चार जिल्ह्यांत हरभरा खरेदीला ग्रहण

हरभरा खरेदी
हरभरा खरेदी

औरंगाबाद : खरेदीत सातत्य नसणे, जागेचा प्रश्‍न आणि आता बारदानाच उपलब्ध न होणे आदी कारणांनी हमीभावाने सुरू असलेल्या तूर व हरभरा खरेदीचा खेळखंडोबा झाला आहे. तूर खरेदी थांबली असतानाच आता औरंगाबाद, लातूर, बीड, लातूर जिल्ह्यांत हरभरा खरेदीलाही ग्रहण लागले आहे. बारदाना नसण्यासोबतच साठवणुकीसाठी जागा नसणे हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे.

लातूर जिल्ह्यात तुरीची हमीदराने खरेदी करण्यासाठी ११ केंद्रे सुरू करण्यात आली होती. या ११ केंद्रावरून ११ हजार शेतकऱ्यांची जवळपास २ लाख १ हजार क्‍विंटल तूर खरेदी केली गेली. १५ मे रोजी मुदत संपल्यापासून ऑनलाइन नोंदणी केलेल्या जवळपास २० हजारांवर शेतकऱ्यांची तूर अजूनही खरेदीच्या प्रतीक्षेत आहे. किमान तीन लाख क्‍विंटल तूर आणखी खरेदीसाठी येऊ शकते असा अंदाज आहे.

दुसरीकडे लातूर जिल्ह्यातील १३ खरेदी केंद्रावरून हरभऱ्याची हमीदराने खरेदी सुरू केली गेली. या केंद्रावरून तीन हजार शेतकऱ्यांचा जवळपास ५२ हजार क्‍विंटल हरभरा खरेदी केला गेला. येत्या मंगळवारी (ता. २९) या खरेदी केंद्राची मुदत संपणार असून किमान ३७ हजार शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी अजून बाकी आहे. या शेतकऱ्यांकडून किमान ७ ते ८ लाख क्‍विटंल हरभरा खरेदीसाठी येण्याचा अंदाज व्यक्‍त केला जात आहे.

ज्यांचा तूर व हरभरा खरेदी केला गेला, त्या रकमेपैकी एकट्या लातूर जिल्ह्यात जवळपास ८० कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहेत. यामध्ये हरभऱ्याच्या चुकाऱ्यापोटी बाकी असलेले २५ कोटी व तुरीच्या चुकाऱ्यापोटी बाकी असलेल्या जवळपास ५५ कोटी रुपयांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बीड जिल्ह्यात तुरीच्या हमीदराने खरेदीसाठी ३२,५१९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ २१ हजार ७४४ शेतकऱ्यांची तूर खरेदी केली गेली. खरेदी केलेल्या तुरीपैकी १ लाख ४ हजार १३१ क्‍विंटल तुरीला साठवायला जागाच नसल्याने ती खरेदी केंद्रावर पडून आहे.

हरभऱ्यासाठी नोंदणी व खरेदी सुरू असताना ६४०१ शेतकऱ्यांकडून ८५ हजार ४२५ क्‍विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. त्यापैकी तब्बल ६८ हजार २५१ क्‍विंटल हरभरा खरेदी केंद्रावरच पडून आहे. ऑनलाइन पद्धतीने  चुकारे होत असले तरी ४० ते ५० टक्‍के चुकाऱ्यांचा प्रश्‍न कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यात नोंदणी केलेल्या ३४९६ शेतकऱ्यांची २७ हजार ७६३ क्‍विंटल तूर खरेदी केली गेली. ३१०५ शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या या तुरीच्या खरेदीची रक्‍कम १५ कोटी १३ लाखांवर जाते.

जालना जिल्ह्यात ४३३६ शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी केवळ ७९० शेतकऱ्यांचा ९५८३ क्‍विंटल हरभरा खरेदी झाला. तूर खरेदीसाठी ८७२५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी ७८८३ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविले गेले. ८४२ शेतकऱ्यांना  एसएमएस पाठविणे बाकी आहे.

एसएमएस पाठविलेल्या शेतकऱ्यांपैकी ५१८८ शेतकऱ्यांची ४८ हजार २६५ क्‍विंटल ७५ किलो तूर खरेदी केली गेली. आणखी किमान १५ हजार क्‍विंटल तूर खरेदी होणे अपेक्षित आहे. त्यामुळे शासन मुदतवाढ देऊन संपूर्ण तूर खरेदी करते की आणखी कोणता निर्णय घेते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लातूर जिल्ह्यातील सर्वच खरेदी केंद्रावरील हरभरा खरेदी बारदान्याअभावी थांबली आहे. बीड जिल्ह्यातही तीन ते चार खरेदी केंद्रांवर बारदान्याअभावी खरेदी थांबवावी लागणार हे जवळपास स्पष्ट आहे. जालन्यातही हरभऱ्याची खरेदी थांबली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com