मूग, उडीद, सोयाबीन खरेदीची मुदत संपली

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नांदेड : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये नाफेड आणि विदर्भ को- आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे केल्या जाणाऱ्या मूग, उडीद, सोयाबीन खरेदीची मुदत संपल्यामुळे सोमवारपासून (ता. ७) खरेदी बंद झाली आहे. या तीन जिल्ह्यांतील एकूण १५ खरेदी केंद्रांवर रविवारपर्यंत (ता. ६) ५३६३ शेतकऱ्यांचा एकूण १६ हजार ३७६ क्विंटल शेतीमालाची खरेदी करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या १८ हजार २४९ शेतकऱ्यांकडील शेतीमालाची खरेदी शिल्लक राहिली आहे.

तीन जिल्ह्यांतील एकूण शासकीय खरेदीमध्ये ९३५१.८९ क्विंटल मूग, ५३३२.२६ क्विंटल उडीद, १६९१.१३ क्विंटल सोयाबीनचा समावेश आहे. मुगासाठी ६३६१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. परंतु प्रत्यक्षात ३७७० शेतकऱ्यांच्या मुगाची खरेदी झाली. उडदासाठी २८६२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १४४९ शेतकऱ्यांच्या उडदाची खरेदी झाली. सोयाबीनसाठी १४,३८९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. परंतु १४४ शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर सोयाबीनची विक्री केली.सोयाबीनचे खुल्या बाजारातील दर हमीभावाच्या जवळपास असल्याने हमीभाव खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांचा कल दिसला नाही.

नांदेड जिल्ह्यात नाफेड आणि विदर्भ को आपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रांवर मुगासाठी नोंदणी केलेल्या १ हजार ८१ शेतकऱ्यांपैकी ५०५ शेतकऱ्यांच्या १५२९.२८ क्विंटल मुगाची, उडदासाठी नोंदणी केलेल्या १७८९ पैकी ९०८ शेतकऱ्यांच्या ३४६६.९५ क्विंटल उडदाची खरेदी झाली. सोयाबीनसाठी नोंदणी केलेल्या १७७१ पैकी ३ शेतकऱ्यांनी १८ क्विंटल सोयाबीनची विक्री केली. मंगळवारपर्यंत (ता. ८) ४१८ शेतकऱ्यांच्या ११२२ क्विंटल शेतीमालाचे ७७ लाख ८३ हजार ३२५ रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

परभणी जिल्ह्यात नाफेडच्या सहा आणि विदर्भ को आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या दोन मिळून एकूण आठ केंद्रांवर मुगासाठी नोंदणी केलेल्या ४४१९ पैकी २७०४ शेतकऱ्यांचा ५६६७.६६ क्विंटल मूग, उडदासाठी नोंदणी केलेल्या ३३८ पैकी १०८ शेतकऱ्यांचा १६८.२३ क्विंटल उडीद, सोयाबीनसाठी नोंदणी केलेल्या ९१५० पैकी ११३ शेतकऱ्यांचा १२५८.६३ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली.

हिंगोली जिल्ह्यात नाफेडकडे मुगासाठी नोंदणी केलेल्या ८६१ पैकी ५६१ शेतकऱ्यांच्या २१५४.९५ क्विंटल मुगाची खरेदी झाली. उडदासाठी नोंदणी केलेल्या ७३५ पैकी ४३३ शेतकऱ्यांच्या १७००.०८ क्विंटल उडदाची खरेदी झाली. सोयाबीनसाठी नोंदणी केलेल्या ३४६८ पैकी २८ शेतकऱ्यांच्या ४१५.५० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com