युरियाच्या गोणीत पाच किलोची घट

युरियाच्या गोणीत पाच किलोची घट
युरियाच्या गोणीत पाच किलोची घट

कोल्हापूर : युरियाच्या बेसुमार वापराला बंधन घालण्यासाठी केंद्र सरकारने आता युरियाचे गोणीतील प्रमाण घटविण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिलपासून ५० किलोच्या गोणीऐवजी ४५ किलोची गोणी शेतकऱ्यांना मिळणार आहे. प्रत्येक गोणीमागे पाच किलो युरियाची बचत यामुळे होणार आहे.  युरियाचा वाढता वापर टाळण्याबरोबरच टंचाई कमी करण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात आले आहेत. यानुसार ४५ किलोची गोणी आता देशभरातील युरिया विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. दोन महिन्यांत कंपन्यांनी तयार ५० किलोच्या गोणीत विक्री करावी, यानंतर सरसकटच ४५ किलोच्या पोत्यातूनच विक्री करावी, अशा सूचना दिल्या आहेत. याबाबत खत विक्रेत्यांनाही कळविण्यात आले आहे.  देशात युरिया हे सर्वाधिक लोकप्रिय खत आहे. शासन युरियाला सर्वाधिक अनुदान देत असल्याने ते इतर खतांच्या तुलनेत स्वस्तही आहे. यामुळे इतर खतांच्या तुलनेत सर्वाधिक वापर युरियाचा होतो. देशाला वर्षाला ३१० लाख मेट्रिक टन युरियाची गरज भासते. पण, युरिया तयार करणारे कारखाने पुरेसे नसल्याने खत मंत्रालयास तो आयात करावा लागतो. सातत्याने युरियाची चणचण भासते. प्रत्येक वर्षी ८० लाख मेट्रिक टन युरियाची आयात बाहेरील देशातून होत असते. बाहेरून आयात करून परत आणि अनुदान दिल्याने सरकारी तिजोरीवर याचा मोठा ताण येतो. दरवर्षी साधारणत: ४५ हजार कोटी रुपयांचे अनुदान युरियाला दिले जाते.     १ एप्रिलपासून प्रारंभ  गेल्या दोन महिन्यांपासूनच गोणीचे वजन कमी करण्याची चर्चा सुरू होती. याबाबतच्या सूचना कंपन्यांनाही दिल्या होत्या. यानुसार कंपन्यांनी पॅकिंगमध्ये बदल करत आता नव्याने ४५ किलोच्या गोणीची निर्मिती केली आहे. नव्या पॅकिंगची गोणी विक्रेत्यांकडे दाखल झाली आहेत. सध्या पन्नास किलो युरियाची किंमत २९५ रुपये इतकी आहे, आता ४५ किलोचे गोणी २६६ रुपयांना मिळणार आहे.     अशी होईल बचत भारतामध्ये किलोपेक्षा गोणीवर युरियाची मात्रा देण्याची पद्धत आहे. नव्या निर्णयाने प्रत्येक गोणीमागे ५ किलो युरियाची बचत होईल. यातून मागणी व पुरवठा हे सुत्र काही प्रमाणात जुळू शकते. आयात व अनुदानाचा ताणही कमी येऊ शकेल असा अंदाज खत मंत्रालयांच्या सूत्रांचा आहे. यातून वर्षाला शासनाची ६००० ते ७००० कोटी रुपयांची बचत होण्याची शक्‍यता आहे.     जमिनीची सुपीकता कायम राखण्याचा प्रयत्न अनेक शेतकरी उत्पादनवाढीसाठी शिफारशीपेक्षा जास्त खते वापरण्याचा प्रयत्न करतात. यामुळे कालांतराने सुपीकता कमी होऊन जमीन नापिक बनते. युरियाचा प्रमाणीत वापर करण्याची सवय शेतकऱ्यांना लागावी व जमिनीची प्रत बिघडू नये हा महत्त्वाचा हेतूही ४५ किलोची गोणी करण्यामागे असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com