अकोला, वाशीममध्ये हरभरा खरेदी संथगतीने

हरभरा खरेदी
हरभरा खरेदी
अकोला  ः शासनाच्या आधारभूत खरेदी किमतीअंतर्गत हरभरा विक्रीसाठी अकोला आणि वाशीम जिल्ह्यात सुमारे सुमारे २० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. तुरीप्रमाणेच हरभरा खरेदीची गती अत्यंत संथ असून, आतापर्यंत केवळ दहा टक्के शेतकऱ्यांचेही मोजमाप होऊ शकलेले नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
 
खुल्या बाजारात हरभऱ्याचे दर कमी असल्याने हमीभावाने विक्रीसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने ऑनलाइन नोंदणीला प्राधान्य दिले. शासनाची खरेदी सुरू झाल्यानंतर वेगाने मोजमाप होईल अशी अपेक्षा सर्वांनाच होती. परंतु नेमके उलटे होत आहे. तुरीची जशी संथगतीने मोजणी केली जात आहे, तोच प्रकार हरभऱ्याबाबतही घडत आहे.
 
अकोला जिल्ह्यातील १३,४६९ शेतकऱ्यांपैकी १५०७ शेतकऱ्यांचा हरभरा मोजून झाला. वाशीममध्ये ६७१२ शेतकऱ्यांपैकी ६५७ शेतकऱ्यांचेच मोजमाप पूर्ण झाले. हरभरा साठविण्यासाठी गोदामांमधील आधीचा शेतमाल अडचणीचा बनला आहे. गेल्या वर्षी खरेदी केलेली तूर वखार महामंडळांच्या गोदांमामध्ये पडून आले. त्यातच याही वर्षी खरेदी केलेले धान्य त्याच गोदांमांमध्ये साठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
 
अकोला, वाशीम या जिल्ह्यांमध्ये साठवणुकीसाठी जागेचा प्रश्‍न ऐरणीवर आलेला आहे. कोणताही नवीन माल खरेदी केला की तो साठवायचा कुठे, असा प्रश्‍न पडलेला आहे. हरभरा खरेदी या महिन्यात थांबवली जाणार आहे.
 
पुढील महिन्यापासून खरीप हंगाम सुरू होत आहे. अशा परिस्थितीत तूर, हरभरा विकून शेतकरी हंगामासाठी बी-बियाणे, खतांची तजवीज करणार होते. मात्र खरेदी प्रक्रियाच इतकी संथ आहे की आता शिल्लक राहिलेल्या दिवसांमध्ये किती जणांचे मोजमाप होईल, हे अधिकाऱ्यांनाही सांगता येत नाही. दर दिवसाला शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडत चालली आहे.
 
बॅंकांचे पीककर्ज वाटप सुरू झाले नाही, हरभऱ्याची मोजणी होत नाही, मोजणी झालेल्यांचे चुकारे विलंबाने मिळत आहेत, अशा परिस्थितीत अनेकजण नाइलाजाने खुल्या बाजारात हरभरा विकत आहे. 
 
सध्या सर्वच बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवक वाढली आहे. सोमवारी (ता. ७) अकोला बाजार समितीत ११०० क्विंटलपेक्षा अधिक हरभरा विकला. या हरभऱ्याचा सरासरी दर होता ३१७५ रुपये क्विंटल. शासनाचा हमीभाव ४४०० रुपयांचा असताना बाजारात सुमारे १२०० रुपये कमी दराने शेतकऱ्यांना हरभरा विकावा लागतो आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने हमीभाव खरेदी केंद्रावर मोजमापाला गती देण्याची गरज शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com