शासकीय खरेदी म्हणजेच 'खोदा पहाड निकला चुहा'

शासकीय खरेदी म्हणजेच 'खोदा पहाड निकला चुहा'

औरंगाबाद : शेतमालाची हमी दराने खरेदी करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या केंद्रांना नगण्यच प्रतिसाद मिळाला आहे. आधी शेतकऱ्यांनी आवश्‍यक ऑनलाइन नोंदीकडे पाठ फिरवली, तर ज्यांनी नोंदणी केली त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदीच्या अटी- शर्तींमुळे खरेदी झाला नाही. त्यामुळे ''खोदा पहाड निकला चुहा'' अशीच काहीशी स्थिती हमी दराने शेतमाल खरेदीची झाल्याचे चित्र खरेदी झालेल्या मालाच्या आकडेवारीवरून समोर येत आहे.  औरंगाबाद जिल्ह्यात भरडधान्याची खरेदी करण्यासाठी दहा खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. मका, बाजरी, ज्वारी आदी पिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या या खरेदी केंद्रांवर केवळ मका पिकाच्याच विक्रीसाठी शेतकऱ्यांनी थोडा उत्साह दाखविला. २० डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील ७५३ शेतकऱ्यांनी २२८३१ क्‍विंटल मक्याची केंद्रावर विक्री केली. मूग आणि उडीदाच्या खरेदीसाठी जिल्ह्यात तीन खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. १३ डिसेंबरला बंद होण्यापूर्वी या केंद्रावर ८१ शेतकऱ्यांकडून मुगाची १४५.५० क्‍विंटल खरेदी केली गेली. दुसरीकडे उडीदाची १४ शेतकऱ्यांकडून ५३ क्‍विंटल खरेदी करण्यात आली. जिल्ह्यात तीन केंद्रांवरून सोयाबीनची २५ शेतकऱ्यांकडून ३१८ क्‍विंटल खरेदी करण्यात आली.  जालना जिल्ह्यात चार केंद्रांवरून उडदाची ३२५.५० क्‍विंटल, मुगाची ४५.५० क्‍विंटल तर सोयाबीनची ८६७ क्‍विंटल खरेदी करण्यात आली. मूग, उडदाच्या चुकाऱ्यापोटी जवळपास ४३ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आले असून मका खरेदीसाठी जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या चार केंद्रांवर मक्याचा दाणाही खरेदी झाला नाही. जवळपास २० शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली; मात्र ते माल घेऊन विक्रीसाठी आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. बीड जिल्ह्यात बारा हमीदराने खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली होती. प्रत्यक्षात शिरूर कासार वगळता सर्व ठिकाणची केंद्रे सुरू करण्यात आली. हमीदराने शेतमाल खरेदीसाठी बीड जिल्ह्यातील १५५५० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. प्रत्यक्षात जवळपास साडेपाच हजाराच्या आसपास शेतकऱ्यांनाच आपला शेतमाल आजवर हमीदराने खरीदीच्या केंद्रावर अटी, शर्तीच्या अधिन राहून मोजता आला. बीड जिल्ह्यातील अकरा खरेदी केंद्रांवरून ४०२६ शेतकऱ्यांकडून उडदाची २८२५१.७० क्‍विंटल, मुगाची ८९३ शेतकऱ्यांकडून ४४९३.१५ क्‍विंटलची हमीदराने खरेदी केली गेली. तर ७६० शेतकऱ्यांच्या ११७३८.९० क्‍विंटल सोयाबीनची खरेदी झाली. बीड जिल्ह्यात मका खरेदीची माजलगाव, अंबाजोगाई व केज येथे केंद्रे सुरू करण्यात आली. परंतु या केंद्रांवर अजून मका खरेदीचा मुहूर्त लागला नाही. एक, दोन ठिकाणचा अपवाद वगळता नोव्हेंबरपर्यंत खरेदी केलेल्या मालाची रक्‍कम शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. खरेदी केंद्रे सुरू केल्याने बाजारातील दरही वाढल्याचा दावा शासन व यंत्रणेकडून केला जात आहे. मूग, उडदाची नगण्य खरेदी औरंगाबाद जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या तीन केंद्रांवर मुगाची १४५.५० क्‍विंटल तर उडदाची ५३ क्‍विंटल खरेदी करण्यात आली. जालना जिल्ह्यात चार केंद्रांवरून उडदाची ३२५.५० क्‍विंटल, मुगाची ४५.५० क्‍विंटल खरेदी झाली. बीड जिल्ह्यातील अकरा खरेदी केंद्रांवरून उडदाची २८२५१.७० क्‍विंटल, मुगाची ४४९३.१५ क्‍विंटलची हमीदराने खरेदी झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com