सरकारने शेती अन् शेतकरी उद्ध्वस्त केला

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करताना माजी आमदार शंकरराव धोंडगे आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप धोंडगे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करताना माजी आमदार शंकरराव धोंडगे आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप धोंडगे.

लोहा, जि. नांदेड (प्रतिनिधी) ः साडेतीन वर्षे झालेल्या सरकारने कुठलेही धरण पूर्ण केले नाही, नोटाबंदीने अर्थव्यवस्था खिळखिळी झाली, सामान्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा उद्‍घाटने व जाहिरातबाजीला हे सरकार महत्त्व देत आहे. सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेले हे सरकार शेती व शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त करत आहे, असा हल्लाबोल करत हे अपयशी सरकार घालविण्यासाठी जनतेने सज्ज राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी लोहा येथील हल्लाबोल मेळाव्यात केले.  

सदर मेळाव्याचे उद्‍घाटन मशाल पेटवून करण्यात आले, यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, माजी मंत्री कमलकिशोर कदम, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, ओबीसी आघाडीचे ईश्वरराव बाळबुधे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. पवार म्हणाले, साडेतीन वर्षांत शेतकरी, व्यापारी, महिला, तरुण बेरोजगार यांच्यासाठी कोणी कैवारी राहिला नाही, नोटाबंदीने संपूर्ण अर्थव्यवस्था खचली; ती अजूनही सावरली नाही. भाजप सरकारच्या तटस्थ आणि नाकर्ते भूमिकेला कंटाळून साहित्यिकांनी पुरस्कार परत केले, शेतीमालाला हमीभाव नाही, कर्जमाफीचा पुरता गोंधळ सुरू आहे, बोंड अळीला मदत नाही,  देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्याला उद्‍ध्वस्त करण्याचे काम सरकार करत आहे.

आमच्या सरकारच्या काळात शेती व शेतकरी यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले, सिंचनाला प्राधान्य देताना जास्तीचा निधी मराठवाड्याला देऊन येथील प्रकल्प पूर्ण केले, मग येथील प्रकल्पाचे येथल्या शेतकऱ्याच्या हक्काचे पाणी इतर जिल्ह्यांत कशाला पळवता. त्यापेक्षा त्या जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करा, असेही खडे बोल त्यांनी सरकारला सुनावले.  

यावेळी बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, भाजप-सेनेच्या कार्यकाळात प्रत्येक घटक संपावर जातोय. कामगार, शेतकरी, डॉक्टर, बँक कर्मचारी सर्वच संपावर जात आहेत. त्यामुळे या हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून आता या सरकारलाच संपावर पाठवावे लागेल. किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे म्हणाले की, लोहा विभागाचा विकास आघाडी सरकारच्या काळातच झाला. पण या सरकारने साडेतीन वर्षात काय केले तेच कळत नाही. कारण ‘अंधेर नगरी, चौपट राजा’, असा त्यांचा सध्याचा कारभार सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com