खरेदी केंद्रावर अाता एकच ग्रेडर

खरेदी केंद्रावर अाता एकच ग्रेडर
खरेदी केंद्रावर अाता एकच ग्रेडर

अकोला : हमीभाव केंद्रावर खरेदी करणारा व गोदामात साठवणूक करणारा ग्रेडर या वर्षी एकच राहणार असल्याची माहिती राज्याचे पणन व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी येथे दिली. गेल्या वर्षी अनेक ठिकाणी हमीभाव केंद्रावर खरेदी झालेली तूर गोदामावर असलेल्या ग्रेडरकडून परत पाठविली होती. यामुळे ठिकठिकाणी अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात अाहे.   अकोला येथे तूर खरेदी केंद्राचे उदघाटन करण्यासाठी अाले असता ते पत्रकारांसोबत बोलत होते. श्री. देशमुख म्हणाले, की मागील वर्षी व्यापाऱ्यांनी खरेदी केंद्रावर तूर विकल्याचे प्रकार समोर अाले होते. त्याचा फायदा व्यापाऱ्यांना झाला.  शेतकऱ्यांना पैसेही उशिराने मिळाले. यासाठी या हंगामापासून अाॅनलाइन नोंदणी केली. गेल्या वर्षी ग्रेडरची अडचण होती. ती दूर केली. खरेदी केंद्रावरचा ग्रेडर वेगळा व गोडाऊनचा ग्रेडर वेगळा होता. अनेक ठिकाणी खरेदी केंद्रांवर ग्रेडरने घेतलेला माल गोडावूनवरील ग्रेडरने परत केल्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे आता एकरच ग्रेडर राहणार अाहे. 

अाॅनलाइनबाबत एकही तक्रार नाही अाॅनलाइन प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना त्रास होत असल्याच्या चर्चा योग्य नसून अापल्याकडे अाजवर एकाही शेतकऱ्याची तक्रार अालेली नाही. हिवाळी अधिवेशनाच्या काळात अापण सहा जिल्ह्यांतून महामार्गाने नागपूरला जाताना शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्या वेळी एकाही शेतकऱ्याने तक्रार केली नाही. अाॅनलाइन प्रक्रियेमुळे अनेक फायदे होत अाहेत, असे मंत्री देशमुख म्हणाले.

हरभरा खरेदीबाबत प्रस्ताव बाजारपेठेत हरभऱ्याचे दर घसरले अाहेत. हमीभावापेक्षा दर कमी असून, शासकीय खरेदीबाबत कुठल्याही हालचाली नाहीत. याबाबत प्रश्न विचारला असता, मंत्र्यांनी नाफेडकडे खरेदीबाबत शासनाने प्रस्ताव दिला असल्याचे सांगितले. त्याला मंजुरी मिळताच हरभऱ्याचीही नोंदणी व खरेदी सुरू होईल असे ते म्हणाले. कुठल्याही बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांनी खरेदी करू नये. शेतकऱ्यांनीही अापला शेतमाल विकू नये. जर व्यापारी कमी दराने खरेदी करीत असतील तर बाजार समितीने संबंधित व्यापाऱ्याचा परवाना निलंबित करावा, असे निर्देश देशमुख यांनी दिले. शासन यादृष्टीने कठोर उपाययोजना अाणत असल्याचेही त्यांनी सांगितले.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com