सरकारनं दावणीला चारा, हाताला काम द्यावं...

मायबाप सरकारनं दावणीला चारा, हाताला काम द्यावं
मायबाप सरकारनं दावणीला चारा, हाताला काम द्यावं

परभणी ः गतवर्षी बोंडअळीमुळे अन यंदा दुष्काळामुळे कपाशीचा लागवड एवढेही हाती आले नाही. समदं कोरडवाहू आहे. ओलिताच्या सोयीसाठी एखाद्या योजनेतून विहीर द्या सायेब. गेल्या वर्षीच्या शिलकीतून सध्या धकत आहे. पण अजून सात आठ महिन्याचा काळ कठीण आहे. प्रत्येक शेतकरी कुटुंबांना महिन्याकाठी पाच हजार रुपये दुष्काळ निर्वाह भत्ता द्यावा. संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी. पीक विमा परतावा मंजूर करावा. हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी. जनावरांना दावणीवरच चारा उपलब्ध करुन द्यावा. सरकारनं गावात रोजगार हमीची कामे सुरू करुन हाताला काम द्यावे, अशा शब्दांत आपल्या व्यथा सातत्याने दुष्काळाच्या चक्रात भरडत असलेल्या परभणी जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूरांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकातील अधिकाऱ्यांशी संवाद साधतांना मांडल्या.

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने गुरुवारी (ता. ६) सकाळी साडे दहा ते एकच्या दरम्यान गणेशपूर (ता. सेलू), पेडगाव (ता. परभणी) रुढी (ता. मानवत) या तीन  गावांच्या शिवारास भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. पथकप्रमुख निती आयोगाचे सहसल्लागार मानश चौधरी, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे एस. सी. शर्मा, ग्रामीण विकास मंत्रालयाचे अवरसचिव एस. एन. मिश्रा यांचा समावेश होता. विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, मृद व जलसंधारण आयुक्त श्री. सिंघला, उपायुक्त विजयकुमार फड, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, लातूरचे कृषी सहसंचालक तुकाराम जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. आर. शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे आदीसह कृषी, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जालना जिल्ह्यातून गणेशपूर (ता. सेलू) शिवारातील त्रिवेणीबाई रामचंद्र गिते यांच्या कपाशीच्या शेतामध्ये सकाळी साडे दहाच्या सुमारास पथक झाले. यावेळी पथक प्रमुख मानश चौधरी यांनी कपाशीच्या उत्पादनासह खर्चाबाबत विचारणा केली. दीड एकरात दीड क्विंटल कापूस निघाल्याचे गिते यांनी सांगितले. पेडगांव येथील गणेशराव हरकळ यांच्या कोरड्या पडलेल्या विहिरीची तसेच त्या शेजारील कपाशीच्या पिकाची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सोय करावी. मजुरांच्या रोजगारासाठी गावात कामे उपलब्ध करुन द्यावीत.रेशन उपलब्ध करुन द्यावे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात यावेत. बटईने शेती करणारांना देखील ५० हजार रुपये खावटी देण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या.

पीक विमा परतावा शेतकऱ्यांना तत्काळ अदा करण्यात यावा, अन्यथा विमा कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश मानश चौधरी यांनी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांना दिले. तसेच रुढी (ता. मानवत) येथील विष्णू निर्वळ यांच्या शेतातील कपाशीच्या पिकाची पाहणी केली.

दुष्काळामुळे झालेल्या नुकसान निश्चित करण्यासाठी पथक आले आहे. त्याबाबतचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे. त्यानंतर मदत जाहीर केली जाईल. - मानश चौधरी, पथक प्रमुख

गेल्या वर्षी विहिरीला भरपूर पाणी होते. शेजाऱ्यांना देखील दिले होते. पण यंदा विहीर कोरडी पडली. त्यामुळे ज्वारी होणार नाही. कडबा नाही अन्‌ धान्य ही नाही. त्यामुळे जनावरांच्या सांभाळाची चिंता आहे. - गणेशराव हरकळ, शेतकरी, पेडगाव, ता. परभणी

अन्‌ केंद्रीय पथक पेडगावात दाखल झाले पेडगाव (ता. परभणी) येथील नियोजित दौरा रद्द करुन पथक थेट रुढी (ता. मानवत) येथे निघाले. ही बाब पेडगांव शिवारातील पथकाची वाट पाहात थांबलेल्या शेतकऱ्यांना समजली. शेतकरी संतप्त झाले. गणेशपूर (ता. सेलू) येथील पाहणी करुन रुढीकडे जात होते. मानवत रोड येथील रेल्वे क्राॅसिंगच्या फाटकावर पथकातील गाड्यांना थांबावे लागले. यावेळी पेडगांव येथील शेतकऱ्यांनी पथकातील अधिकऱ्यांना गाठले. आमच्या वेदना जाणून घ्या, अन्यथा पुढे जाऊ देणार नाहीत, अशीही भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. त्यानंतर पथकाने पेडगावात पाहणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com