेळी पर्रीकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हापसा शहर संघचालक म्हणून काम पाहत होते. त्यावेळी त्यांच्याशी झालेली ती पहिली भेट! त्यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीत अधिवेशनाची तयारी, व्यवस्था असा तपशील त्यांना सांगितला. आम्ही चार पाच विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होतो. पर्रीकरांशी बोलताना अधिवेशनाशिवाय पणजी येथे परिषदेचे कार्यालय घेण्याचा बेतही असल्याचे त्यांना सांगितले. त्या वेळी ते पटकन म्हणाले, अधिवेशनाखातीर अमुक, आणि तुमच्या ऑफिसाखातीर अमुक ही म्हजी मदत. पहिल्याच भेटीत असे लोकनेता काही सांगणारा त्यावेळी आम्हाला कुणी भेटला नव्हता. पण जसजसा परिचय वाढत गेला, त्यावेळी लक्षात आले की, हा मनोहर पर्रीकर यांचा स्वभाव आहे, ही त्यांची खासियत होती. जे काही ठरवायचे ते आणि जे काही करायचे ते मनापासून... मनाप्रमाणे! त्यानंतर कालांतराने भारतीय जनता पक्षाचे काम करू लागलो, आणि हा परिचय दृढ होत गेला.

१९९९ साली विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करतेवेळी एक संपर्कयात्रा मडकई मतदारसंघाचे तत्कालीन आमदार श्रीपाद नाईक यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. या यात्रेची पूर्ण व्यवस्था मनोहर भाईंवर होती. त्यावेळी त्यांच्या कामाचा आणखीन एक परिचय झाला, तो असा की कार्यक्रमाचा पूर्ण तपशील ठरवणे, ठरवून त्याप्रमाणे तो अंमलात आणणे व वेळप्रसंगी गैरव्यवस्था झालीच तर तात्काळ पर्यायी व्यवस्था उभी करणे, याचा अनुभव मला घेता आला. त्यानंतर चारवरून भाजपची आमदार संख्या दहावर पोचली.

राजकारणात निवडून येणे आणि त्यानंतर संसदीय कामकाज समजावून घेणे ही कला त्यांनी अवगत केली, ती त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यामुळेच. विषयांचा आवाका व कामाचा झपाटा असा संगम राजकारणात फार कमी प्रमाणात पाहायला मिळतो. मनोहरभाई हे त्या कमीजणातले होते. म्हणूनच १९९४ पासून सतत २० वर्षे निवडून तर ते आलेच, पण विधानसभेत आणि सरकारातही ते आपले कौशल्य दाखवू शकले.

एक निष्कलंक, प्रामाणिक आणि कणखर राजकीय नेतृत्व ही त्यांची ओळख होती. प्रत्येक प्रसंगात हे त्यांचे गुण झळाळून दिसले. तुमी सरकार करतले? कोण रे तुमचो लीडर? कोण आसा रे तुमचेकडेन? ही वाक्‍येच कदाचित आव्हान म्हणून पर्रीकर यांनी स्वीकारली होती, असे मला वाटते, आणि त्यामुळेच एक उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून त्यांची राजकारणात छाप पाडली होती.

प्रत्येक विषयाच्या मुळाशी जायचे, त्याची तपशिलात आखणी करायची व ते स्वतःच्या नीट, सुवाच्च अक्षरात लिहून काढायचे, हे त्यांचे वैशिष्ट्य. पेन आणि कागद हा त्यांच्या कामाचा अविभाज्य घटक होता. बोलता-बोलता हातात असेल तो किंवा समोरील कागद ओढून त्यावर पटापट लिहीत जाणे व बदल झाला तर खोडायचे आणि पुन्हा लिहायचे, हा त्यांचा स्वभाव होता. सहीसुद्धा कशी अगदी नेटकी. स्वच्छ. जणू काही व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंबच होते. पारदर्शक आणि नेटके!

राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा लागतो. निर्णय तर घ्यावा लागतोच. त्याचे परिणामही असतात. सर्व समाज चारही बाजूने तुम्हाला पाहत असतो. प्रसंगी टीका होते, तर कधी जयजयकार होतो. पण म्हणून कठीण निर्णय घेण्यापासून दूर पळायचे नाही हा पर्रीकर यांचा स्वभाव होता. जे काही करायचे ते स्व तः आणि पूर्ण करून दाखवायचे. कारण ते सर्व विचार करून माझ्या मनाला पटले आहे, ते करताना जरी अपयश आले तरी त्याची तमा नाही. पुन्हा उभे राहू, हा पर्रीकरांचा स्वभाव साहजिकच मनाला भावायचा. 

विरोधी पक्ष नेता म्हणून विधानसभेत धडधडणारी तोफही पाहिली आणि एक यशस्वी, कल्पक मुख्यमंत्री आणि संरक्षणमंत्री म्हणूनही त्यांनी कामगिरी पाहिली. सरकार चालवायचे ते सर्वांसाठी, समाजातल्या सर्व घटकांच्या कल्याणासाठी हा सिद्धांत त्यांनी प्रत्यक्षात आणून दाखवला होता. इफ्फी आयोजनाचे आव्हान असू दे की, लुसोफोनियाचे शिवधनुष्य असू दे. त्यांनी ही सर्व आव्हाने लिलया पेलली होती. नवीन पुलांची बांधणी, रस्त्यांचे रुंदीकरण किंवा बांधकाम, वीज, इत्यादी क्षेत्रात एवढ्या झपाट्याने काम केले की ‘सुशेगादपणा’ हा खराच गोव्याचा स्वभाव आहे का, असा प्रश्‍न कोणालाही पडावा. शेतकरी, महिला, युवा, मच्छीमार, विद्यार्थी, अपंग दुर्बल अशा सर्वांच्या गळ्यातील ताईत बनले होते. हे पर्रीकर यांच्याबाबत घडू शकले, कारण त्यांची कार्यक्षमता व प्रचंड इच्छा शक्ती होती.

देशाच्या संरक्षणमंत्रिपदाबरोबरच त्यांनी मुख्यमंत्रिपदाला योग्य न्याय दिला. ज्या मंत्रिपदासाठी रुसवे-फुगवे होतात, मानापमानाचे प्रसंग उद्भवतात ते सहजपणे त्यांना मिळाले होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही ईश्‍वर चरणी प्रार्थना!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com