शेतीतील यांत्रिकीकरणासाठी हवे शासनाचे पाठबळ

कृषी यांत्रिकिकरण
कृषी यांत्रिकिकरण

अकोला ः अाजच्या बदलत्या काळात शेती पद्धतीत सुधारणा झाल्या. पीक उत्पादकता वाढली तरी दुसऱ्या बाजूला उत्पादन खर्चही वाढला. शेतीमध्ये कुशल मनुष्यबळाची समस्यासुद्धा सर्वत्र भेडसावत अाहे. अशा परिस्थितीत शेतीत अधिकाधिक यांत्रिकीकरण होणे गरजेचे अाहे. यासाठी शासनाच्या पाठबळाची अावश्यकता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. अाज भारतीय शेतीत (त्यातही जिरायती) यंत्र, अवजारांचा जुजबी स्वरूपात वापर होत अाहे. हा वापर एका मर्यादेपलिकडे जात नसल्याने खऱ्या अडचणी अाहेत. छोट्या-छोट्या शेतकऱ्यांना महागडी यंत्रे परवडत नाहीत. त्यामुळे कमी क्षेत्र असलेला शेतकरी अाजही पारंपरिक पद्धतीनेच शेती कसतो अाहे.     शेतीकडे शास्त्रज्ञ, शासनाचे दुर्लक्ष शेती अाणि शेतकऱ्यांसाठी यांत्रिकीकरण गरजेचे अाहे. नवनवीन पीक पद्धतीमध्ये पारंपरिक शेती पद्धतीत अामूलाग्र बदल होत अाहे. अाम्ही शेतीमध्ये जास्तीत जास्त ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, थ्रेशर यांचा वापर करतो. पावसाळ्यात बैलाद्वारे करावी लागणारी अांतरमशागत सोडली तर इतर वेळी यंत्रांचा वापर केला जातो. त्यामुळे पैशांची बचत होते. अाज मजूर मिळणे कठीण बाब झाली. वेळेवर होणारी अडवणूक टाळण्यासाठी यांत्रिकीरणाला सध्यातरी पर्याय दिसत नाही. शासनाला यासाठी मोठ्या प्रमाणावर माफक दरात यंत्र उपलब्ध करता येऊ शकतात. जगातील स्तरावरील यांत्रिकीकरणाचा विचार करता अापण अजूनही खूप मागे अाहोत. यासाठी शासनाने स्थानिक पातळीवरील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून यंत्र संशोधनावर भर दिला पाहिजे. विदर्भाचा विचार करता मुख्यत्वे कापूस वेचणीसाठी भरमसाठ मजुरीत वाढ झाली. शेतकऱ्यांना अार्थिक भुर्दंड सहन करावा लागला. ब्राझीलसारख्या देशाचा विचार करता आपल्यालाही कापूस पेरणी, वेचणी यंत्राने करता येईल. अाज शास्त्रज्ञांनी अंतराळ, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांत मोठा नावलौकिक मिळवला ही चांगली बाब अाहे; परंतु दुर्दैवाने शेतीमध्ये शास्त्रज्ञ, शासन यांचे दुर्लक्ष झालेले अाहे. - गणेश श्यामराव नानोटे, प्रगतिशील शेतकरी, निंभारा, जि. अकोला.

यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन हवे सध्या आम्ही मूग, तूर, ज्वारी, कपाशीची पेरणी यंत्राने करतो. नंतर बैलचलित यंत्र, तसेच ट्रॅक्टरवरील फवारणी यंत्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. यांत्रिकीकरणामुळे कपाशीची पेरणी खूप सोपे झाले. त्यामुळे एका दिवसात दोन मजुरांच्या साह्याने १५ ते २० एकर पेरणी होते. त्यामुळे बियाणे व मजुरांची बचत होते. यांत्रिकीरणाच्या वापरामुळे फवारणी करण्यासाठी खूप सोईस्कर अाहे. शासनाने यांत्रिकीकरणाच्या जागृतीसाठी प्रोत्साहन द्यायला हवे. यांत्रिकीकरणामध्ये नवीन संशोधन होऊन कंपन्यांनी नवीन यंत्र विकसित केले अाहे. कापूस वेचणीसाठी सहज सुलभ यंत्र, फवारणीसाठी ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर या दृष्टीने विचार झाला पाहिजे. शेतकऱ्यांना विनाअट तसेच व्याजात सवलत देऊन अर्थसाह्य केले पाहिजे. शेतकऱ्यांमध्ये यंत्रे खरेदीसाठी अार्थिक पाठबळ मिळायला हवे.  - अनुप साबळे, युवा शेतकरी, तरोडा, ता. अकोट, जि. अकोला.   यंत्र खरेदीसाठी स्वातंत्र्य द्यावे आजच्या काळात शेतीसाठी तयार झालेल्या यंत्रामुळे शेतीच्या मशागतीपासून, बियाणे पेरणी, माल उत्पादित करून बाजारात नेण्याचा प्रवास सुखकर आणि सुरळीत झाला. परंतु जागतिक पातळीवर शेतीकरिता असलेली यंत्रे, अवजारे आपल्याही शेतकऱ्यांना मिळायला हवीत. त्याला कोणतीही शासनाची अट नको. यांत्रिकीकरणाची स्वतंत्रता जरी शेतकऱ्यांना दिली तरी ते विकत घेण्याकरिता शेतकऱ्यांकडे पैसा हवा. त्याकरिता शासनाने बाजारपेठ स्वातंत्र्य आणि तंत्रज्ञान स्वातंत्र्यता द्यावी. जेणे करून यंत्र, अवजारांच्या वापरातून पीक उत्पादनात वाढ मिळविणे शक्य आहे. जागतिक बाजारपेठेमधील स्पर्धेत आपल्या शेतकऱ्यांचे अस्तित्व निर्माण होईल. यामधून शेतकऱ्यांकडे पैसा येईल. शेतकरी नवनवीन अवजारे खरेदी करतील. - लक्ष्मीकांत कौठकर, शेतकरी, अडगाव, जि. अकोला प्रतिक्रिया सध्याची शेती ही यांत्रिकीकरणावर आधारित झाली असून, बदलत्या काळानुसार फार मोठ्या प्रमाणात यंत्राचा वापर होत आहे. जमीन मशागत, पेरणी, फवारणी, आंतरमशागत आणि मळणीकरिता ट्रॅक्टरचलित यंत्राचा वापर होतो आहे. सोयाबीन कापणीकरिता हार्वेस्टर, पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन व तुषार सिंचन, पाण्याची मोटार चालू अथवा बंद करण्यासाठी आॅटोस्विच आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मोबाईल तंत्रज्ञान उपलब्ध आहे. आज प्रत्येकाकडे मोबाईल उपलब्ध आहे. त्याचा शेती नियोजनात वापर महत्त्वाचा ठरणार आहे. यापुढे शासनाने यांत्रिकीरणासाठी अनुदान देताना स्थानिक उद्योजकाचा विचार करावा. कारण कोळपणी, मळणीसाठीची यंत्रे, अवजारे स्थानिक पातळीवरसुद्धा बनवून मिळतात. येणारा काळ हा अधिक प्रभावी उपकरणांद्वारे व कमीत कमी प्रदूषण करणाऱ्या यंत्रांचा असणार आहे. - स्वप्नील कोकाटे, हळद उत्पादक, शिर्ला, ता. पातूर, जि. अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com